पंतप्रधान कार्यालय
आयआरईपी कोची चे उदघाटन ही केवळ केरळसाठी नाही तर देशभरासाठी अभिमानास्पद बाब
कोची इथल्या एकात्मिक तेल शुद्धीकरण विस्तार संकुलाचे आणि एलपीजी बॉटलिंग प्लँटच्या माउंडेड स्टोअरेज व्हेसलचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण
बीपीसीएल कोची तेलशुद्धीकरण प्रकल्पातल्या पेट्रोलियम संकुलाचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन
Posted On:
27 JAN 2019 8:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 जानेवारी 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केरळच्या कोचीचा दौरा केला. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते विविध प्रकल्पांचे उदघाटन आणि लोकार्पण करण्यात आले.
कोची इथल्या एकात्मिक तेल शुद्धीकरण विस्तार प्रकल्प संकुलाचे लोकार्पण पंतप्रधानांनी केले. या विस्तारित संकुलामुळे कोचीचा तेल शुद्धीकरण प्रकल्प भारतातला सर्वात मोठा आणि जागतिक दर्जाचा तेल शुद्धीकरण प्रकल्प होणार आहे. या प्रकल्पामुळे शुद्ध इंधन उत्पादन या देशाला मिळेल तसेच एलपीजी आणि डिझेल चे उत्पादन दुपटीने वाढणार आहे, त्याशिवाय पेट्रोकेमिकल प्रकल्पासाठी तेलनिर्मिती केली जाईल.
ह्या संकुलाचे उदघाटन करतांना पंतप्रधान म्हणाले, की आज हा देशासाठी ऐतिहासिक क्षण आहे. केरळच्या औद्योगिक विकासातला हा महत्वाचा टप्पा आहे. हा केवळ केरळसाठीच नव्हे, तर संपूर्ण भारतासाठी अभिमानाचा क्षण आहे, असे मोदी म्हणाले.
केरळच्या जनतेमध्ये आणि आसपासच्या राज्यातही गेल्या 50 वर्षांपासून स्वच्छ इंधनाचा प्रसार आणि पुरवठा करणाऱ्या भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, बीपीसीएलचीही पंतप्रधानांनी प्रशंसा केली.
केंद्र सरकारने या क्षेत्रासाठी राबवलेल्या योजनांची पंतप्रधानांनी माहिती दिली. उज्ज्वला गॅस योजनेमुळे अनेक लोकांच्या आयुष्यात आनंद आला असून 2016 पासून आतापर्यत सुमारे सहा कोटी गरीबातल्या गरीब कुटुंबापर्यत एलपीजी गॅस पोहोचला आहे.
23 कोटींपेक्षा जास्त एलपीजी ग्राहक ‘पहल’ योजनेत सहभागी झाले आहेत. या योजनेतील पारदर्शकतेमुळे अनेक बनावट ग्राहक, एकाच नावाचे दोन ग्राहक किंवा सुप्त/ बंद खाती समोर आली आहेत. सरकारच्या 'गिव्ह अप' आवाहनाला प्रतिसाद देत, एक कोटीपेक्षा जास्त ग्राहकांनी आपले अनुदान सोडले आहे, असे मोदी म्हणाले. कोची प्रकल्पात अलीकडेच झालेल्या विस्तारामुळे एलपीजी गॅसचे उत्पादन दुपटीने वाढले असून यामुळे उज्जवला योजनेत मोठी मदत होत आहे, असे गौरवोद्गार पंतप्रधानांनी काढले.
सीडीडी म्हणजेच शहर गॅस वितरण प्रणालीच्या माध्यमातून देशभरात सीएनजी या स्वच्छ इंधनाच्या वापराला प्रोत्साहन दिले जात आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.
