पंतप्रधान कार्यालय
एनएचआरसीच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिन समारंभाला पंतप्रधानांचे संबोधन
Posted On:
12 OCT 2018 6:17PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 ऑक्टोबर 2018
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिन समारंभाला संबोधित केले. गेल्या अडीच दशकांमध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने समाजातील वंचित आणि शोषितांचा आवाज बनून राष्ट्र उभारणीच्या कार्यात योगदान दिले असे पंतप्रधान म्हणाले. मानवी हक्कांचे संरक्षण हा आपल्या संस्कृतीचा महत्त्वपूर्ण भाग असल्याचे त्यांनी सांगितले. स्वातंत्र्यानंतर स्वतंत्र आणि निष्पक्ष न्यायव्यवस्था, सक्रीय माध्यमे, सक्रीय नागरी समाज आणि एनएचआरसीसारख्या संघटनांमुळे मानवी हक्कांचे रक्षण झाल्याचे ते म्हणाले.
मानवी हक्क हे केवळ घोषवाक्य न राहता आपल्या रुढींचा एक भाग बनायला हवा, असे ते म्हणाले. गेल्या चार वर्षात गरीबांचे जीवनमान सुधारण्यासाठी गांभीर्याने प्रयत्न केले गेल्याचे त्यांनी सांगितले. मानवाच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यावर सरकारचा भर राहिल्याचे त्यांनी सांगितले. यासंदर्भात, त्यांनी बेटी बचाओ, बेटी पढाओ, सुगम्य भारत अभियान, प्रधानमंत्री आवास योजना, उज्वला योजना आणि सौभाग्य योजनांच्या यशाचा तसेच त्यामुळे लोकांच्या जीवनात आलेल्या परिवर्तनाचा उल्लेख केला. 9 कोटींहून अधिक शौचालये बांधण्यात आल्यामुळे कोट्यवधी गरीब लोकांची प्रतिष्ठा आणि स्वच्छता सुनिश्चित झाल्याचे ते म्हणाले. आयुष्यमान भारत अंतर्गत अलिकडेच सुरू करण्यात आलेल्या आरोग्य विमा योजनेचा त्यांनी उल्लेख केला. केंद्र सरकारच्या आर्थिक समावेशकता उपक्रमाची त्यांनी माहिती दिली. मुस्लीम महिलांना तिहेरी तलाकापासून दिलासा देणारा कायदा हा देखील लोकांच्या मूलभूत हक्क जपण्याच्या उपाययोजनांचा एक भाग असल्याचे ते म्हणाले.
न्याय मिळवणे सुलभ बनवण्यासाठी ई न्यायालयांची संख्या वाढवणे आणि राष्ट्रीय न्यायालयीन माहिती ग्रीड बळकट करणे यासारख्या उपाययोजनांचा पंतप्रधानांनी उल्लेख केला. आधार हे तंत्रज्ञान आधारित सक्षमीकरण उपाययोजना असल्याचे त्यांनी सांगितले.
लोकसहभागामुळे या सर्व उपाययोजना यशस्वी झाल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. मानवी हक्कांच्या जागरुकतेबरोबरच नागरिकांनी त्यांची कर्तव्य आणि जबाबदाऱ्या याबाबतही जागरुक असावे असे ते म्हणाले. ज्यांना आपल्या जबाबदाऱ्या माहित आहेत त्यांना इतरांच्या हक्कांचा आदर करणे माहित असते, असे ते म्हणाले.
शाश्वत विकासाची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
B.Gokhale/S.Kane/P.Kor
(Release ID: 1549598)
Visitor Counter : 127