गृह मंत्रालय

‘वायु’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह सचिवांनी घेतला तयारीचा आढावा

Posted On: 12 JUN 2019 6:15PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 जून 2019

 

केंद्रीय गृह सचिव राजीव गौबा यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या उच्च स्तरीय बैठकीत ‘वायू’ चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी संबंधित राज्य आणि केंद्रीय मंत्रालये / संस्थांच्या तयारीचा आढावा घेण्यात आला.

अरबी समुद्रात घोंघावत असलेले ‘वायु’ चक्रीवादळ उद्या सकाळी गुजरात किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. पोरबंदर आणि महुवा दरम्यान वेरावळ परिसरातल्या किनारपट्टीवर हे वादळ धडकण्याची शक्यता असून, दि.13 जून रोजी सकाळी ताशी 145 ते 170 किमी. वेगाने वादळी वारे वाहण्याचा अंदाज आहे. यामुळे सौराष्ट्र आणि कच्छ परिसरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कच्छ, देवभूमी, द्वारका, पोरबंदर, जुनागड, दीव, गिरसोमनाथ, अमरेली आणि भावनगर जिल्ह्यातल्या किनारपट्टी भागात चक्रीवादळाच्या वेळी दीड ते दोन मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. सर्व संबंधित राज्यांना भारतीय हवामान विभाग नियमितपणे सूचना जारी करत आहेत.

या बैठकीने गृह, संरक्षण, दूरसंचार, ऊर्जा, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालये, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, भारतीय हवामान शास्त्र विभाग आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

गुजरातचे मुख्य सचिव आणि दीवच्या प्रशासकांचे सल्लागार व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीत सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी करण्यात आलेल्या तयारीची माहिती दिली. गुजरात प्रशासनाने सुमारे सव्वा लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले असून, आज दुपारी 4 वाजेपर्यंत तीन लाख लोकांना सुरक्षित स्थळी पोहोचवले जाईल. दीवमधेही सुमारे 10 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

गृह मंत्रालय, संबंधित राज्य सरकारं, केंद्रशासित प्रदेश आणि केंद्रीय संस्थांच्या नियमित संपर्कात आहे. एनडीआरएफच्या 52 तुकड्या आवश्यक सामुग्रीसह सज्ज आहेत.

भारतीय तटरक्षक दल, नौदल, लष्कर आणि हवाई दलांनाही सज्ज राहण्यास सांगण्यात आले आहे. टेहळणी करणारी विमाने आणि हेलिकॉप्टर्स हवाई पाहणी करत आहेत.

केंद्रीय गृह सचिवांनी संबंधित अधिकाऱ्यांना शून्य जिवीतहानी आणि कमीत कमी वित्तीय हानी साठी सावधगिरीच्या उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. मदत शिबिरांमधे अन्न, पेयजल आणि औषधांचा साठा उपलब्ध करुन देण्याबाबत करण्यात आलेल्या व्यवस्थेचाही त्यांनी आढावा घेतला.

 

 

B.Gokhale/S.Kane/D.Rane



(Release ID: 1574050) Visitor Counter : 91


Read this release in: English