पंतप्रधान कार्यालय

106 व्या भारतीय विज्ञान परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं भाषण

Posted On: 03 JAN 2019 8:34PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 जानेवारी 2019

 

व्यासपीठावर उपस्थित पंजाबचे राज्यपाल श्री वी पी सी जी,मंत्रिमंडळातील माझे सहकारी डॉ हर्षवर्धन जी, इतर मान्यवर उपस्थित, विद्यार्थी आणि परिषदेतील प्रतिनिधी, तुम्हा सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा !!

भारतीय विज्ञान परिषदेच्या 106 सत्राचे उद्‌घाटन करतांना मला अतिशय आनंद होत आहे. मान्यवर शास्त्रज्ञ, अभ्यासक आणि विद्यार्थी यांच्या सहवासात राहण्याची संधी मिळणे ही अतिशय समाधानाची बाब आहे. इथे वेळेवर पोहोचण्याची माझी इच्छा होती, मात्र धुक्यामुळे उशीर झाला.

मित्रांनो, मला या गोष्टीचा आनंद आहे की, या समृद्ध भूमीवर यंदा होत असलेल्या भारतीय विज्ञान परिषदेत एक महत्वाचा विषय हाती घेतला आहे, ‘भविष्यातील भारत, विज्ञान आणि तंत्रज्ञान’. माझे असे स्पष्ट मत आहे की, भारताची महानता, त्याच्या ज्ञान-विज्ञानात आहेच, मात्र या महानतेचा मूळ उद्देश आपले विज्ञान तंत्रज्ञान आणि संशोधन याचा उपयोग समाजासाठी करणे, हा आहे.

मित्रांनो, भारतीय विज्ञान परिषदेला एक संपन्न वारसा लाभला आहे. नामवंत वैज्ञानिक जी सी बोस, सी वी रामन, मेघनाथ साहा आणि एस एन बोस यांनी हा वारसा अधिक समुद्ध केला आहे. अत्यंत अपुऱ्या संसाधनात संघर्ष करत त्यांनी आपले विचार आणि संशोधनाच्या माध्यमातून जनतेची सेवा केली. त्यांची कामाविषयीची कटिबध्दता आणि सर्जनशीलता आजही आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.

1917 साली आचार्य जगदीश चंद्र बोस यांनी भारताच्या पहिल्या विज्ञान संशोधन केंद्राची, ‘बोस इन्स्टिट्यूट ऑफ कलकत्ताची’  स्थापना केली. या केंद्राच्या उद्‌घाटनप्रसंगी त्यांनी केलेल्या भाषणातून विज्ञानाविषयीच्या त्यांच्या सर्वव्यापी दृष्टिकोनाचे दर्शन आपल्याला घडते. ते म्हणाले होते, आज ज्या संस्थेचे राष्ट्रार्पण होत आहे, ती केवळ एक विज्ञान प्रयोगशाळा नसून , देशाचे एक मंदिर आहे.भारतातील शेकडो वैज्ञानिकांचे जीवनकार्य म्हणजे तंत्रज्ञान विकासासोबतच देशबांधणीसाठी असलेल्या सखोल मूलभूत  दृष्टिकोनाचे मूर्तिमंत उदाहरण आहे. विज्ञानाच्या आपल्या आधुनिक मंदिरांमुळेच भारतात आज परिवर्तन होत असून शाश्वत उज्ज्वल भविष्याच्या दिशेने त्याची वाटचाल सुरु आहे.

मित्रांनो, आपले माजी पंतप्रधान, लालबहादूर शास्त्री जी यांची घोषणा होती, ‘जय जवान, जय किसान!वीस वर्षांपूर्वी पोखरण येथे दिलेल्या ऐतिहासिक भाषणात पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानाने भारताच्या प्रगतीत दिलेल्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे. ते म्हणाले होते, ‘जय जवान, जय किसान, जय विज्ञान!

आता याच क्षेत्रात आणखी एक पाऊल पुढे टाकण्याची गरज आहे. जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान!म्हणजे-जय संशोधन !!

