पंतप्रधान कार्यालय

हरयाणामध्ये रेल्वे डब्यांच्या कारखान्याच्या पायाभरणी प्रसंगी पंतप्रधानांचे भाषण

Posted On: 09 OCT 2018 9:31PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 9 ऑक्टोबर 2018

 

मी म्हणेन, - सर छोटूराम

आपण सर्व म्हणाल, दोन वेळा म्हणाल, - अमर राहो, अमर राहो.

सर छोटूराम – अमर राहो, अमर राहो.

सर छोटूराम – अमर राहो, अमर राहो.

सर छोटूराम – अमर राहो, अमर राहो.

सर छोटूराम – अमर राहो, अमर राहो.

देशाच्या सीमेवर संरक्षण करणारे वीर जवान, देशाच्या कोट्यवधी लोकसंख्येचे उदरभरण करणारे शेतकरी आणि क्रीडास्पर्धांमध्ये सर्वात जास्त पदके जिंकून आणणारे खेळाडू देणाऱ्या, हरियाणाच्या या धरतीला मी अभिवादन करतो. देशाचे नाव आणि स्वाभिमान उंचावण्यात हरियाणावासियांना तोड नाही.

मंचावर विराजमान हरियाणाचे राज्यपाल श्री सत्यदेव नारायण आर्य जी,  केंद्रीय मंत्री परिषदेतील माझे सहकारी चौधरी वीरेंद्र सिंह जी, कृष्णपाल गुर्जर जी, हरियाणाचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री मनोहर लाल जी, जम्मू काश्मीरचे राज्यपाल श्री सत्पाल मलिक जी, हिमाचल प्रदेशचे राज्यपाल आणि याच धरतीचे सुपुत्र श्री आचार्य देवव्रत, हरियाणा सरकारमधील मंत्री आणि आमचे जुने सहकारी, भाई ओ पी धनगड जी, आमदार सुभाष बराला जी आणि हरियाणा बरोबरच पंजाब आणि राजस्थान मधून आलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो,

मी आज आपले दीनबंधू छोटूराम यांची मूर्ती आपल्याकडे सोपवण्यासाठी आलो आहे. माझ्यासाठी यापेक्षा मोठा आनंदाचा दिवस कोणता असेल..?

मित्रहो, आज मला सांपलामध्ये शेतकऱ्यांचा आवाज असणारे शेतकऱ्यांचे दैवत, दीनबंधू चौधरी छोटूरामजी यांच्या भव्य आणि विशाल  मूर्तीचे अनावरण करण्याची संधी मिळाली, हे माझे सौभाग्य आहे. या ठिकाणी येण्यापूर्वी मी चौधरी छोटूराम यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या संग्रहालयातही गेलो होतो. आता या संग्रहालयाबरोबरच हरियाणामधील सर्वात मोठी मूर्ती असणारे ठिकाण, अशी सांपला रोहतकची आणखी एक ओळख झाली आहे. याच ऑक्टोबर महिन्यात मला शेतकऱ्यांचे दैवत असणारे छोटूरामजी यांची हरियाणामधील सर्वात मोठी मूर्ती लोकार्पण करण्याचे भाग्य मिळाले आहे आणि याच महिन्यात ३१ ऑक्टोबर रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त त्यांची जगातील सर्वात मोठी मूर्ती लोकार्पण करण्याचे भाग्यही मला मिळणार आहे.

हे दोन्ही महापुरुष शेतकरी होते, शेतकऱ्यांसाठी होते आणि त्यांनी देशासाठी शेतकऱ्यांना परस्परांशी जोडण्याचे काम केले. दुसरे वैशिष्ट्य असे की, ही मूर्ती श्री सुतारजी यांनी निर्माण केली आहे. त्यांचे वय 90 वर्षांपेक्षा जास्त आहे, तरीही ते काम करत आहेत.  याच आपल्या सुतारजी यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांची जगातील सर्वात उंच मूर्ती घडवली आहे. हरियाणा, राजस्थान आणि पंजाबबरोबरच संपूर्ण देशभरातील आमच्या सर्व जागरूक नागरिकांचेही मी अभिनंदन करतो.

