पंतप्रधान कार्यालय

ग्रेटर नोएडा इथे विविध विकास प्रकल्पांचा पंतप्रधानांच्या हस्ते प्रारंभ


बक्सर आणि खुर्जा औष्णिक विद्युत प्रकल्पांचे केले भूमिपूजन

Posted On: 09 MAR 2019 1:34PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 मार्च 2019

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातल्या ग्रेटर नोएडाला भेट देऊन विविध विकास प्रकल्पांचा प्रारंभ केला.

पंडित दीनदयाळ उपाध्याय पुरातत्व संस्थेत, पंतप्रधानांनी  मेट्रोच्या नोएडा सिटी सेंटर नोएडा इलेक्ट्रॉनिक सिटी या टप्प्याला व्हिडीओ लिंकद्वारे हिरवा झेंडा दाखवला. उत्तर प्रदेशातल्या खुर्जा आणि बिहार मधल्या बक्सर  या 1320 मेगावाटच्या दोन  औष्णिक विद्युत प्रकल्पांचे  भूमिपूजन त्यांनी केले.

पंडित दीनदयाळ उपाध्याय पुरातत्व संस्थेचे त्यांनी उद्‌घाटन केले. या परिसरात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुतळ्याचे त्यांनी अनावरण केले आणि पुष्पांजली अर्पण केली. संस्थेच्या परिसरातल्या दीनदयाळ संग्रहालयालाही त्यांनी भेट दिली.

नोएडाचा पूर्णपणे कायापालट झाल्याचे पंतप्रधानांनी यावेळी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले. आता नोएडा विकास आणि  रोजगार निर्मितीसाठी ओळखला जातो असे ते म्हणाले. मेक इन इंडियाचे केंद्र म्हणून नोएडा विकसित होत असल्याचे ते म्हणाले. या संदर्भात त्यांनी जगातल्या सर्वात मोठ्या मोबाईल कारखान्यासह, विविध इलेक्ट्रॉनिक कंपन्या इथे आहेत याचा उल्लेख केला.

उत्तर प्रदेशात जेवर इथे देशातला सर्वात मोठा विमानतळ बांधण्यात येत असल्याचे सांगितले. याचे काम पूर्ण झाल्यानंतर जेवर विमानतळ इथले जीवनमान सुकर करण्याबरोबरच उत्तर प्रदेशासाठी आर्थिकदृष्ट्याही लाभदायी ठरेल. देशभरात विविध ठिकाणी बांधण्यात येत असलेल्या विमानतळांचा त्यांनी उल्लेख केला. उडान योजनेद्वारा छोट्या शहरांना हवाई मार्गे जोडण्यासाठी केंद्र सरकार कटीबद्ध असल्याचे ते म्हणाले.

भारतात उर्जा क्षेत्रातल्या सुधारणेसाठी सरकारने उचललेल्या पावलांची माहिती देताना, आपल्या सरकारने उर्जा निर्मितीच्या चार पैलूंवर, म्हणजे निर्मिती, पारेषण, वितरण आणि जोडणी यावर  लक्ष केंद्रित केल्याचे त्यांनी सांगितले.या दृष्टिकोनामुळे उर्जा क्षेत्राचा पूर्णपणे कायापालट झाला असून एक राष्ट्र - एक ग्रीड हे आता वास्तव झाल्याचे ते म्हणाले.

नवीकरणीय उर्जा क्षेत्रालाही आपल्या सरकारने गती दिली आहे. एक विश्व, एक सूर्य, एक ग्रीडहे आपले स्वप्न असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

बक्सर आणि खुर्जा इथे होणाऱ्या औष्णिक विद्युत प्रकल्पांमुळे भारताच्या विकासाला गती मिळणार असून उत्तर प्रदेश, बिहार आणि शेजारी राज्यात वीज उपलब्धता वाढणार आहे. गेल्या साडेचार वर्षात वीज निर्मितीत झेप घेतल्याचे त्यांनी सांगितले.

पंडित दीनदयाळ उपाध्याय पुरातत्व संस्थेचे उद्‌घाटन करताना, ही संस्था, भारत आणि जगभरातल्या  संशोधक आणि  विद्यार्थ्यांना आधुनिक सुविधा पुरवेल असे पंतप्रधान म्हणाले.

नव भारताची निर्मिती करण्यात येत आहे.125 कोटी भारतीयांच्या सामर्थ्य आणि पाठींब्यामुळे हे शक्य झाल्याचे ते म्हणाले. देशात भ्रष्टाचाराचे उच्चाटन करण्यासाठी सरकारच्या कटीबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला.दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिल्याबद्दल त्यांनी सैनिकांच्या शौर्याला सलाम केला. दहशतवादाविरोधात सरकार खंबीर निर्णय घेतच राहील असे त्यांनी स्पष्ट केले.

 

MC/NC/PM

 

 



(Release ID: 1568526) Visitor Counter : 190


Read this release in: English