पंतप्रधान कार्यालय

गुजरातमधील सुरत विमानतळाच्या टर्मिनल इमारतीच्या विस्ताराच्या भूमिपूजन प्रसंगी पंतप्रधानांचे भाषण

Posted On: 30 JAN 2019 10:07PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 30 जानेवारी 2019

 

माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो,

आज पूज्य बापूंची पुण्यतिथी आहे. आज मी इथून नंतर बापूंच्या मीठ सत्याग्रहाच्या स्मरणार्थ दांडी इथे बांधण्यात आलेल्या राष्ट्रीय मीठ सत्याग्रह स्मारकाचे लोकार्पण करणार आहे. कर्मयोग्यांच्या या शहरात सुरत मध्ये मी बापूंना श्रद्धा सुमन अर्पण करतो. बापूंच्या मीठ सत्याग्रहाशी सुरतंच नात खूप घनिष्ट आहे. सुरत मधील शेकडो सत्याग्रही बापूंसोबत होते,

तसेच दांडी यात्रेच्या आधी सुरत इथे मीठ कायद्याला विरोध करण्यात आला होता.

सुरतने गांधीजींच्या मूल्यांचा नेहमीच सन्मान केला आहे. स्वच्छता असो, स्वावलंबन असो किंवा मग स्वदेशी गांधीजींच्या सर्व मूल्यांना सुरतने सत्यात उतरवले आहे. मला दिसतेय धवलची टीम, धवल मला दिल्लीला भेटला होता, हे सगळे तरुण कोणी अभियंता आहे, कोणी लेखापरीक्षक, कोणी शिक्षक, कोणी व्यापारी आहे, या सर्वांनी  मनात ठरवले आहे की स्वछता करायची, त्यांनी स्वतःला त्यासाठी समर्पित केले आहे. मी या सर्व तरुणांचे अभिनंदन करतो. आज हिरे आणि कपड्याच्या उद्योगासोबतच अनेक छोटे छोटे उद्योगांच्या साहाय्याने हे शहर ‘मेक इन इंडिया’ अभियानाला बळकटी देत आहे.

मित्रांनो, सुरतचे हे मनोधैर्य अधिक बळकट करण्यासाठी आज शेकडो कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उदघाटन आणि भूमिपूजन केले आहे. यामध्ये सुरत विमानतळाच्या विस्तारीकरणाचा समावेश आहे तसेच शहराला स्मार्ट बनवण्यासाठी अनेक प्रकल्पांचे उदघाटन आणि भूमिपूजन देखील करण्यात आले. विकासाशी निगडित या सर्व प्रकल्पांसाठी मी सुरतवासियांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.

मित्रांनो, आमचे सरकार देशात सुलभ राहणीमान आणि सुलभ व्यापारिकरणाची नवीन संस्कृती विकसित करत आहे. यासाठी देशात पायाभूत सुविधांचा विकास, कनेक्टिव्हिटीचा विकास करण्याला आम्ही प्राधान्य देत आहोत. सुरतचा समावेश देशातील त्या शहरांमध्ये होतो जिथे जगातील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या आपल्या अर्थव्यवस्थेला झळाळी मिळते.

नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका आंतरराष्ट्रीय अहवालाची माहिती सुरतच्या जनतेला आहे, परंतु कदाचित देशवासियांना याची कल्पना नसेल. या अहवालात असे नमूद करण्यात आले आहे की, आगामी 10-15 वर्षांमध्ये जगात सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या शहरांमध्ये पहिली 10 शहरे भारतातील असतील. आणि आनंदाची गोष्ट तर पुढे आहे यात सर्वोच्च स्थानी कोण आहे? सुरतला अभिमान वाटतोय? सुरतचे अभिनंदन.

म्हणजे हे स्पष्ट आहे की येणारा काळ सुरतचा आहे, भारताच्या शहरांचा आहे. हे केवळ भरताचेच नाहीतर संपूर्ण जगाच्या आर्थिक घडामोडींचे केंद्र बनणार आहे. जगभरातून इथे गुंतवणूक होणार आहे, व्यापार आणि व्यावसायिकांची संख्या कित्येक पटीने वाढणार आहे, लाखो तरुण मित्रांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

मित्रांनो, संपूर्ण जग भारतातील शहारांबद्दल एवढे आशावादी असताना, या शहरांना वर्तमानासह भविष्यासाठी देखील तयार करण ही आपली जबाबदारी आहे. सुरतला भविष्यासाठी तयार करणे याचाच अर्थ, इथल्या पायाभूत सुविधा, इथली व्यवस्था, इथले शिक्षण, इथले आरोग्य यासोबतच इथल्या लोकांच्या मनाचा विकास करायचा. आणि याच विचारासह देशभरात आम्ही प्रत्येक प्रकारच्या कनेक्टिव्हिटीचे प्रकल्प सुरू करत आहोत.