बंधू आणि भगिनींनो, आपल्या देशात वेळोवेळी अशा अनेक महान व्यक्ती जन्म घेत असतात, जे आपले संपूर्ण जीवन केवळ आणि केवळ समाजाची सेवा आणि देशाला मार्गदर्शन करण्यासाठी समर्पित करतात. कितीही गरिबी असो, अभाव असो, अडचणी असो, संघर्ष असो, अशा व्यक्ती प्रत्येक आव्हानाचा मुकाबला करत स्वतःचे आयुष्य वेचून समाजाला सक्षम करत राहतात. हरियाणाच्या या धरतीवर चौधरी छोटूरामजींचा जन्म झाला, ही आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची बाब आहे.

चौधरी छोटूरामजी देशातील अशा काही सुधारकांपैकी होते, ज्यांनी भारताच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावली. ते शेतकरी, मजूर, वंचित आणि शोषितांचा बुलंद आवाज होते. समाजात भेदभाव निर्माण करणाऱ्या प्रत्येक शक्तीसमोर ते ठामपणे उभे राहिले. शेतीशी निगडित समस्या, शेतकरी आणि लघु उद्योजकांसमोर येणाऱ्या अडचणी आणि आव्हाने त्यांनी फार जवळून पाहिल्या, समजून घेतल्या आणि ती आव्हाने कमी करण्याचा प्रयत्न केला.

मित्रहो, सर छोटूरामजींचा आत्मा जिथे कुठे असेल,  आज सोनीपतमध्ये एका अत्याधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण अशा रेल्वे डबे कारखान्याची पायाभरणी झाली, हे पाहून त्यांना निश्चितच आनंद झाला असेल. सुमारे 500 कोटी रुपये खर्चून हा कारखाना उभारला जाणार आहे. या कारखान्यात दरवर्षी प्रवासी रेल्वे गाडीच्या 250 डब्यांची दुरुस्ती आणि त्यांच्या आधुनिकीकरणाचे काम केले जाणार आहे. हा कारखाना तयार झाल्यानंतर रेल्वेचे डबे देखभालीसाठी दूरवर पाठवण्याची समस्याही संपून जाईल, तसेच या क्षेत्रात धावणाऱ्या रेल्वे गाड्यांसाठी अधिक प्रवासी डबे उपलब्ध होतील आणि लोकांना आरामशीर प्रवासाची सुविधा मिळू शकेल.

बंधू आणि भगिनींनो, हा कारखाना केवळ सोनीपत नाही तर हरियाणाच्या औद्योगिक विकासालाही हातभार लावणार आहे. रेल्वे डब्यांच्या दुरुस्तीसाठी जे सामान आवश्यक असेल, त्याची मागणी पूर्ण करण्यासाठी येथे लघु उद्योजकांना कामाच्या नव्या संधी प्राप्त होतील, त्यातून लाभ मिळेल. मग ते सीट कव्हर असो, पंखे असो, विजेच्या जोडण्या असो किंवा मग रेल्वेच्या डब्यांमध्ये आवश्यक असणाऱ्या सुविधा असो. त्या पूर्ण करण्याची सर्वात मोठी संधी हरियाणामधील लहान मोठ्या उद्योजकांना मिळेल.

तुम्ही विचार करा,  या कारखान्यामुळे येथील युवकांना रोजगाराच्या कितीतरी नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. या कारखान्यामुळे आणखी एक लाभ होईल. येथील अभियंते आणि तंत्रज्ञांना या कारखान्यामुळे रेल्वे डब्यांच्या देखभालीच्या क्षेत्रात स्थानिक कुशलताही वाढीला लावता येईल. अर्थात येथील अभियंते आणि तंत्रज्ञ या कारखान्यामुळे एक विशिष्ट प्रकारचे कौशल्य हस्तगत करतील. येणाऱ्या काळात येथील तज्ञ, देशाच्या इतर भागांमध्ये जाऊन आपल्या या कौशल्याचा लाभ तिथेही देऊ शकतील.

