राष्ट्रपती कार्यालय

राष्ट्रपती चिलीमधे, भारत-चिली व्यापार मंच आणि चिली विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना केले संबोधित

Posted On: 02 APR 2019 2:27PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 2 एप्रिल 2019

 

राष्ट्रपती राम नाथ कोविंद क्रोएशिया, बोलिव्हिया आणि चिली या तीन देशांच्या दौऱ्याच्या तिसऱ्या टप्प्यात 30 मार्च रोजी चिलीमधल्या सँटियागो इथे पोहोचले.

या दौऱ्यात त्यांनी चिलीमधल्या भारतीय समुदायाला संबोधित केले. तसेच उभय देशांदरम्यान प्रतिनिधी मंडळ स्तरावरची चर्चाही झाली. चिली हा भारताचा पाचवा सर्वात मोठा व्यापार भागिदार आहे. चिलीमधून आयात होणाऱ्या वस्तूंमधे 85 टक्के वाटा तांब्याचा आहे. द्विपक्षीय व्यापार अधिक मजबूत करण्यासाठी व्यापारात वैविध्य आणायला हवे, असे राष्ट्रपती म्हणाले.

द्विपक्षीय संबंधांना चालना देण्याच्या उद्देशाने चिलीने वैध अमेरिका व्हिसा असलेल्या भारतीय नागरीकांना चिलीमधे व्हिसामुक्त प्रवेश देण्याची घोषणा केली.

पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केल्याबद्दल राष्ट्रपतींनी चिलीचे आभार मानले. सर्व प्रकारचा दहशतवाद निपटून काढण्यासाठी एकत्र काम करण्याबाबत उभय देशांनी सहमती दर्शवली. प्रतिनिधी मंडळ स्तरावरील चर्चेनंतर दोन्ही देशांमधे खाणकाम, संस्कृती आणि दिव्यांग क्षेत्रात तीन सामंजस्य करार करण्यात आले.

राष्ट्रपतींनी भारत-चिली व्यापार मंचालाही संबोधित केले. चिली हा भारतासाठी केवळ एक बाजारपेठ नसून, दीर्घकालीन भागिदार देश आहे. तसेच लॅटिन अमेरिका आणि पॅसिफिकसाठी चिली हे भारताचे प्रवेशद्वार आहे, असे राष्ट्रपती म्हणाले.

2017-18 या आर्थिक वर्षात भारतात 62 अब्ज अमेरिकन डॉलर्स थेट परदेशी गुंतवणूक झाली. मात्र यामधे चिलीचा वाटा अत्यल्प असून, त्यामधे सुधारणा होण्याची गरज राष्ट्रपतींनी व्यक्त केली.

चिलीमधल्या अंतिम कार्यक्रमात राष्ट्रपतींनी चिली विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना ‘तरुणांसाठी गांधी’ या विषयावर संबोधित केले. महात्मा गांधी हे सर्व संस्कृती आणि धर्मांचे होते. त्यांनी ज्या संकल्पानांना प्रोत्साहन दिले त्यांचा समावेश संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास उद्दिष्टांमधे करण्यात आला आहे. गांधीजींचे विचार आणि तत्वज्ञान अंतर्मनातील सामर्थ्य आणि विश्वास परत मिळवण्यासाठी प्रेरणादायी ठरतील, असे राष्ट्रपती म्हणाले.

काल संध्याकाळी मायदेशी परतण्यापूर्वी राष्ट्रपती केप टाऊन इथे पोहाचले. तिथे त्यांनी भारतीय समुदायाला संबोधित केले.

 

 

N.Sapre/S.Kane/D.Rane

 



(Release ID: 1569966) Visitor Counter : 102


Read this release in: English