सुरतचे हे विमानतळ, आता गुजरातमधील तिसरे मोठे विमानतळ म्हणजेच व्यस्त विमानतळ झाले आहे. आज इथे नवीन टर्मिनलच्या इमारतीचे काम सूरु झाले आहे. जेव्हा हे काम पूर्ण होईल तेव्हा इथे 1200 आंतरदेशीय आणि 600 आंतरराष्ट्रीय प्रवासी हाताळण्याची क्षमता विकसित होईल, याचाच अर्थ या विमानतळावर दर दिवशी 1800 प्रवाशांची व्यवस्था होऊ शकते. सुरत विमानतळाची वार्षिक क्षमता चार लाख प्रवाशांची आहे. विस्तारीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर चार लाखांच्या या क्षमतेत वाढ होऊन ती 26 लाखांपेक्षा जास्त होईल.

प्रवाशांव्यतिरिक इथली मालवाहतूक क्षमता देखील वाढणार आहे. म्हणजेच येणाऱ्या काळात तुम्हा सर्वांना देश-विदेशात व्यापार करण्याची सुविधा उपलब्ध होईल. बाहेरून व्यापारासाठी येणाऱ्या व्यपाऱ्यांच्या वेळेची देखील बचत होईल.

मित्रांनो, मला असे सांगितले आहे की, काही दिवसांमध्येच इथून शारजहासाठी एअर इंडिया एक्सप्रेस ची थेट विमान सेवा सुरू होणार आहे. सुरुवातीला ही सुविधा आठवड्यातून दोन दिवस असेल आणि मार्चपासून ही सुविधा आठवड्यातून चार दिवस सुरू केली जाईल. या विमान सेवेमुळे तुम्हाला व्यापारासाठी खूप मदत होईल. यासाठी देखील मी तुमचे अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो.

मित्रांनो, संपूर्ण देशाला विमान सेवेने जोडण्याचे काम सरकार करत आहे आणि यासाठी मागील तीन चार वर्षात वेगाने काम करण्यात आले आहे. यामुळेच 17 विमनतळांच्या दर्जात सुधारणा करण्यात आली आहे किंवा त्यांचा विस्तार केला आहे. अनेक विमानतळांवर वेगाने काम सुरू आहे. आता सध्या सेवेत नसलेले किंवा ज्यांचा उपयोग फार कमी प्रमाणात होत आहे, देशातील 50 विमनातळांचा येणाऱ्या चार वर्षात विकास करण्याचे सरकारचे लक्ष्य आहे.

मित्रांनो, हवाई कंपनीची चप्पल घालणाऱ्या व्यक्तीला देखील विमान प्रवास करणे शक्य व्हावे हे माझे हे स्वप्न आहे. यासाठीच 'उडे देश का आम नागरिक' म्हणजेच उडाण योजना सुरू केली आहे. उडाण योजनेमुळे देशाचा जगातील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या विमान वाहतूक बाजारपेठेत समावेश होण्यासाठी मदत झाली आहे याचा मला आनंद आहे. उडाण योजनेमुळे देशातील विमान वाहतूक क्षेत्रात 12 लाख जागा कमी किंमतीत उपलब्ध झाल्या आहेत.

या योजनेअंतर्गत देशभरातील अंदाजे 40 विमानतळ देशातील विमानवाहतुक नकाशात जोडली गेली. गुजरात मध्ये देखील पोरबंदर-मुंबई, कांडला-अहमदाबाद, केशोड-अहमदाबाद आणि पोरबंदर-अहमदाबाद हे चार मार्ग उडाण-1 आणि उडाण-2 अंतर्गत जोडण्यात आले आहेत.

