वस्त्रोद्योग मंत्रालय
तांत्रिक वस्त्रोद्योग क्षेत्राला केंद्र सरकार आवश्यक तो सर्व पाठिंबा देणार-वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी
207 तांत्रिक वस्त्रोद्योग उत्पादनांना एचएसएन कोड मिळणे हा या क्षेत्रासाठी मैलाचा दगड
Posted On:
29 JAN 2019 5:59PM by PIB Mumbai
मुंबई, 29 जानेवारी 2019
केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या तांत्रिक वस्त्रोद्योग क्षेत्रातल्या 207 उत्पादनांना एचएसएन कोड मिळणे हे ऐतिहासिक यश असल्याचे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी म्हटले आहे. या कार्यक्रमामुळे तांत्रिक वस्त्रोद्योगाला चालना मिळेलच पण त्याशिवाय कृषी उद्योगालाही हातभार लागेल, असे त्या म्हणाल्या. या निर्णयामुळे 2020-21 पर्यंत तांत्रिक वस्त्रोद्योग क्षेत्राचा वृद्धी दर 2 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय आणि फिक्की यांनी आज संयुक्तपणे मुंबईत आयोजित केलेल्या तांत्रिक वस्त्रोद्योग विषयक राष्ट्रीय परिषदेत त्या बोलत होत्या. या उपक्रमासाठी सरकारला मार्गदर्शन आणि सहकार्य करणाऱ्या खाजगी उद्योगांचे त्यांनी आभार मानले.

वस्त्रप्रावरणं वगळता इतर क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या कापडांच्या उत्पादनाचे क्षेत्र म्हणजे तांत्रिक वस्त्रोद्योग क्षेत्रातल्या उत्पादनांच्या आयात-निर्यातीची आकडेवारी नोंदवण्यासाठी या सर्व उत्पादनांना एचएसएन कोड मिळणे आवश्यक असते. त्यामुळे या क्षेत्राकडून तांत्रिक वस्त्रोद्योगातल्या उत्पादनांना हा कोड देण्याची मागणी दीर्घकाळापासून होत होती. त्याची दखल घेत सरकारने 207 उत्पादनांना हा कोड दिला आहे. या संदर्भात कोड क्रमांक आणि इतर माहिती असलेल्या पुस्तिकेचेही आज स्मृती इराणी यांच्या हस्ते प्रकाशन झाले.

ॲग्रो टेक म्हणजेच कृषी संबंधीत वस्त्रोद्योग उत्पादनांच्या प्रगतीमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढू शकते, असे सांगत देशातील कृषी क्षेत्राच्या विकासात वस्त्रोद्योगाचे महत्त्वाचे योगदान राहिल अशी ग्वाही स्मृती इराणी यांनी दिली. तसेच या क्षेत्रात मोठी रोजगार निर्मितीही होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आयुष्मान भारत सारखी योजना यशस्वी करण्यात वैद्यकीय वस्त्रोद्योग क्षेत्राचे महत्त्वाचे योगदान आहे, असेही त्या म्हणाल्या.

तांत्रिक वस्त्रोद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी सरकारने केलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली. गेल्या चार वर्षात तांत्रिक वस्त्रोद्योगाच्या 530 नमुने विकसित करण्यात आले आहेत. या क्षेत्रात आठ उत्कृष्टता केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच 22,000 लोकांना तांत्रिक वस्त्रोद्योग क्षेत्राचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्याशिवाय 650 परिषदा आणि चर्चासत्रे आयोजित करण्यात आली आहेत. ॲग्रो टेक क्षेत्राशी संबंधित अनेक प्रदर्शने भरवण्यात आली असून शेतकऱ्यांना ॲग्रो टेक तंत्रज्ञानाची दैनंदिन वापराची माहिती व्हावी यासाठी शेतकऱ्यांना किट्स देण्यात आल्या आहेत, असे इराणी यांनी सांगितले.

तांत्रिक वस्त्रोद्योग क्षेत्रासाठीचे संशोधन केंद्र पुढच्या महिन्यात नवी दिल्लीत सुरू केले जाईल, अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. या क्षेत्राची उलाढाल 2 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
या राष्ट्रीय परिषदेतून तांत्रिक वस्त्रोद्योग क्षेत्राला अधिक बळकट करणारे विचारमंथन होईल, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. ऑगस्ट 2019 मध्ये होणाऱ्या टेक्नोटेक 2019 या कार्यक्रमाचे कर्टन रेझरही यावेळी झाले.
वस्त्रोद्योग विभागाचे सचिव राघवेंद्र सिंग, नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. सारस्वत, फिक्कीचे माजी अध्यक्ष राजेश शहा यांच्यासह वस्त्रोद्योग क्षेत्रातल्या विविध कंपन्यांचे उच्चाधिकारी यावेळी उपस्थित होते.

S.Tupe/R.Aghor/P.Kor
(Release ID: 1561837)