दोन उद्दिष्टे साध्य करण्यातून आपण विज्ञानाची कास धरु शकतो.पहिले म्हणजे, व्यापक आणि सखोल ज्ञान असलेली, आमूलाग्र परिवर्तनाची क्षमता असलेली पिढी निर्माण करणे. दुसरे म्हणजे, त्या ज्ञानाचा उपयोग सामाजिक-आर्थिक कल्याणासाठी करणे. आपण आपल्या संशोधन विकासाच्या संस्कृती आणि धोरणाला चालना देत असतांनाच, नवोन्मेष आणि स्टार्टअप वर भर द्यायला हवा.

आपल्या वैज्ञानिकांना संशोधनासाठी प्रोत्साहन मिळावं, यासाठी आमच्या सरकारने अटल नवोन्मेष अभियान सुरु केलं. गेल्या चार वर्षात, अनेक ठिकाणी संशोधन प्रयोगशाळा सुरु करण्यात आल्या आता उद्योगक्षेत्राने स्टार्टअप कंपन्यांना योग्य दिशा, दृष्टी, मार्गदर्शन आणि भागीदारीतून सहकार्य करायला हवे. आपल्या शास्त्रज्ञांनी देखील जनतेला स्वस्त घरे, आरोग्य सुविधा, स्वच्छ हवा, पाणी आणि ऊर्जा, कृषी उत्पादन आणि अन्नप्रक्रिया अशा क्षेत्रात संशोधन करुन जनतेला त्याचा लाभ मिळवून द्यावा.विज्ञान सर्वव्यापी असले तरी तंत्रज्ञान मात्र स्थानिक गरजांनुसार असावे. स्थानिक गरजा आणि परिस्थितीवर मात करण्यासाठी त्यातून तोडगा काढता यायला हवा.

मित्रांनो, आज आपल्या समोर जी सामाजिक आर्थिक आव्हाने आहेत, त्यांचा सामना करण्यासाठी, भारतीय संशोधन प्रयोगशाळा आणि वैज्ञानिक संस्थाना साधे सुलभ आणि किफायतशीर उपाय शोधावे लागतील. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आपल्या देशात, 2 हेक्टरपेक्षाही कमी जमीन असलेल्या  शेतकऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. त्यांना कमी भूमीवर,कमी श्रमात अधिक उत्पादन देणाऱ्या कृषी तंत्रज्ञानाची नितांत गरज आहे. आम्ही कृषी विज्ञानात मोठी प्रगती केली आहे. आपल्याकडे कृषीउत्पादन वाढले आहे, दर्जा सुधारला आहे, मात्र  नवभारताच्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यात आणखी बरेच काही करण्याची आवश्यकता आहे, संशोधनाचा विस्तार आवश्यक आहे.

बिग डाटा ऍनालिसिस, कृत्रिम बुद्धिमत्ता, ब्लॉक चेन आणि संपर्कक्षेत्राशी संबंधित सर्व तंत्रज्ञानाचा योग्य वापर कृषीक्षेत्रात कसा करता येईल, यावर आपण भर दयायला हवा.

आज या सगळ्या संशोधनांसोबत, सेन्सर तंत्रज्ञान, ड्रोन, उपग्रह इमेजिंग आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या सगळ्यांना एकत्र करुन त्याचा शेतकऱ्यांना लाभ मिळवून देणे ही काळाची गरज आहे.

मित्रांनो, ज्या प्रकारे आपण उद्योगस्नेही व्यवसायनिर्मितीच्या क्षेत्रात सातत्याने प्रगती करतो आहोत,त्याचप्रकारे आपल्याला सव्वाशे कोटी भारतीयांचे आयुष्य अधिक सुखकर करण्यासाठी वेगाने काम करण्याची गरज आहे. त्याची दिशा काय असावी, ते निश्चित करण्यासाठी काही प्रश्नांवर मंथन होण्याची गरज आहे. आपल्या देशातल्या कमी पावसाच्या प्रदेशात आपण शास्त्रीय दृष्टीने दुष्काळ व्यवस्थापनासाठी काम करु शकतो का ? पाऊस , वादळ आणि इतर नैसर्गिक संकटांची पूर्वसूचना देणारे हवामान शास्त्र अधिक अचूक करु शकतो का ? यातून कृषी क्षेत्राला तर लाभ होईलच; शिवाय, अनेक जीवही वाचवता येतील.