आता, उडाण-3 च्या माध्यमातून भविष्यात सुरतसह गुजरातमधील जवळपास 12 छोटी आणि मोठी विमानतळ देशातील वेगवेगळ्या शहरांना जोडली जाणार आहेत. यात साबरमती रिव्हर फ्रंट, शत्रूंजय धरण आणि स्टॅच्यु ऑफ युनिटी सारख्या जल विमानतळाची शक्यता असणाऱ्या क्षेत्रांचा  देखील समावेश आहे. जे लोकं भावनगरला जाऊ इच्छितात, तीर्थयात्रा करू इच्छितात, ते सी-प्लेनने शत्रूंजय धरण मार्गे सहज जाऊ शकतात. म्हणजे भविष्यात साबरमती रिव्हर फ्रंट इथून विमानाने उड्डाण करून ते सरदार सरोवर मध्ये उतरतील या प्रकारच्या योजनांवर विचार विनिमय सुरू आहे.

मित्रांनो, एअर कनेक्टीव्हिटी सोबत सरकार, लोकांना पारपत्रासाठी वारंवार मोठ्या शहरांमध्ये जायला लागू नये यासाठी देखील काम करत आहे. 2014 मध्ये देशात पारपत्र केंद्रांची एकूण संख्या सुमारे 80 होती. सूरतच्या लोकांनी हे लक्षात घ्या आपला एवढा मोठा देश, इतकी मोठी लोकसंख्या, स्वातंत्र्याच्या 60-65 वर्षांच्या कालावधीत आपल्या देशात पारपत्र कार्यालये 80. किती? तुम्ही गुजराती मध्ये बोला- किती? 80

तुम्हाला हे जाणून आनंद होईल की, आम्ही गेल्यावर्षी जे अभियान सुरु केले त्यानंतर हा आकडा 400 च्या पुढे गेला आहे. कुठे 80 आणि कुठे 400. मोठा विचार करायचा, जास्त करायचा, चांगल्या पद्धतीने करायचे, वेळेवर करायचे; आणि गुजरातचे लोकं तर मला ओळखतात. याशिवाय, 'एम पासपोर्ट सेवा मोबाईल अॅप' द्वारे पारपत्रासाठी अर्ज करणे सोपे झाले आहे. मोठ्या संख्येने पारपत्र सेवा केंद्रे उघडल्यामुळे आणि पारपत्र नियम सुलभ केल्यामुळे, अंतर आणि विलंब दोन्ही मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे.

मित्रांनो, देशातील गरीब आणि मध्यमवर्गातील प्रत्येक व्यक्तीचे जीवन सोपे आणि सुलभ बनविण्यासाठी केंद्र सरकार प्रामाणिक प्रयत्न करत आहे. आपली शहरे स्वच्छ ठेवण्यासाठी, वाहतुकीची कोंडी होऊ नये, पाणी आणि सांडपाण्याशी निगडीत चांगल्या सुविधा असाव्यात, सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून सुरक्षा मिळावी, कायदा सुव्यवस्था उत्तम असावी यासाठी आमचे सरकार प्रयत्नशील आहे, ह्या सर्व सुविधा स्मार्ट सिटी मिशनआणि अमृत योजनायांच्या माध्यमातून पूर्ण केल्या जात आहेत. समग्र दृष्टीकोनासह मिशन मोड पद्धतीने काम केले जात आहे.

मित्रांनो, आज इथे ज्या अनेक प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यात आले, त्यामुळे आपल्या या अभियानाला आणखी गती मिळेल. यामध्ये, सांडपाणी, पाणी, पूल, रस्ते, शिक्षणाशी संबंधित अनेक प्रकल्पांचा समावेश आहे. याशिवाय, पंतप्रधान आवास योजनेंतर्गत आज हजारो घरांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यात आले. ही सर्व घरं सूरतच्या बंधू भगिनींचे आयुष्य समृद्ध करणार आहेत.

बंधू आणि भगिनींनो, गेल्या साडे चार वर्षांत शहरातील गरीब बंधू आणि भगिनींसाठी 13 लाखांहून अधिक घरे बांधली आहेत, 37 लाख घरांचे काम सुरु आहे आणि सरकारने 70 लाख नवीन घरांच्या बांधकामाला मंजुरी दिली आहे. अशाप्रकारे, 2014 पासून देशाच्या ग्रामीण भागामध्येही, 30 लाखांहून अधिक घरे बांधली आहेत, लोकं त्या घरांमध्ये राहायल गेली आहेत, ही दिवाळी त्यांनी स्वतःच्या घरात साजरी केली.

