वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

आफ्रिकन देशांबरोबरच्या व्यापाराला चालना देण्यासाठी वाणिज्य मंत्रालयाच्या उपाययोजना

Posted On: 07 MAY 2019 4:18PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 मे 2019

 

भारत आणि आफ्रिकी देशातले व्यापारी संबंध अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने आफ्रिकी देशातल्या भारतीय समुदायाबरोबर संवाद साधण्यासाठी वाणिज्य मंत्रालय, भारतीय उच्चायुक्त कार्यालय आणि आफ्रिकी 11 देशांचे दूतावास यांनी एक कार्यक्रम आयोजित केला होता. 3 आणि 6 मे रोजी वाणिज्य मंत्रालय, भारतीय उच्चायुक्त आणि आफ्रिकी देशांच्या दूतावासांनी, आफ्रिकेतल्या भारतीय समुदायाशी डिजीटल व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.

टांझानिया, युगांडा, केनिया, झांबिया, नायजेरिया, मोझांबिक, घाना, दक्षिण आफ्रिका, बोत्सवाना आणि मादागास्करमधल्या भारतीय समुदायाशी यावेळी संवाद साधण्यात आला. 11 आफ्रिकी देशांतले भारतीय समुदायाचे 400 जण यात सहभागी झाले.

2017-18 या वर्षात भारताचा आफ्रिकेशी 62.69 अब्ज अमेरिकी डॉलर्सचा एकूण व्यापार होता. खनिजसंपत्तीचे भांडार, तेलसाठे, युवा लोकसंख्या, दारिद्रयाचं कमी होणारे प्रमाण आणि खरेदीचा वाढता कल यामुळे भारतासाठी या देशांमध्ये मोठ्या संधी उपलब्ध आहेत.

नवी व्यापार मॉडेल, उद्योजकता यासाठी तसेच परिवहन, दूरसंवाद, पर्यटन, वित्तीय सेवा, स्थावर मालमत्ता आणि बांधकाम या क्षेत्रासाठी आफ्रिकेत मोठी मागणी आहे. आफ्रिकेत राजकीय क्षेत्र, व्यापार आणि शिक्षण या क्षेत्रात भारतीय समुदायाची महत्वाची भूमिका आहे. भारत आणि आफ्रिकी देश यामधल्या व्यापाराला आणखी चालना देण्यासाठी, या संदर्भात धोरण आखण्यासाठी भारतीय समुदायाकडून सूचना मागविण्यात आल्या आहेत. आफ्रिकेत भारतीय बँका, वित्तीय संस्था उभारणे, दोन्ही बाजुंच्या व्हिसा धोरणाचा आढावा घेऊन ते शिथील करणे, या भागातली डॉलर्सची चणचण लक्षात घेऊन रुपया या चलनात व्यापार करण्याच्या शक्यता आजमावणे, व्यापार संबंधित तंटा सोडवण्यासाठी यंत्रणा उभारणे यासह इतर मुद्यांवर भारतीय समुदायाने प्रामुख्याने लक्ष वेधले.

वाणिज्य मंत्रालयाने या सूचनांचे स्वागत करुन त्यावर कार्यवाही करण्याच्या दृष्टीने त्या संबंधितांकडे पाठवण्यात येतील असे म्हटले आहे.

 

 

N.Sapre/N.Chitale/P.Malandkar

 

 

 

 


(Release ID: 1571689) Visitor Counter : 120
Read this release in: English