अल्पसंख्यांक मंत्रालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार ‘इक्बाल, इन्साफ आणि इमान’ चे सरकार आहे : नक्वी
Posted On:
11 JUN 2019 4:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 जून 2019
केंद्रीय अल्पसंख्यक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांच्या अध्यक्षतेखालील मौलाना आझाद शिक्षण प्रतिष्ठानची सर्वसाधारण बैठक आज नवी दिल्लीतल्या अंत्योदय भवनात झाली.
मोदी सरकारने सर्वसमावेशक विकासाचे सुदृढ वातावरण निर्माण केले आहे असे नक्वी यावेळी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार हे ‘इक्बाल (अधिकार), इन्साफ (न्याय) आणि इमान (अखंडता)’ चे सरकार असल्याचे सिद्ध झाले आहे असे ते म्हणाले. मोदी सरकार हे ‘समावेशी विकास, सर्वस्पर्शी विकासा’प्रति कटिबद्ध आहे.
अल्पसंख्यक समुदायातल्या शाळा सोडलेल्या मुलींना मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थांचा अभ्यासक्रम उपलब्ध करुन देऊन त्यांना शिक्षण आणि रोजगाराशी जोडले जाईल असे नक्वी म्हणाले.
देशभरातल्या मदरसा शिक्षकांना हिंदी, इंग्लिश, गणित, विज्ञान, कॉम्प्युटर यासारख्या मुख्य विषयांमध्ये प्रशिक्षण दिले जाईल. हा कार्यक्रम पुढल्या महिन्यात सुरु करण्यात येईल असे नक्वी म्हणाले. अल्पसंख्याकांच्या विशेषत: मुलींच्या सामाजिक-आर्थिक-शैक्षणिक सक्षमीकरणासाठी पुढल्या पाच वर्षात पाच कोटी विद्यार्थ्यांना मॅट्रिक पूर्व, मॅट्रिकोत्तर आणि गुणवत्तेनुसार शिष्यवृत्त्या दिल्या जातील. ज्यामध्ये 50 टक्के विद्यार्थीनींचा समावेश असेल असे नक्वी म्हणाले.
सामाजिक, आर्थिक कारणांमुळे आपल्या मुलांना शाळेत पाठवले जात नाही अशा भागांमधल्या अल्पसंख्यक मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी देशभरात ‘पढो-बढो’ जनजागृती अभियान राबवले जाईल अशी घोषणा नक्वी यांनी केली. या जनजागृती अभियानात पथनाट्य, लघुपट, सांस्कृतिक कार्यक्रमाचा समावेश असेल. पहिल्या टप्प्यात देशातल्या 60 अल्पसंख्यक बहुल जिल्ह्यांमध्ये हे अभियान राबवले जाणार आहे.
B.Gokhale/S.Kane/P.Malandkar
(Release ID: 1573899)
Visitor Counter : 123