मित्रहो, मला अनेक वर्षे हरियाणामध्ये काम करण्याची संधी मिळाली. हे माझे सौभाग्य आहे आणि जेव्हा मी येथे पक्षाचे काम करत असे, तेव्हा सर छोटूराम यांच्याबद्दल, त्यांच्या महानतेबद्दल एखादा प्रसंग ऐकला नाही, असा एकही दिवस मला आठवत नाही. त्यांच्याबद्दल मी जे काही ऐकले, वाचले, ते प्रत्येक व्यक्तीला प्रेरणा देणारे आहे. ज्याला आव्हानांचा मुकाबला करून देश आणि समाजासाठी काही करण्याची इच्छा असेल, त्याच्यासाठी ते प्रेरक आहेत. येथेच रोहतक मध्ये चौधरी साहेब म्हणाले होते की माझ्यासाठी शेतकरी हे गरिबीचे प्रतीक आहे  आणि इंग्रज सैन्याच्या अत्याचारांविरुद्ध आवाज उठवणारे सैनिक सुद्धा हे शेतकरीच आहेत. सर छोटूराम यांचे हे शब्द होते.

मित्रहो, आज हरियाणामध्ये असे कोणतेही गाव नाही जेथील कोणता न कोणता सदस्य सैन्याशी संबंधित नाही. सैन्याशी जोडले जाऊन देशाच्या सेवेचा हा भाव जागृत करण्याचे श्रेय, दीनबंधु छोटूरामजींना जाते. त्यांनीच येथील शेतकऱ्यांना मोठ्या संख्येने सैन्यात जाण्यासाठी प्रेरित केले पहिल्या जागतिक युद्धादरम्यान येथील अनेक सैनिकांनी विश्वशांतिसाठी लढा दिला होता.

मित्रहो, आपल्या आयुष्यात त्यांना भारताचे स्वातंत्र्य पाहता आले नाही. मात्र भारतासमोरील आव्हाने, भारताच्या आशा, भारताच्या आकांक्षा आणि भारताच्या आवश्यकता त्यांनी उत्तम प्रकारे जाणल्या होत्या. ते नेहमी इंग्रजांच्या फोडा आणि राज्य करा या धोरणाच्या विरुद्ध बोलत राहिले. चौधरी छोटूरामजींमुळे आणि त्यांच्या याच विचारांमुळे प्रत्येक राजकीय विचारधारा, छोटूरामजींचा आदर करते. त्यांचे व्यक्तिमत्व किती मोठे होते, याचा अंदाज एका छोट्याश्या गोष्टीवरून येऊ शकेल. एकदा सरदार पटेलांनी सर छोटूरामजींबद्दल असे काही म्हटले होते की ते ऐकून हरियाणातील प्रत्येक नागरिकाला त्याबद्दल अभिमान वाटेल. सरदार वल्लभ भाई पटेल म्हणाले होते की जर आज चौधरी छोटूरामजी जीवित असते तर फाळणीनंतर, भारताच्या विभाजनानंतर, त्या फाळणीच्या वेळी पंजाबची काळजी मला करावी लागली नसती. छोटू रामजींनी ते सांभाळून घेतले असते. सरदार वल्लभभाई पटेलांच्या या वक्तव्यातून सर छोटूरामजींचे सामर्थ्य आणि शक्तीचा परिचय मिळतो.

