गृह मंत्रालय

‘वायु’ चक्रीवादळासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक

Posted On: 11 JUN 2019 5:29PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 जून 2019

 

‘वायु’ चक्रीवादळामुळे उद्‌भवणाऱ्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी संबंधित राज्य आणि केंद्रीय मंत्रालये/संस्थांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज एक उच्चस्तरीय बैठक घेतली.

13 जून 2019 च्या पहाटे गुजरात किनारपट्टीवर पोरबंदर आणि महुवा दरम्यान ‘वायु’ चक्रीवादळ ताशी 110 ते 135 किमी वेगाने धडकण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. या चक्रीवादळामुळे गुजरातच्या किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे तसेच कच्छ, देवभूमी, द्वारका, पोरबंदर, जुनागढ, गीर, सोमनाथ, अमरेली आणि भावनगर जिल्ह्यांच्या सखल भागात 1 ते दीड किलोमीटर उंचीच्या लाटा उसळतील असा अंदाज आहे. भारतीय हवामान विभाग 9 एप्रिलपासून सर्व संबंधित राज्यांना नियमितपणे हवामानाची माहिती देणारी निवेदनं पाठवत आहे.

आढावा बैठकीनंतर गृहमंत्री अमित शाह यांनी नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी तसेच वीज, दूरसंचार, आरोग्य, पेयजल यासारख्या आवश्यक सेवा पुरवण्यासाठी शक्य त्या उपाययोजना करण्याचे निर्देश वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले तसेच 24 तास नियंत्रण कक्ष सुरु ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

या बैठकीला केंद्रीय गृह सचिव राजीव गौबा, भूविज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम राजीवन् आणि हवामान विभाग व गृह मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

केंद्रीय सचिव पी. के. सिन्हा यांनीही आज राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक बोलावली असून या बैठकीला गुजरातचे मुख्य सचिव तसेच दीवच्या प्रशासकांचे सल्लागार उपस्थित राहणार आहेत.

गृह मंत्रालय संबंधित राज्य सरकार, केंद्रशासित प्रदेश आणि केंद्रीय संस्थांच्या नियमित संपर्कात आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या 26 तुकड्या, बोटी, दूरसंचार उपकरणासह तैनात असून आणखी 10 तुकड्या तैनात केल्या जाणार आहेत.

भारतीय तटरक्षक दल, नौदल, लष्कर आणि हवाई दलाने सज्ज राहण्यास सांगण्यात आले असून टेहळणी करणारी विमानं आणि हेलिकॉप्टर हवाई पाहणी करत आहेत.

 

 

B.Gokhale/S.Kane/P.Malandkar

 

 



(Release ID: 1573917) Visitor Counter : 187


Read this release in: English