परराष्ट्र व्यवहार मंत्रालय

बालाकोट इथे जैश-ए-महंमदच्या दहशतवादी तळावरच्या हल्ल्यासंदर्भात परराष्ट्र सचिवांचे निवेदन

Posted On: 26 FEB 2019 2:09PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,26फेब्रुवारी 2019

 

जैश--महंमद या पाकिस्तान स्थित दहशतवादी संघटनेने 14 फेब्रुवारी 2019 मधे केलेल्या आत्मघातकी दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे 40 जवान शहीद झाले. जैश--महंमदचा म्होरक्या मसूद अझहर असून, पाकिस्तानमधे गेल्या दोन दशकापासून सक्रिय असून, बहावालपूर इथून तो सूत्रं हलवतो.

भारताच्या संसदेवर डिसेंबर 2001 मधे झालेला हल्ला तसेच 2016 च्या जानेवारीत पठाणकोट इथे झालेल्या हल्ल्यासह अनेक दहशतवादी हल्ल्यांमागे संयुक्त राष्ट्रसंघाने प्रतिबंधित केलेल्या जैश--महंमद या दहशतवादी संघटनेचा हात आहे.

पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमधल्या या संघटनेच्या दहशतवादी प्रशिक्षण तळाच्या ठिकाणांबाबत पाकिस्तानला वेळोवेळी माहिती देण्यात आली. मात्र पाकिस्तानने या तळाचे अस्तित्व नाकारले. पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांना यासंदर्भात माहिती असल्याशिवाय शेकडो जिहादींना दहशतवादी प्रशिक्षण देण्याची क्षमता असणारे इतके मोठे तळ अस्तित्वात येऊन सुरु राहू शकत नाहीत.

जिहादींना प्रशिक्षण देण्यापासून रोखण्यासाठी जैश--महंमद विरोधात कारवाई करण्याची विनंती भारताने पाकिस्तानला वारंवार केली होती. पाकिस्तानच्या भूमीवर असलेले हे दहशतवादी तळ नष्ट करण्यासाठी पाकिस्तानने कोणतीही ठोस कारवाई केली नाही. देशाच्या विविध भागात आणखी आत्मघातकी दहशतवादी हल्ला करण्याचा जैश--महंमद कट आखत असून, यासाठी फिदायीन जिहादींना प्रशिक्षण देण्यात येत असल्याची विश्वासार्ह गुप्तवार्ता मिळाली आहे. या नजिकच्या धोक्याची शक्यता लक्षात घेऊन हा प्रतिबंधात्मक हल्ला निश्चितच आवश्यक ठरला होता.

बालाकोट इथल्या जैश--महंमदच्या सर्वात मोठ्या प्रशिक्षण तळावर भारताने आज पहाटे हल्ला करुन जैश--महंमदचे दहशतवादी, ट्रेनर, सिनियर कमांडर आणि फिदायीनसाठी प्रशिक्षण घेणाऱ्या जिहादी गटांचा मोठ्या प्रमाणात खात्मा केला. जैश--महंमदचा म्होरक्या मसूद अझहरचा मेव्हणा मौलाना युसुफ अझहर उर्फ उस्ताद घौरी बालाकोट इथला तळ चालवत होता.

दहशतवादाविरोधात लढा देण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलण्यासाठी भारत सरकार ठामपणे कटिबद्ध आहे. यामुळे जैश--महंमदच्या तळांना लक्ष्य करुन ही असैनिकी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. नागरिकांना इजा होऊ नये यादृष्टीने कारवाईसाठी हे स्थान निवडण्यात आले. घनदाट जंगलात डोंगरमाथ्यावर असलेला हा तळ नागरिकांपासून खूप दूर आहे. काही वेळापूर्वीच हा हल्ला केला असल्यामुळे यासंदर्भात अधिक तपशील अद्याप हाती आला नाही.

भारताविरोधातल्या दहशतवादी कारवायासाठी आपल्या भूमीचा आणि आपल्या नियंत्रणाखालच्या प्रांताचा वापर करु दिला जाणार नाही यासाठी पाकिस्तानने जानेवारी 2004 मध्येच कटिबद्धता दर्शवली आहे. या जाहीर कटिबद्धतेशी ठाम राहून पाकिस्तान, जैश--महंमदचे इतर तळ नष्ट करेल, अशी आमची अपेक्षा आहे.

 

 

 

N.Sapre/N.Chitale/D. Rane

 


(Release ID: 1566321) Visitor Counter : 234


Read this release in: English