पश्चिम आणि उत्तर भारताच्या एका मोठ्या भागात त्यांचा प्रभाव इतका व्यापक होता की ब्रिटिश प्रशासकांनाही त्यांच्या म्हणण्याला नकार देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करावा लागत असे. चौधरी छोटूरामजी आणि सावकाराचा एक किस्सा मी किमान शंभर वेळा ऐकला आहे. आपणा सर्वांनाही तो चांगलाच माहिती असेल. सावकाराने त्यांना कर्ज देण्याऐवजी स्वतःच सावकार होण्याचा सल्ला दिला होता. तो एक दिवस पंजाबमधील अनेक सावकारांचे नशीब ठरवणारा होता. केवळ आणि केवळ स्वत:च्या सामर्थ्याच्या बळावर संघर्ष करत चौधरीसाहेब पंजाबचे महसूल मंत्री झाले होते. बंधू आणि भगिनींनो, मंत्री असतानाही त्यांनी केवळ पंजाब नाही, तर देशभरातील शेतकऱ्यांसाठी, शेतात काम करणाऱ्या मजुरांसाठी, भारताच्या महसूल यंत्रणेसाठी, पिकाच्या पणासाठी असे अनेक कायदे तयार केले, जे आजतागायत आपल्या यंत्रणेचा भाग आहेत. शेतकऱ्यांच्या कर्जाशी संबंधित कायदा असो, हमीभावाशी संबंधित कायदा असो किंवा कृषी उत्पन्न बाजार समितीशी संबंधित कायदा असो, या सर्वांची पायाभरणी चौधरी साहेबांनी केली होती.

आणखी एक गोष्ट आपण विसरू शकत नाही, ती म्हणजे ही सगळी कामे अशा वेळी झाली जेव्हा देश गुलामगिरीत होता. चौधरी साहेबांच्या समोर सर्व प्रकारच्या मर्यादा होत्या. मात्र तरीही त्यांनी शेतकऱ्यांचा केवळ विचार केला नाही, तर शेतकऱ्यांच्या कल्याणासाठीचे काम त्यांनी प्रत्यक्ष करून दाखवले. कृषी उद्योगाला प्रोत्साहन देण्यालाही त्यांचा मोठा हातभार लागला. त्या काळात त्यांनी कापूस उद्योग आणि लघुउद्योग सक्षम करण्यावर भर दिला. देशातील शेतकऱ्यांशी संबंधित, कृषी क्षेत्राशी संबंधित प्रत्येकाला विकासा शी जोडण्यात यावे, यासाठी ते सतत उद्योजकांना प्रेरणा देत असत.

मित्रहो, छोटूरामजींची ही दूरदृष्टी पाहून चक्रवर्ती राजगोपालाचारी म्हणाले होते की चौधरी छोटूरामजी केवळ मोठे लक्ष्य निर्धारित करत नाहीत, तर ते लक्ष्य गाठण्यासाठी आवश्यक मार्गही त्यांना चांगलेच ठाऊक आहेत.

बंधू आणि भगिनींनो, देशातील अनेक लोकांना हे सुद्धा माहिती नसेल की हा जो भाक्रा धरण आहे, यामागे चौधरी साहेबांचा विचार होता. त्यांनी बिलासपूरच्या राजा सोबत भाक्रा धरणासाठी  स्वाक्षऱ्या केल्या होत्या. त्याचा लाभ पंजाब, हरियाणा, राजस्थानच्या लोकांना, शेतकऱ्यांना मिळत आहे, ते आपण पाहत आहोत. विचार करा, काय दृष्टी असेल, किती दूरदृष्टी असेल.

मित्रहो, ज्या व्यक्तीने देशासाठी इतके काही केले, इतक्या व्यापक सुधारणा केल्या, असा दृष्टिकोन बाळगला, त्याबद्दल जाणून घेणे, समजून घेणे हा प्रत्येक व्यक्तीचा अधिकार आहे. अनेकदा मला आश्चर्य वाटते की इतक्या महान व्यक्तीला एकाच क्षेत्राच्या परिघात मर्यादित ठेवण्यात आले. मला असे वाटते की, यामुळे चौधरी साहेबांची, त्यांच्या कार्याची उंची कमी झाली नाही, मात्र देशातील अनेक पिढ्या त्यांच्या आयुष्याकडून प्रेरणा घेण्यापासून वंचित राहिल्या.