 आपल्या देशात गेल्या कित्येक दशकांपासून असलेली कुपोषणाची समस्या कायमस्वरूपी दूर करण्यासाठी आपण काही तंत्रज्ञान आधारित तोडगा काढू शकतो का? अशा काही पद्धती, ज्यातून आपल्या मुलांचे आरोग्य सुधारु शकेल? आपण आपल्या मुलांना चिकनगुनिया आणि एनसेफ्लायटिस सारख्या आजारांपासून वाचवून, त्यांचे देशातून उच्चाटन करण्यासाठी उपाय शोधू शकतो का? कचऱ्यापासून ऊर्जा आणि स्वच्छतेसाठी स्वस्त आणि अधिक उत्पन्न देणारे तंत्रज्ञान विकसित करु शकतो का? पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पुनर्वापर आणि जलसंवर्धन यात नवनवे तंत्रज्ञान विकसित करु शकतो का ? आपल्या महत्वाच्या संस्थांना अभेद्य सायबर सुरक्षेचे कवच मिळेल, अशी काही व्यवस्था आपण निर्माण करु शकतो का? सौर ऊर्जेचा वापर गरीबांनाही करता यावा, यासाठी आपण काही संशोधन करु शकतो का ? ह्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला शोधावी लागतील.

विज्ञानाचा उपयोग सर्वसामान्य माणसाचे आयुष्य सुखकर करण्यासाठी आपण करायला हवा.वेगाने बदलत असलेल्या या जगात आपल्याला आता थांबता येणार नाही. इतर कोणी करो न करो, आपल्याला ही सुरुवात करायला हवी. विज्ञान लोकोपयोगी करण्यासाठी आपण नेतृत्व स्वीकारायला हवं, आपल्याला जगात काहीतरी करुन दाखवायचं आहे, त्यासाठी आपल्याला काळानुरूप उपाययोजना शोधाव्या लागतील, ते ही निश्चित कालावधीत.

मित्रांनो, वर्ष 2018 भारतीय विज्ञान क्षेत्रासाठी उत्तम वर्ष ठरले. आपल्या विविध लक्षणीय कामगिरीमध्ये, हवाई इंधनाच्या दर्जाच्या जैव-इंधनाची निर्मिती, दृष्टीबधित मुलांसाठी दिव्य नयनया उपकरणाची निर्मिती, क्षयरोग, डेंग्यू आणि सर्व्हायकल कॅन्सरच्या निदानासाठी अत्यंत किफायतशीर अशा उपकरणाची निर्मिती,सिक्कीम आणि दार्जिलिंगमध्ये  प्रत्यक्ष वेळेत (रियल टाईम) भूस्खलनाची यंत्रणा विकसित करणे, असे लक्षणीय यश या वर्षात मिळाले आहे. मात्र अजून बरेच काही साध्य करायचे आहे. आपल्या संशोधन आणि विकास क्षेत्रातील शोध, यश औद्योगिक उत्पादनांसाठी वापरणे आणि त्याचा जास्तीत जास्त व्यवसायिक उपयोग करुन घेण्यासाठी अजून बरेच मार्ग शोधायचे आहेत.

भविष्य बदल आणि जोडलेल्या तंत्रज्ञानाशी निगडित असणार आहे. देशाच्या समृद्धीसाठी आपण बदल घडवायला हवेत, त्यांची जोपासना करुन त्या बदलांशी जुळवून घ्यायला शिकलं पाहिजे.वैज्ञानिक प्रबंध प्रकाशित होण्यात भारताचे जगात पहिल्या पाच देशांमध्ये स्थान आहे, अशी उपलब्ध आकडेवारी सांगते. ही काही छोटी गोष्ट नाही, निश्चितच कौतुकास्पद बाब आहे. उन्नत भारत, आधुनिक भारत, वैज्ञानिक भारताच्या निर्मितीचा हा भक्कम पाया आहे.