हा आकडा खूप मोठा आहे, तुम्ही अंदाज बांधू शकता की, आधीच्या सरकारने त्यांच्या कार्यकाळात 25 लाख घरं बांधली होती, आणि हा आकडा सुरतच्या लोकांनी लक्षात ठेवा, किती? किती? 25 लाख, पुन्हा एकदा सांगा किती? 25 लाख घरं बांधली होती. गरिबांना, आपल्या बेघर बंधू-भगिनींना पक्के घर मिळावे यासाठी भारतीय जनता पक्षाच्या सरकारने 1 कोटी 30 लाख घरं बांधली, एक कोटी 30 लाख. त्यांच्या कार्यकाळात कुठे 25 लाख आणि आमच्या चार वर्षांमध्ये कुठे एक कोटी 30 लाख.

मी जितके काम करत आहे, तितके त्यांना करायला 25 वर्षे लागली असती. एवढेच नव्हे तर, याच सरकारने पहिल्यांदा मध्यमवर्गीयासाठी देखील, आणि मी सूरत आणि इतर शहरातील लोकांना हे समजून घेण्याची विनंती करतो की, ही बाब तुम्ही समजून घ्या, याची तुम्हाला किती मदत होईल, तुम्ही याचा लाभ घ्या.

पहिल्यांदा, आमच्या सरकारने देशात ही योजना सुरु केली, आमचे सरकार बनण्याआधी ही योजना नव्हती, जर मध्यमवर्गीय कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला जर घर बांधायचे असेल, मुलं मोठी झालीत, नवीन घर घ्यायचे आहे; कोणतीच व्यवस्था नव्हती. मध्यम वर्गाला नेहमी त्याच्या नशिबाच्या आधारे सोडून दिले जायचे.

आमचे सरकार आल्यानंतर पहिल्यांदाच मध्यम वर्गासाठी देखील एक नवीन श्रेणी तयार केली आणि त्यांना व्याज दरात देखील सूट दिली. याचा लाभ काय होतो, एका अंदाजानुसार, जर मध्यमवर्गीय व्यक्ती 20 लाख रुपयांचे कर्ज घेतो आणि त्या 20 लाख रुपयांच्या कर्जातून प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घर बांधत असेल तर त्याला व्याजात सूट दिली जाते. आणि याचा परिमाण हा होईल की, जेव्हा तो त्याचे कर्ज फेडेल तेव्हा त्याचे अंदाजे 6 लाख रुपये वाचतील. याचाच अर्थ, एक घर बांधताना मध्यमवर्गीय कुटुंबाच्या 6 लाख रुपयांची बचत होईल.

भारतात, इतकी सरकार आली, कोणत्याही सरकारने हा विचार केला नव्हता, कोणत्याही सरकारने कृती केली नव्हती. आमच्यात ही ताकद आहे की आम्ही भारतातील वाढत्या मध्यमवर्गीय कुटुंबांची चिंता करीत आहोत आणि याबरोबरच करिअरच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये स्वतःचे घर खरेदी करण्याची इच्छा असणाऱ्या मध्यमवर्गीय तरुणांना याचा सर्वात मोठा फायदा झाला आहे.

काही लोक प्रश्न विचारतात, नोटबंदीचा(विमुद्रीकारणाचा) काय फायदा झाला? हा प्रश्न त्यांनी, नोटबंदी(विमुद्रीकारणा) नंतर कमी झालेल्या घराच्या किंमतींचा लाभ होणाऱ्या तरुणांना देखील विचारला पाहिजे. त्या गरीब आणि मध्यमवर्गी कुटुंबियांना विचारला पाहिजे,ज्यांचे घराचे स्वप्न साकार होणे शक्य झाले आहे. अन्यथा, स्थावर मालमत्ता क्षेत्रात काळापैशाचा जोर होता, आणि सूरतमधील लोकांना हे चांगले माहित आहे. मोठ्या मोठ्या लोकांची नावे तुम्हाला माहिती आहेत.