बंधू आणि भगिनींनो, आमचे सरकार देशासाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सन्मानित करण्याचे काम करते आहे. गेल्या चार वर्षात अशा महान व्यक्तींना सन्मानित करण्याबरोबरच त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याचे काम केले जात आहे. शेतकऱ्यांना लघुउद्योजकांना मदतीसाठी सावकारांच्या भरोशावर राहावे लागू नये, यासाठी बँकांचे दरवाजे खुले करण्यात आले आहेत. जनधन योजनेअंतर्गत,  हरियाणामधील सुमारे साडे सहासष्ट लाख बंधू-भगिनींनी खाती उघडली आहेत. सरकारने सहकारी बँकेमार्फत कर्ज घेणे सोपे केले आहे. भारतीय पोस्ट पेमेंट बँक नुकतीच सुरू करण्यात आली असून, या उपक्रमाच्या माध्यमातून आपल्याला आपल्याच गावात पोस्टमनच्या माध्यमातून घरच्या घरी बँकिंग सेवा उपलब्ध होते आहे.

मित्रहो, चौधरी साहेबांनी ज्याप्रमाणे शेतकरी आणि मजुरांच्या उत्थानासाठी परिपूर्ण विचार केला होता, त्याचप्रमाणे आमचे सरकार सुद्धा बियाण्यापासून बाजारपेठेपर्यंत एक सक्षम व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य दर मिळावेत, विपरित हवामानाच्या तडाख्यात सापडलेल्या शेतकऱ्यांना संरक्षण मिळावे, आधुनिक बियाणे मिळावे, योग्य प्रमाणात युरिया उपलब्ध व्हावे, सिंचनाची योग्य व्यवस्था प्राप्त व्हावी, मातीचे आरोग्य कायम राहावे, यासाठी सातत्याने काम सुरू आहे. याचा लाभ हरियाणालाही मिळत आहे, याचा मला आनंद वाटतो. देशातील किमान पन्नास लाख शेतकरी कुटुंबांना मृदा आरोग्य कार्ड मिळाले आहे, सुमारे साडेसहा लाख शेतकरी, पीक विमा योजनेशी जोडले गेले आहेत, ज्यांना दाव्यापोटी साडेतीनशे कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळाली आहे. गेली तीस ते चाळीस वर्षे जेथे पाणी पोहोचले नव्हते, तेथे आज पाणी पोहोचवले जात आहे. लखवार धरणासाठी सहा राज्यांमध्ये नुकताच ऐतिहासिक करार झाला. हरियाणाला सुद्धा याचा मोठा लाभ होणार आहे.

मित्रहो, आठ-  नऊ दशकांपूर्वी चौधरी साहेबांनी शेतकऱ्यांना पिकाचे योग्य मूल्य मिळावे, यासाठी कृषी उत्पन्न बाजार अधिनियम तयार केला होता. आमच्या सरकारनेही पीएम आशा अर्थात प्रधानमंत्री अन्नदाता उत्पन्न संरक्षण अभियान सुरू केले आहे. याअंतर्गत, शेतकऱ्यांना बाजारात हमीभावापेक्षा कमी दर मिळत असेल तर राज्य सरकार नुकसान भरपाई देईल, अशी तरतूद करण्यात आली आहे. इतकेच नाही, खर्चाच्या किमान 50 टक्के लाभ शेतकऱ्यांना मिळावा, असे आश्वासन आम्ही दिले होते, ते सुद्धा पूर्ण करण्यात आले आहे.