मित्रांनो, उन्नत भारत निर्माण करण्यासाठी आज भारताच्या विज्ञानाला महत्वाकांक्षी बनण्याची गरज आहे. आपल्याल केवळ स्पर्धा करायची नाही,तर आपलं श्रेष्ठत्व सिद्ध करायचं आहे. आपल्याला केवळ संशोधन म्हणून एखादा शोध लावायचा नाही, तर आपली तथ्ये अशा पातळीवर न्यायची आहेत, जिथे सगळे जग आपले अनुकरण करेल.

आणि हे धेय्य साध्य करण्यासाठी आपल्याला संशोधनाला पूरक असे वातावरण, अशी इको सिस्टीम तयार करावी लागेल. आज अशा तंत्राची सर्वाधिक गरज आहे.मग ते हवामान बदल असो अथवा कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा लोकसंख्येचा वापर असो अथवा जैव तंत्रज्ञान आणि डिजिटल बाजारपेठ. या सगळ्यांच्या एकत्रित साखळी व्यवस्थेतून आपण आपल्या देशातील गुणवत्तेचा अधिकाधिक लाभ मिळवू शकतो.

जर आपल्याला भविष्यात ज्ञान आधारित समाजाच्या जागतिक नेत्यांच्या यादीत स्थान मिळवायचे असेल, तर आपली संशोधन क्षमता वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे लागतील. आपल्याला एक उद्दिष्ट निश्चित करुन त्यानुसार आंतरविद्यात्मक संशोधने करावी लागतील.

मित्रांनो, कोणत्याही देशाची बौद्धिक सृजनशीलता आणि ओळख त्याचा इतिहास, कला, भाषा आणि संस्कृती यातून निर्माण होते. त्यामुळे आपल्याला विविध विद्या आणि शास्त्रे यांच्या बंधनातून मुक्त होत,व्यापक संशोधन करावे लागेल. आता अशा संशोधनांची गरज आहे, कला आणि मानवविकास, सामाजिक शास्त्रे, विज्ञान आणि तंत्रज्ञान या सगळ्यांविषयीचे एकत्रित संशोधन असेल. हेच आपल्या देशाची अधिक सशक्त आणि गौरवास्पद ओळख निर्माण करेल.

मित्रांनो, आपल्याला हे लक्षात ठेवायला हवे की आपले प्राचीन ज्ञान संशोधनावरच आधारलेले होते. भारतातील विद्वानांनी विज्ञानापासून तर्कशास्त्र आणि वैद्यकीय चिकित्सेपासून ते दर्शनापर्यत सगळ्या ज्ञानाने जगाला प्रकाशित केले आहे,ज्ञानदीप उजळले आहेत. आज भारताला जगात पुन्हा तेच स्थान मिळवायची वेळ आली आहे. आणि हे तेव्हाच शक्य होईल, जेव्हा आपण जगातल्या पहिल्या तीन अर्थव्यवस्थापैकी एक होऊन आपले संशोधन आणि नवोन्मेष यांच्या आधारे जगाला दिशा देऊ.

मित्रांनो, संशोधन आणि विकासातील आपली ताकद आपल्या राष्ट्रीय प्रयोगशाळा,केंद्रीय विद्यापीठे, आय आय टी, आय आय एस, टी आय एफ आर आणि आय एस ई आर अशा संस्थांवर आधारलेली आहे. मात्र, केवळ 95 टक्यांपेक्षा जास्त विद्यार्थी राज्यांच्या विद्यापीठामध्ये शिकतात, जिथे आजही संशोधनाला खूप मर्यादित वाव आहे. अशी सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये संशोधन व्यवस्थेची साखळी निर्माण करण्याची खूप आवश्यकता आहे. पंतप्रधान विज्ञान तंत्रज्ञान आणि नवोन्मेष परिषदेला मी विनंती करेन की त्यांनी या मुद्यांवर सविस्तर चर्चा करावी आणि मनुष्यबळ विकास मंत्रालयाशी सल्लामसलत करुन आपली महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये संशोधनाला चालना देणारा कृती आराखडा तयार करावा.