बंधू आणि भगिनींनो, गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांचे उत्पन्न गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये अडकून राहू नये यासाठी आमच्या सरकारने 'रेरा कायदा' तयार केला आहे. 'रेरा कायद्या' च्या अंतर्गत 30-35 हजारांहून अधिक बांधकाम व्यावसायिकांनी स्वत: ची नोंदणी केली आहे आणि नियत नियमांनुसार लाखो घरे बांधली आहेत.

मित्रांनो, सरकारची जेव्हा काम करण्याची इच्छाशक्ती असते, तेव्हा कशाप्रकारे बदल घडतात याचे एलईडी बल्ब हे देखील एक उदाहरण आहे. आधी जो एलईडी बल्ब 350 रुपयांना मिळायचा आता तोच 40-50 रुपयांना मिळतो. आता तुम्ही मला हे विचारू नका की 40-50 चा बल्ब 350 मध्ये विकला जायचा तर जे मधले पैसे होते ते कुठे जायचे, ते मला विचारू नका. त्याचे उत्तर राजीव गांधी देऊन गेले आहेत. ते म्हणाले होत, 1 रुपया दिल्यानंतर 15 पैसे पोहोचतात, 85 पैसे कोण खातात, हे सगळ्या जगाला माहित आहे.

गेल्या साडेतीन वर्षांत सरकारने 32 कोटी एलईडी बल्ब वितरित केले आहेत, ज्यामुळे लोकांचे वीज बिलाचे अंदाजे 16 हजार 500 कोटी रुपये वाचले आहेत. ही रक्कम जास्त करून मध्यमवर्गीय कुटुंबांची वाचली आहे.

 त्याचप्रमाणे, आमच्या सरकारच्या मुद्रा योजनेने गरीब आणि निम्न-मध्यमवर्गीय तरुणांच्या स्वप्नांना नवीन पंख दिले आहेत. याआधी एखाद्या तरूणाला जर स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा असेल तर त्याला बँकेकडून कर्ज घेताना हमीची समस्या यायची.

आमच्या सरकारने मुद्रा योजनेअंतर्गत आतापर्यंत बँक हमीशिवाय 15 कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्जाचे वाटप केले आहे. तुम्ही विचार करा की, या अंतर्गत लोकांना स्वत:चा रोजगार सुरु करण्यासाठी कोणत्याही बँक हमीशिवाय सात लाख कोटी रुपये दिले आहेत. यापैकी 4 कोटी 25 लाखांपेक्षा अधिक लोकं अशी आहेत जे पहिल्यांदा कर्ज घेत आहे. याचाच अर्थ गेल्या साडे चार वर्षात देशाला 4 कोटी 25 लाख नवीन उद्योजक देखील मिळाले आहेत.

बंधू आणि भगिनींनो, या व्यापक योजना आणि मोठे निर्णय घेण्यामागील एक मोठे कारण आहे ते म्हणजे तुमच्या एक-एक मतांच्या शक्तीने स्थापन झालेले संपूर्ण बहुमताचे सरकार. तुम्हाला असे वाटत असेलमी आता जेव्हा घराची किल्ली देत होतो, तेव्हा तुम्हाला वाटले असेल मोदी हे घर देत आहेत; कोणाला वाटत असेल हे घर भारत सरकार देत आहे.

 बिल्कुल नाही, हे घर मोदी देत नाही किंवा भारत सरकार देत नाही; हे घर तुम्ही देत आहात. ही तुमच्या एका मताची शक्ती आहे की गरीबांना घर मिळाले आहे. हे आपल्या मताचे महत्त्व आहे जे गरीबांना घर देण्याचा अधिकार देते. आणि म्हणूनच तुम्ही हे जे बदल बघत आहात, ते बदल तुमच्या मताच्या सामर्थ्यामुळे झाले, मोदिच्या शक्तीमुळे नाही.

बंधू आणि भगिनींनो, तुम्हाला माहित आहे 30 वर्षांपर्यंत आपल्या देशात अस्थिरता होती. त्रिशंखू सरकार होते, कोणालाच पूर्ण बहुमत नव्हते. जोडून तोडून सरकार चालवले. ज्याची जिथे इच्छा झाली तो तिथे गेला. देश होता तिथेच अडकून राहिला आणि काही गोष्टींमध्ये मागे राहिला. गेल्या चार साडे चार वर्षांपासून आम्ही पुढे जाऊ शकलो आहोत, त्याचे मुख्य कारण आहे- देशाच्या जनतेने विचारकरून मतदान केले आणि 30 वर्ष जुन्या त्रिशंखू सरकारच्या जुन्या आजारापासून देशाला मुक्त केले- संपूर्ण बहुमताचे सरकार बनवले. आणि नवीन पिढी हे बघू शकते की पूर्ण बहुमताचे सरकार कठोर निर्णय घेऊ शकतात आणि मोठे निर्णय देखील घेऊ शकतात; हिंमतीने सरकार पुढे जाऊ शकते, आणि हे काम आम्ही केले आहे.

