पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशातल्या गोरखपूर इथे ‘पीएम-किसान’ चा केला शुभारंभ

Posted On: 24 FEB 2019 6:31PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24 फेब्रुवारी 2019

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातल्या गोरखपूर इथे आज प्रधानमंत्री किसान सम्मान निधी अर्थात पीएम-किसानचा शुभारंभ केला.

निवड झालेल्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात या शुभारंभामुळे 2000 रुपयांचा पहिला हप्ता थेट जमा होणार आहे.

पंतप्रधानांनी किसान सम्मान निधीच्या शुभारंभाबद्दल शेतकऱ्यांचे अभिनंदन केले. दुग्ध व्यवसाय आणि मत्स्य व्यवसाय करणाऱ्या शेतकरी कुटुंबांनाही किसान क्रेडिट कार्डचा लाभ मिळणार असल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचेही अभिनंदन केले.

स्वातंत्र्यानंतर शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी योजना आज सुरु होत असून, हा दिवस इतिहासात कोरला जाईल, असे पंतप्रधान म्हणाले.

शेतकऱ्यांना सक्षम आणि सबल बनवण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे, यासाठी सरकार त्यांना सर्व आवश्यक सुविधा पुरवण्याचे कार्य करत असल्याचे ते म्हणाले.

पीएम-किसान मुळे सुमारे 12 कोटी शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. या योजनेअंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 75 हजार कोटी रुपये जमा करण्यात येतील, असे पंतप्रधानांनी सांगितले. राज्य सरकारांनी लाभार्थी शेतकऱ्यांची यादी लवकरात लवकर केंद्र सरकारकडे पाठवावी, असे आवाहन करुन पंतप्रधान म्हणाले की, यामुळे शेतकऱ्यांना योग्य वेळेत या योजनेचा लाभ मिळेल.

पीएम-किसान योजनेत निधीचे थेट हस्तांतरण होणार असल्याने लाभार्थ्यांपर्यंत पूर्ण रक्कम पोहोचेल, असे पंतप्रधान म्हणाले.

दीर्घकाळ प्रलंबित असणारे सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सरकार 1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करत असून, देशाच्या अनेक भागातील शेतकऱ्यांना याचा कायम स्वरुपी आणि मोठा लाभ होणार असल्याचे त्यांनी सांगितले. 17 कोटी मृदा आरोग्य कार्ड, निम आवरण असलेला युरिया, 22 पिकांसाठी खर्चाच्या 50 टक्क्यांहून अधिक किमान आधारभूत किंमत, पीएम-फसल बिमा योजना, तसेच ई-नाम योजनेचाही त्यांनी उल्लेख केला.

उत्तर प्रदेशाच्या संपूर्ण पूर्व भागात झपाट्याने परिवर्तन होत आहे. उद्योग, सुलभ जोडणी आणि आरोग्य क्षेत्र या बदलाचे साक्षीदार असल्याचे त्यांनी नमूद केले. गोरखपूर आणि उत्तर प्रदेशच्या या भागाच्या विकासासाठी सुमारे 10 हजार कोटी रुपये प्रकल्पांचे आज उद्‌घाटन किंवा पायाभरणी झाली आहे. या प्रकल्पांमुळे सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावणार असल्याचे पंतप्रधान म्हणाले. प्रधानमंत्री आवास योजना, उज्ज्वला योजना, आयुष्मान भारत यासारख्या योजना म्हणजे सबका साथ, सबका विकास चे प्रतिकं आहेत, असे पंतप्रधानांनी सांगितले.

 

 

 

N.Sapre/J.Patankar/D. Rane

 


(Release ID: 1566190) Visitor Counter : 127


Read this release in: English