मित्रांनो, भारतीय विज्ञान परिषदेतच्या तिरुपती येथे झालेल्या सत्रात, मी फायबर फिजिकल सिस्टीम्सच्या जागतिक विकासाविषयी बोललो होतो. यामुळे आपल्या लोकसांख्यिकीय आधारावर विकासाच्या प्रयत्नांना मोठे आव्हान निर्माण होऊ शकते. मात्र संशोधनामुळे आपण ह्या आव्हानांचे संधीत रूपांतर करु शकतो. त्यासाठी संशोधन, प्रशिक्षण आणि कौशल्ये आत्मसात करण्याची गरज आहे. रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, बिग डाटा ऍनालिटिक्स अशा आधुनिक संकल्पनांवर संशोधन करायला हवे.

सरकारने आंतरविद्याशाखीय सायबर फिजिकल सिस्टीम्स वर एक राष्ट्रीय अभियान सुरु करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. या अभियानाअंतर्गतसंशोधन आणि विकास, तंत्रज्ञान विकास, मनुष्यबळ विकास आणि कौशल्ये, नवोन्मेष, स्टार्ट अप इको सिस्टीम आणि उद्योग तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर समन्वय अशा सर्व पैलूंवर काम केले जाईल.

डाटा म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेला चालना देणारे इंजिन आहे.आपले शास्त्रज्ञ संबंधित मंत्रालयांसोबत काम करत असून प्रभावी डाटा धोरण आणि वापर ज्यातून डाटा निर्मिती, डाटा संरक्षण, माहितीचे आदान प्रदान, आणि त्याचा वापर यासाठी योग्य भूमी तयार केली जाईल.

मित्रांनो, अलिकडेच आपण यशस्वीपणे राबवलेल्या अंतरिक्ष मोहिमांमधून आपले सामर्थ्य आणि कौशल्य याची साक्ष आपल्याला पटते. अलीकडेच आपण कार्टो सॅट-2 आणि हायपर स्पेशल इमेजिंग याच्याशी संबंधित 30 आणखी उपग्रह अवकाशात सोडले आहेत. वर्ष 2020-22 पर्यत तीन भारतीयांना आपल्या गगनयान मधून अंतराळात पाठवण्याची तयारी वेगाने सुरू आहे.

इस्रोने यासाठी एका विशेष तंत्रज्ञानाच्या क्र्यू एस्केप सिस्टीमचे प्रात्यक्षिक देखील केले आहे. आपले शास्त्रज्ञ गगनयान चे आपले स्वप्न निश्चित वेळेत पूर्ण करतील असा मला पूर्ण विश्वास आहे.

मित्रांनो, अशी अनेक क्षेत्रे आहेत, जिथे वैज्ञानिक आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात परिवर्तन घडवले जाऊ शकते. आपण तंत्रज्ञानाच्या मदतीने सतत कार्यरत रेफरन्स स्टेशन्स नेटवर्क बनवू शकत नाही का? यामुळे आपल्याला हाय रिसोल्युशन जिओ स्पेशल डिजिटल डाटा जलद गतीने मिळू शकेल. आपले खलाशी, वैज्ञानिक, नियोजनाशी संबंधित लोकांना अधिक अचूक माहिती मिळू शकेल. विकासाच्या विविध योजनांवर देखरेख, नियोजन, व्यवस्थापन आणि अंमलबजावणी देखील यामुळे अधिक प्रभावीपणे करता येईल.

