जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुत्थान मंत्रालय

नमामी गंगे प्रकल्पांतर्गत सुरु असलेले सर्व प्रकल्प 13 महिन्यात पूर्ण होणार – नितीन गडकरी

Posted On: 27 FEB 2019 6:56PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 फेब्रुवारी 2019

 

नमामी गंगे प्रकल्पांतर्गत सुरु असलेले सर्व प्रकल्प मार्च 2020 पर्यंत पूर्ण होईल, असे आश्वासन केंद्रीय जलसंसाधन, नद्या विकास आणि गंगा पुनरुज्जीवन मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहे. स्वच्छ गंगा अभियाना अंतर्गत नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते. गंगा नदीच्या स्वच्छ आणि खळाळत्या प्रवाहासाठीचे पंतप्रधानांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण कठोर परिश्रम घेत असल्याचे ते म्हणाले. गेल्या साडेचार वर्षात गंगा नदीशी संबंधित कामांसाठी 27,000 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत, तर याआधीचा 50 वर्षात केवळ 4000 कोटी रुपये मंजूर झाले होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. आतापर्यंत 276 प्रकल्प मंजूर झाले असून, त्यापैकी 82 प्रकल्प पूर्ण झाले आहेत. गंगा नदीच्या 40 उपनद्यांवरही काम सुरु झाले आहे. 145 पैकी 70 घाटाचे काम पूर्ण झाले आहे आणि 53 मुक्ती धामसाठीचे काम पूर्णत्वाला जात असल्याची माहिती त्यांनी दिली.

स्वच्छ गंगा अभियानाला सरकारने सुरुवातीपासूनच प्राधान्य दिल्याचे केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी या कार्यक्रमात बोलताना सांगितले.

तर गंगा नदी स्वच्छ करण्यासाठी आपले मंत्रालय सर्वतोपरी मदत करेल, असे आश्वासन पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी यावेळी दिले.

 

 

N.Sapre/N.Chitale/D. Rane

 



(Release ID: 1566546) Visitor Counter : 202


Read this release in: English