माहिती आणि प्रसारण मंत्रालय

एफटीआयआय द्वारा चित्रपट समीक्षण आणि परिक्षणाचा नवा अभ्यासक्रम

Posted On: 10 APR 2019 1:54PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 एप्रिल 2019

 

भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेने (FTII) एका नव्या उपक्रमाद्वारे चित्रपट समीक्षण आणि परिक्षण  या विषयावर एका 20 दिवसीय अभ्यासक्रमाचे नवी दिल्ली येथील भारतीय जनसंचार माध्यम संस्थेत (IIMC)आयोजन केले आहे.

यावेळी बोलताना एफटीआयआयचे संचालक भुपेंद्र कँथोला म्हणाले की, देशात पहिल्यांदाच आयोजित होणाऱ्या या अभ्यासक्रमामुळे चित्रपट समीक्षक, परीक्षक, फिल्म ब्लॉगर्स, संशोधक, फिल्म अभ्यासक आणि सिनेमा विषयात विशेष रुची असणाऱ्या कोणाही व्यक्तीची बऱ्याच दिवसांपासूनची मागणी पूर्ण होईल. कोणीही व्यक्ती चित्रपट परीक्षण करु शकते हा गैरसमज असून चित्रपट वाचण्याची’ कला अवगत असल्याशिवाय तसेच चित्रपटावर भाष्य करण्यासाठी प्रचंड शिस्त आणि व्यक्त होण्याचे कौशल्‍य अंगी असल्याशिवाय परिक्षणाचे स्वातंत्र्य उपभोगता येऊ शकत नाही.

यावेळी बोलताना अभ्यासक्रमाच्या संचालिका रजुला शाह म्हणाल्या की, हा अभ्यासक्रम चित्रपट परिक्षणाचे मूलभूत प्रशिक्षण देण्यासाठी बनविण्यात आला आहे. प्रशिक्षणार्थ्यांचे चित्रपटाचा इतिहास आणि ते बनवण्याची कला यांबाबतचे ज्ञान वृद्धिंगत करुन तसेच त्याची परिक्षणाची कला विकसित करुन त्याला एक सक्षम परीक्षक बनवू इच्छितो.  चित्रपटाच्या चिकित्सक अभ्यासामुळे संवेदनशीलता विकसित होऊन परिक्षकांना दृष्टीकोन, ज्ञान आणि संकल्पना यातून जनसामान्यांच्या मतावर प्रभाव टाकता येईल. या अभ्यासक्रमात चित्रपटाच्या इतिहासातील महत्वाच्या चित्रपटांच्या सखोल अभ्यासाचा अंतर्भाव आहे.

रुजुला शाह (FTII चित्रपट दिग्दर्शन 2000) या कवयित्री, चित्रपट निर्मात्या असून दृश्य कलांमध्ये त्यांचे योगदान आहे. त्यांची चित्रपट निर्मिती ही वेगवेगळ्या कला, वेगवेगळ्या विचारधारा आणि तत्वज्ञानांच्या सखोल संवादातून उभरते. त्या चित्रपट दिग्दर्शक-निर्मात्या असून त्यांनी कल्पित कथा/माहितीपट, परंपरागत/आधुनिक अशा परिघांवर काम केले आहे. चित्रपट कला आणि डिजिटल कला यांची व्याप्ती वाढविण्यासाठीचा अभ्यास हा त्यांच्या आवडीचा विषय आहे.

चित्रपट आणि टेलिव्हिजनमध्ये भारताचे प्रशिक्षण (SKIFT-Skilling India in Film and Television)  या उपक्रमाअंतर्गत एफटीआयआयद्वारा हा अभ्यासक्रम चालवला जाणार असून या प्रकारचे आजवर 135 अभ्यासक्रम 37 शहरांमध्ये झाले आहेत. यातून 5800 चित्रपटप्रेमींचे प्रशिक्षण झाले आहे.

या अभ्यासक्रमासाठी वयाचे बंधन नसून नोंदणी करण्याची शेवटची तारीख 22 एप्रिल 2019 आहे. दिल्लीबाहेरील काही निवडक प्रशिक्षणार्थींना विनंतीनुसार राहण्याची सोय उपलब्ध केली जाईल.

अभ्यासक्रमाच्या  सविस्तर माहितीसाठी www.ftii.ac.in या संकेतस्थळाला भेट द्या.   

 

 

N.Sapre/M.Chopade/P.Malandkar

 

 

 



(Release ID: 1570339) Visitor Counter : 363


Read this release in: English