संपूर्ण बहुमताच्या सरकारचे हे महत्व आहे, पूर्ण बहुमतातील सरकार जबाबदार देखील असते. आज कोणीही मला विचारू शकते, सांगा मोदिजी गेल्या साडेचार वर्षात तुम्ही काय केले. जर संपूर्ण बहुमताचे सरकार नसते तर मोदीने सहजपणे सांगितले असते, अरे काय करणार, मिश्र सरकार आहे, काही निर्णय घेणे कठीण होते, गाडी ढकलली असती; परंतु असे झाले नाही देशातील जनतेने पूर्ण बहुमताचा निर्णय घेऊन जगात देशाचे नाव उंच केले आहे. आणि म्हणूनच प्रत्येक मतदात्याला आपल्या मताची ताकद माहित आहे, देशाला पुढे नेण्यात त्याची भागीदारी आहे. देश कसा पुढे जात आहे हे आपण चार साडे चार वर्षात बघितले आहे.

तुम्ही आठवा, सरकार कसे चालायचे. तुम्ही मला सांगा, आज सुरत विमानतळावर 70-72 विमानांचे उड्डाण होते. आता सी.आर.पाटील सांगत होते, 70-72 विमाने येतात जातात. परंतु आपण हे कधीच विसरणार नाही की, विमानतळासाठी कसे आंदोलन केले होते, ज्ञापन पत्र द्यावे लागायचे, दिल्लीचे दरवाजे ठोकायला लागायचे. मी देखील तेव्हा मुख्यमंत्री या नात्याने केंद्र सरकारला अनेक पत्र लिहून दमलो होतो. परंतु त्यांच्या डोक्यात काहीतरी राजकारण होते त्यामुळे सुरतला ही सुविधा देत नव्हते, अडथळे आणले जायचे.

मी त्यांना समजायचो, सुरतेत शक्ती आहे, विमान कंपन्यांना फायदा होईल, देशाला फायदा होईल; पण ते ऐकायला तयारच नव्हते. तुम्ही मला सांगा, चार लाख प्रवाशी क्षमतेवरून 26 लाख प्रवासी क्षमता करावी लागली, जे आपल्याला दिसत होते ते त्यांना दिसत नव्हते. सुरतच्या नागरिकांना दिसत होते, त्यांना दिसत नव्हते; कारण आम्ही सबका साथ, सबका विकासहा मंत्र घेऊन काम करत आहोत.

मित्रांनो, एकीकडे आम्ही जुन्या व्यवस्थेतील उणीवा बदलण्याचा प्रयत्न करत आहोत, नव भारताच्या निर्मितीमध्ये व्यस्त आहोत; तर दुसरीकडे काही लोकं आमच्या ह्या प्र्यत्नानांची खिल्ली उडवत राहतात. गेल्या सहा-सात दशकात ज्यांनी देशाचा विचार केला नाही, केवळ आपली चिंता केली, त्यांना हा बदलणारा भारत बघवत नाही. अशा नकारात्मक विचारांच्या लोकांकडे लक्ष न देता आम्ही पुढे जात आहोत. नव भारताच्या नविन ऊर्जेला आम्ही विकास कामांमध्ये खर्ची करणार आहोत.

मी पुन्हा एकदा जीवन आणि व्यवसाय सुलभ करणाऱ्या या प्रकल्पांसाठी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो.

इतक्या मोठ्या संख्येने तुम्ही आशीर्वाद देण्यासाठी इथे आलात, यासाठी  मी तुमचा आभारी आहे. संपूर्ण शक्तीने बोला-

भारत माता की जय

भारत माता की जय

भारत माता की जय

खूप-खूप धन्यवाद!

 

B.Gokhale/S.Mhatre/P.Kor


(Release ID: 1563497) Visitor Counter : 175
Read this release in: English