पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते शांती स्वरुप भटनागर पुरस्कार प्रदान
Posted On:
28 FEB 2019 6:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 फेब्रुवारी 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2016, 2017 आणि 2018 या वर्षांसाठीचे शांती स्वरुप भटनागर पुरस्कार नवी दिल्लीतल्या विज्ञान भवन इथे प्रदान केले.
पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करतांना पंतप्रधान म्हणाले की विज्ञान, तंत्रज्ञान आणि संशोधन हे समाजाच्या गरजा आणि आकांक्षांशी जोडलेले असले पाहिजेत. आपल्या विज्ञान विषयक संस्थांनी भावी आवश्यकता लक्षात घेवून स्थानिक प्रश्नांवर उत्तरे शोधून काढली पाहिजेत.
बिग डेटा, मशीन लर्निंग, ब्लॉक चेन आणि कृत्रिम बुद्धीमत्ता यासारख्या नव्याने उदयाला येणाऱ्या क्षेत्रांतील संशोधन आणि विकासाच्या गरजांवर पंतप्रधानांनी भर दिला. सायबर प्रणालीवरील राष्ट्रीय अभियानामुळे या क्षेत्रातील संशोधन आणि विकासात अधिक सुधारणा होईल, असे ते म्हणाले. वैज्ञानिक जगताने चौथ्या औद्योगिक क्रांतीचा लाभ उठवावा आणि भारताला माहिती आणि तंत्रज्ञानावर आधारीत उद्योगांच्या निर्मितीचे जागतिक केंद्र बनवावे असे त्यांनी सांगितले.
मर्यादित साधनसंपत्तीसह कार्य करत वैज्ञानिकांनी साध्य केलेल्या जागतिक सफलतेचे पंतप्रधानांनी कौतुक केले. या संदर्भात पंतप्रधानांनी इस्त्रोच्या अति यशस्वी अंतरीक्ष कार्यक्रमांच्या तसेच भारताच्या औषध निर्मिती क्षेत्राच्या अभूतपूर्व विकासाचा उल्लेख केला.
पलिकडे विचार करण्याच्या गरजेबाबत बोलतांना पंतप्रधानांनी सांगितले की, शास्त्रज्ञ आणि संशोधकांचा एकत्रित कार्य करण्याचा दृष्टीकोन असला पाहिजे. या दृष्टीकोनामुळे विविध वैज्ञानिक प्रश्नांवर जलद आणि उत्तम उपाय शोधून काढण्यासाठी सहाय्य होईल, असे ते म्हणाले.
केंद्र सरकारच्या धोरणांमध्ये देशातील लोकसंख्या, लोकशाही आणि मागणी यांचा फायदा घेण्याचे उद्दीष्ट असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. भारतातील विज्ञान आणि तंत्रज्ञानाला बळकटी देण्यासाठी आणि नवकल्पनांना चालना देण्यासाठी सरकारने हाती घेतलेल्या विविध पुढाकारांचाही त्यांनी उल्लेख केला.
वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे संस्थापक संचालक डॉ. शांतीस्वरुप भटनागर यांच्या नावे, विविध वैज्ञानिक आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्यांना दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो.
B.Gokhale/J.Patankar/D. Rane
(Release ID: 1566910)
Visitor Counter : 132