मंत्रिमंडळ
ब्रिक्स देशांदरम्यान पर्यावरण सहकार्याबाबत सामंजस्य कराराला मंत्रिमंडळाची मंजुरी
प्रविष्टि तिथि:
24 OCT 2018 3:59PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 ऑक्टोबर 2018
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने ब्रिक्स देशांदरम्यान करण्यात आलेल्या पर्यावरण सहकार्याबाबत सामंजस्य करारालाकार्योत्तर मंजुरी दिली आहे. जुलै २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग इथे १० व्या ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या.
या करारात पुढील क्षेत्रातील सहकार्याचा समावेश आहे:
- हवेची गुणवत्ता;
- जल
- जैव विविधता;
- हवामान बदल
- कचरा व्यवस्थापन
- शाश्वत विकास आणि शाश्वत विकास उद्दिष्टांच्या प्राप्तीसाठी 2030 कार्यक्रमाची अंमलबजावणी , आणि
- परस्पर सहमतीची अन्य क्षेत्रे
सामंजस्य करारामुळे ब्रिक्स देशांदरम्यान परस्पर आदान-प्रदान आणि सामायिक हिताच्या आधारे पर्यावरण संरक्षण आणि नैसर्गिक साधनसंपत्तीच्या व्यवस्थापनासाठी दीर्घकालीन भागीदारी स्थापन होईल. यामध्ये संबंधित देशांचे लागू असलेल्या कायदेशीर तरतुदी विचारात घेतल्या जातील.
वाढत्या पर्यावरण समस्या आज केवळ एका देशापुरत्या मर्यदित राहिलेल्या नाहीत. तर संपूर्ण जगासाठी आव्हान बनल्या आहेत. या कराराच्या माध्यमातून
ब्राझील , रशिया , भारत, चीन आणि दक्षिण अफ्रीका सारख्या पाच मोठ्या अर्थव्यवस्था असलेल्या देशांनी पर्यावरण वाचवण्यासाठी, त्याच्या रक्षणासाठी आणि त्याच्या संवर्धनासाठी आपली कटिबद्धता व्यक्त केली आहे. या देशांमध्ये जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी 40 टक्के लोकसंख्या आहे.
या करारामुळे हवामान बदल आणि वन्यजीव संरक्षणासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि सर्वोत्तम पद्धतीचा वापर होण्याची शक्यता आहे. या करारामुळे ब्रिक्स देशांच्या सरकारी आणि खासगी क्षेत्राला शाश्वत विकास आणि पर्यावरण रक्षण क्षेत्रात आपले अनुभव, तांत्रिक ज्ञान आणि सर्वोत्तम पद्धतींचे आदान प्रदान करण्याची संधी मिळेल. तसेच परस्पर हिताच्या क्षेत्रात प्रकल्प सुरु करण्याच्या शक्यता निर्माण होतील.
N.Sapre/S.Kane/P.Kor
(रिलीज़ आईडी: 1550528)
आगंतुक पटल : 135
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English