सीडीडीच्या लिलावाच्या 10 फेऱ्या यशस्वीरिता पूर्ण झाल्यानंतर देशातील 400 पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये स्वयंपाकाच्या पाईप गॅसचा पुरवठा होऊ शकेल, असं त्यांनी सांगितलं. राष्ट्रीय गॅस ग्रीड किंवा प्रधानमंत्री ऊर्जा गंगा तयार करण्यात येत असून त्या माध्यमातून गॅस-आधारित अर्थव्यवस्था आणि ऊर्जा क्षेत्रात गॅसचा वाटा वाढवण्याचा प्रयत्न आहे, असं त्यांनी सांगितलं. केंद्र सरकार लवकरच 15,000 किमीचे अतिरिक्त पाईपलाईन जाळे विकसित करणार आहे, अशी माहिती मोदी यांनी दिली. केंद्र सरकारने तेलाची आयात 10 टक्क्यांनी कमी केली असून परदेशी चलनाच्या गंगाजळीची मोठी बचत केली आहे, असं ते म्हणाले.
भारत हा आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचा तेल शुद्धीकरण करणारा देश असून तेल रिफायनरीचे केंद्र म्हणून उदयास येत आहे. ह्या संकुलाचे काम नियोजित वेळेत पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधानानांनी सर्वांचे, विशेषतः दिवसभर बांधकाम करणाऱ्या कामगारांचे कौतुक केले.ह्या प्रकलपाचे काम ऐन भरात असतांना 20,000 मजूर येथे अहोरात्र राबत होते असे सांगत, हेच देशाचे खरे नायक आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
या प्रकल्पामुळे इंधनेतर क्षेत्राकडे वळण्याच्या बीपीसीएलच्या निर्णयाचेही पंतप्रधानांनी कौतुक केले. पेट्रोकेमिकल्स या रसायनांविषयी फारसे बोलले जात नाही. मात्र ते अदृश्य स्वरूपात जणू सगळीकडेच असतात आणि आपल्या दैनंदिन आयुष्यातील अत्यंत महत्वाच्या कामात ते उपयुक्त ठरतात, असे पंतप्रधान म्हणाले. मात्र बहुतांश पेट्रोकेमिकल्स आपल्याला आयात करावे लागतात. या प्रकल्पामुळे भारतात पेट्रोकेमिकल्सचे उत्पादन वाढण्यास हातभार लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कोची तेलशुद्धीकरण प्रकल्पात आता प्रोफेलीनचे उत्पादन होऊ शकेल, याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. त्याशिवाय इतर काही उच्च दर्जाच्या पेट्रोकेमिकल्सचा वापर पेंट्स, शाई, आवरण, साबणचुरा डिटर्जंट आणि इतर अनेक पदार्थांमध्ये होईल. या पेट्रोकेमिकल प्रकल्पामुळे अनेक छोटे मोठे संलग्न उद्योग कोची येथे येतील आणि या क्षेत्रात व्यापारउदीम वाढेल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कोची तेलशुद्धीकरण प्रकल्पात सुरू असलेल्या कामाचा देशाला अभिमान आहे. जेव्हा गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात केरळमध्ये भीषण पुराचे संकट आले होते, तेव्हा बीपीसीएल ने स्वयंप्रेरणेने या संकटावर मात करण्यासाठी आवश्यक त्या सर्व इंधनांचे अखंड उत्पादन आणि पुरवठा केला होता ,याचे स्मरण पंतप्रधानांनी यावेळी केले. देशबांधणीत कोची तेलशुद्धीकरण प्रकल्प देत असलेल्या योगदानाची त्यांनी प्रशंसा केली,त्याचवेळी, आता देशाच्या तुमच्याकडून अधिक अपेक्षा आहेत, असेही ते म्हणाले. दक्षिण भारतातील पेट्रोकेमिकल्स क्रांतीचे नेतृत्व या प्रकल्पाने करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
एत्तमनूर येथे बीपीसीएल च्या वतीने उभारण्यात आलेल्या कौशल्य विकास संस्थेचे उदघाटनही त्यांनी केले. यामुळे युवकांमधील कौशल्य विकसित होतील आणि रोजगाराच्या संधी निर्माण होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कोची इथल्या एलपीजी बॉटलींग प्लँटच्या माउंडेड स्टोअरेज सुविधा व्हेसलचे लोकार्पण देखील पंतप्रधानांनी केले. 50 कोटी रुपयांच्या या सुविधेमुळे, एलपीजी गॅस ची साठवणूक क्षमता वाढणार असून , एलपीजी सिलेंडर्सची वाहतूक कमी होईल.
B.Gokhale/R.Aghor/P.Kor
(Release ID: 1561639)