मित्रांनो, गेल्या वर्षी जेव्हा इंफाळ येथे भारतीय विज्ञान परिषदेचा कार्यक्रम झाला होता तेव्हा मी तुम्हा सर्वांना एक आवाहन केलं होतं की तुम्ही शास्त्रज्ञांनी सिकलसेल ऍनिमिया वर प्रतिबंध आणि उपचार करणारे सोपे सहज आणि किफायतशीर उपाय शोधा. आपला आदिवासी समाज या आजाराने पीडित आहे. मला सांगायला आनंद होत आहे की सीएसायआर आणि डीबीटी यांनी यासाठी एक अभियान सुरु केले आहे. या दोन्ही संस्थांचे शास्त्रज्ञ आता या आजारावर प्रतिबंध आणि उपचार यासोबतच, अशी जेनेटिक थेरेपी शोधून काढत आहेत, ज्यामुळे हिमोग्लोबिन शी संबधित सर्व विकार दूर केले जाऊ शकतात.

मित्रांनो, भारताला विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष यासाठी भविष्याचा वेध घेणारा एक आराखडा तयार करण्याची गरज आहे. हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून आम्ही नुकतीच प्रधान विज्ञान तंत्रज्ञान आणि नवोन्मेष सल्लागार परिषद स्थापन केली आहे. या परिषदेमुळे आपल्याला विज्ञान तंत्रज्ञान संशोधनाशी समन्वय, तसेच विविध हितसंबंधी गटांशी, मंत्रालयांशी संपर्क साधून बहुहिताचे धोरणात्मक निर्णय राबवले जातील. केंद्र सरकार शिक्षणाचा, विशेषतः उच्च शिक्षणाचा दर्जा वाढवण्यावर भर देत आहे. आम्ही उच्च शिक्षण क्षेत्रात उदारमतवादी धोरण अवलंबले आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने श्रेणी आधारित स्वायत्तता नियमन केले असून त्यामुळे उत्तम शैक्षणिक दर्जा असलेली महाविद्यालये आणि विद्यापीठांना कार्य आणि वित्तीय स्वायत्तता देण्यात येते. जागतिक शिक्षणसंस्थांशी सामना करु शकेल, अशा शिक्षणसंस्था देशात स्थापन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही पंतप्रधान संशोधन शिष्यवृत्ती सुरु केली आहे.या योजनेअंतर्गत, हजारो बुद्धिमान विद्यार्थ्यांना देशभरातील विविध शिक्षणसंस्थामध्ये पीएचडी करण्यासाठी आयआयटी अंक आय आय एस सी सारख्या संस्थांमध्ये थेट प्रवेश दिला जातो. या योजनेमुळे दर्जेदार संशोधनाला चालना मिळेल त्यासोबतच, विविध शिक्षणसंस्थामध्ये प्राध्यापकांची असलेली कमतरता भरुन निघेल.

मित्रांनो, मला येथे आपले माजी राष्ट्रपती डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या एका वचनाची आठवण होत आहे. ते म्हणत, अतिशय विस्तृत, व्यापक कल्पनाशक्ती आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे,जगातल्या सर्व शक्तींना एका प्रेरित मनाने आपण काम करण्यास सांगू शकतो. भारतात संशोधन आणि नवक्रांतीचा पाया ठरणाऱ्या भारतीय युवकांची मने आणि मेंदू आपण कशाप्रकारे चेतवू शकतो?

भारत हा सृजनशील, उत्साही आणि आत्मविश्वास असलेल्या नव्या पिढीच्या युवकांचा देश आहे. विज्ञानाच्या माध्यमातून नव भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी या युवकांना पोषक वातावरण उपलब्ध करुन देण्यास सरकार कटिबद्ध आहे. असे भारतीय, जे आव्हाने स्वीकारण्यास तयार असतील आणि आव्हानांचे रूपांतर संधीत करतील. आज भारतात, कल्पना, ज्ञान, शहाणपण आणि कृती यांचा मुबलक साठा आहे. आज भारत अधिक मजबूत, आत्मविश्वास पूर्ण, समृद्ध आणि निरोगी आहे. आजचा भारत अधिक समावेशक आणि दयाळू असेल.

मी तुम्हाला सर्वांना सृजनशील आणि उत्तम यश देणाऱ्या 2019 च्या शुभेच्छा !!

धन्यवाद !! खूप खूप धन्यवाद !!

B.Gokhale/R.Aghor/P.Malandkar

 



(Release ID: 1558842) Visitor Counter : 208


Read this release in: English