भारतीय निवडणूक आयोग
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलीस, व्यय आणि सामान्य निरिक्षकांसाठी भारतीय निवडणूक आयोगाकडून सत्राचे आयोजन
Posted On:
25 MAR 2019 3:31PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 मार्च 2019
आगामी लोकसभा आणि चार राज्यातल्या विधानसभा निवडणुकांसाठी भारतीय निवडणूक आयोगाने आज राज्यात नेमण्यात येणाऱ्या निरिक्षकांसाठी पहिल्या सत्राचे आयोजन केले. भा.प्र.से.,भा.पो.से. यासह विविध केंद्रीय सेवांमधले 1800 हून अधिक वरिष्ठ अधिकारी निरिक्षक म्हणून नेमण्यात आले आहेत.
निरिक्षकांच्या भूमिकेच्या महत्वाचे स्मरण मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी उपस्थितांना करुन दिले. आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावण्याचे आणि कुठलीही चूक होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले. सोशल मिडियाच्या दुरुपयोगामुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांविषयी ते बोलले. निष्पक्ष आणि स्वतंत्र निवडणुकांसाठी निरिक्षकांनी आयोगाच्या डोळे आणि कानांप्रमाणे काम करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.
दिवसभर झालेल्या या चर्चासत्रात निवडणूक व्यवस्थापनाबाबतच्या विविध पैलूंची विस्तृत आणि सखोल माहिती निरिक्षकांना देण्यात आली. मतदारांच्या सुविधेसाठी आणि निवडणूक प्रक्रियेच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी माहिती तंत्रज्ञानविषयक विविध उपक्रमांची माहिती निरिक्षकांना देण्यात आली.
भारतीय निवडणूक आयोगाने प्रथमच ‘ऑब्झर्वर ॲप’ हे नवे मोबाईल ॲप सुरु केले आहे. या ॲपचा वापर करुन निरिक्षक आपला अहवाल सुरक्षितपणे थेट निवडणूक आयोगाला पाठवू शकतील. कर्तव्यावर असताना निरिक्षकांना सर्व महत्वाच्या सूचना, तातडीचे संदेश या ॲपवर मिळतील.
B.Gokhale/S.Kakade/D. Rane
(Release ID: 1569397)
अभ्यागत कक्ष : 195