पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांच्या हस्ते बोगीबील पुलाचे राष्ट्रार्पण


पहिल्या प्रवासी रेल्वे गाडीला हिरवा झेंडा

Posted On: 25 DEC 2018 5:44PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 डिसेंबर 2018

 

आसाममधल्या बोगीबील पुलाचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रार्पण झाले.  आसाममध्ये डिब्रुगड आणि धेमाजी जिल्ह्यात ब्रह्मपुत्रा नदीवरचा हा पूल देशासाठी आर्थिक आणि व्यूहरचनात्मकदृष्ट्या महत्वाचा आहे. या पुलावरुन जाणाऱ्या पहिल्या प्रवासी रेल्‍वे गाडीला ब्रह्मपुत्रेच्या उत्तर किनाऱ्यावर कारेंग चापोरी इथे एका जनसभेत पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवला.

सभेत पंतप्रधानांनी अलिकडेच निधन झालेल्या प्रसिद्ध आसामी गायिका दीपाली बोरठाकूर यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच विविध क्षेत्रात देशाचे आणि राज्याचे नाव उंचावणाऱ्या अनेक प्रसिद्ध व्यक्तींना पंतप्रधानांनी आदरांजली वाहिली. त्यांनी नागरिकांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची आज जयंती असून, आजचा दिवस सुशासन दिवस म्हणून साजरा केला जातो, असे पंतप्रधानांनी सांगितले.

गेली साडे चार वर्षे केंद्र सरकार सुशासनाचे उद्दिष्ट ठेवून कार्यरत आहे. ऐतिहासिक बोगीबील रेल्वे-कम-रस्ते पुलाचे राष्ट्रार्पण हे या उद्दिष्टाचे प्रतीक आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. हा पूल म्हणजे अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाच्या ताकदीचे प्रतीक असून, व्यूहरचनात्मकदृष्ट्या अत्यंत महत्वाचा आहे. या पुलामुळे आसाम आणि अरुणाचल प्रदेशमधले अंतर कमी झाले असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. यामुळे या प्रदेशातल्या नागरिकांचे जीवन सुलभ होणार आहे. हा पुल, या प्रदेशातल्या लोकांचे पिढ्यानुपिढ्यांचे स्वप्न होते. आणि आता ते वास्तवात उतरले असल्याचे पंतप्रधान म्हणाले. डिब्रुगड हे या क्षेत्रातले महत्वाचे वैद्यकीय, शैक्षणिक आणि वाणिज्य केंद्र असून, ब्रह्मपुत्रेच्या उत्तर भागात राहणाऱ्या लोकांना या शहरात जाणे आता सोपे होणार आहे, असे त्यांनी सांगितले.

या पुलाच्या बांधकामात सहभागी असलेल्यांचे पंतप्रधानांनी कौतुक केले. आसाममधल्या साडिया इथे देशातील सर्वाधिक लांबीच्या रस्ते पुलाचे, भूपेन हजारिका पुलाचे मे 2017 मध्ये राष्ट्रार्पण पंतप्रधानांच्या हस्ते झाले होते. त्या आठवणींनाही पंतप्रधानांनी उजाळा दिला.

गेल्या 60-70 वर्षात बुह्मपुत्रा नदीवर केवळ तीन पुल बांधण्यात आले होते, तर केवळ गेल्या साडेचार वर्षात आणखी तीन पूल बांधण्यात आले. आणखी पाच प्रगतिपथावर असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. ब्रह्मपुत्रेच्या उत्तर आणि दक्षिण किनाऱ्यांमधे वाढलेले हे दळणवळण सुशासनाचा घटक असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. प्रगतीचा हा वेग ईशान्य भारताचे परिवर्तन घडवेल, असे पंतप्रधानांनी सांगितले.

वाहतुकीच्या माध्यमातून परिवर्तनाबाबतचा केंद्र सरकारचा दृष्टिकोन पंतप्रधानांनी मांडला. देशात पायाभूत सुविधांची वेगाने प्रगती होत असल्याचे ते म्हणाले.

प्रलंबित प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आसाम सरकार करत असलेल्या प्रयत्नांचे पंतप्रधानांनी कौतुक केले. साडेचार वर्षात जवळपास 700 किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण झाले असल्याचे ते म्हणाले. ईशान्य भारतात दळणवळणाशी संबंधित इतर प्रकल्पांचाही त्यांनी उल्लेख केला. समृद्ध आणि प्रगतीशील पूर्व भारत, ही समृद्ध आणि प्रगतीशील भारताची गुरुकिल्ली असल्याचे ते म्हणाले. पायाभूत सुविधांखेरीज आसाममध्ये वेगाने सुरु असलेल्या इतर अनेक उपक्रमांचा जसे की उज्ज्वला, स्वच्छ भारत अभियान, यांचा उल्लेख पंतप्रधानांनी केला.

दुर्गम भागातले युवक आज देशाला नावलौकिक मिळवून देत आहेत. आसाममधील क्रीडापटू हिमा दासचा उल्लेख करुन पंतप्रधान म्हणाले की युवापिढी नवभारताच्या आत्मविश्वासाचे प्रतीक होत आहे.

भारताच्या भविष्यातल्या गरजांसाठी पायाभूत सुविधा उभारण्याकरिता सरकार प्रयत्न करत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

 

 

 

B.Gokhale/S. Kakade/D. Rane

 

 

 


(Release ID: 1557302) Visitor Counter : 205


Read this release in: English