मित्रहो, सरकारने तांदूळ, गहू, ऊसाबरोबरच 21 मुख्य पिकांचे हमी भाव वाढवले आहेत. तांदळाच्या हमी भावात दोनशे रुपये प्रति क्विंटल वाढ करण्यात आली आहे. आता हा दर प्रतिक्विंटल 1550 ऐवजी 1750 रुपये झाला आहे. त्याचप्रमाणे मूगासाठी 275 रुपये, सूर्यफुलासाठी सुमारे तेराशे रुपये तर बाजरीचे हमीभाव मूल्य सव्वा पाचशे रुपये वाढविण्यात आले आहे

बंधू आणि भगिनींनो, जरा आठवुन बघा. गेली कित्येक वर्षे शेतकरी ही मागणी करत होते. देशातील शेतकरी वारंवार ही मागणी करत होते. आता आमच्या सरकारने ही मागणी पूर्ण केली आहे

मित्रहो, हरियाणामधील गावांचे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, याची खातरजमा केली जात आहे. त्याचबरोबर त्यांचे उत्पन्न आजारपणात संपून जाऊ नये, याची सोयही केली जाते आहे.

आयुष्मान भारत योजनेची पहिली लाभार्थी आपल्या राज्यातील एक कन्या आहे. याबद्दल मी हरियाणावासीयांचे अभिनंदन करतो. या योजनेच्या माध्यमातून केवळ दोन आठवड्यांमध्ये पन्नास हजार पेक्षा अधिक गरीब बंधू-भगिनींवर उपचार करण्यात आले किंवा केले जात आहेत. ही सुद्धा समाधानाची गोष्ट आहे.

मला आनंद वाटतो की, हरियाणाने स्वतःला उघड्यावरील शौचमुक्त राज्य म्हणून घोषित केले आहे. रोहतकचे मी विशेष अभिनंदन करतो, कारण येथील महर्षी दयानंद विद्यापीठाला स्वच्छतेच्या क्रमवारीत पहिले स्थान मिळाले आहे.

मित्रहो, आज चौधरी साहेबांचा आत्मा जिथे कुठे असेल, त्यांनाही हरियाणामध्ये बेटी बचाव- बेटी पढाओ’ मोहिमेचे यश पाहून सर्वाधिक आनंद होत असेल. बदल घडवून आणण्यासाठी त्यांनी केवळ चर्चा केली नाही, तर समाजाच्या विचारांमध्ये परिवर्तन घडवण्यासाठी आपल्या घरापासून सुरुवात केली. मुलींबद्दल आपल्या समाजात जी विचारसरणी होती, त्याचा त्यांनी कायम विरोध केला. त्याचमुळे समाजाच्या प्रत्येक दबावासमोर आपल्या दोन्ही मुलींसोबत ते कायम ठामपणे उभे राहिले.

बंधू आणि भगिनींनो, आज हरियाणामधील लहान लहान गावांमध्ये जन्मलेल्या मुली जागतिक मंचावर देशाच्या गौरवात भर घालत आहेत, हरियाणाचे युवक भारताला क्रीडा विश्वात नावलौकिक मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. जेव्हा देशातील सर्वात गरीब कुटुंबातील युवक ही आगेकूच करत आहेत, तेव्हा असे वाटते की आपण चौधरी साहेबांचे स्वप्न साकार करण्यासाठी मनापासून प्रयत्न करत आहोत, त्या दिशेने वेगाने आगेकूच करत आहोत.

मित्रहो, आज ‘हरियाणा’ देशाच्या विकासाला हातभार लावत आहे. हा वेग असाच कायम राहावा, यासाठी आपण सर्वांनी काम करणे आवश्यक आहे. चौधरी छोटूरामजींनी सुद्धा आपल्याला हाच संदेश दिला आहे. जेव्हा आपण सर्व एकत्र येऊन राष्ट्रपुरुषांच्या स्वप्नातील भारत घडवू, नवा भारत निर्माण करू, तेव्हा तीच सामाजिक समरसता , राष्ट्रीय एकात्मतेसाठी समर्पित राष्ट्रपुरुषांना खरी श्रद्धांजली ठरेल.

लवकरच हरियाणा दिवस साजरा केला जाणार आहे. त्यासाठी मी सर्व हरियाणावासियांना आधीच अनेकानेक शुभेच्छा देतो. आपण सर्व इतक्या मोठ्या संख्येने आणि सर छोटूरामजींना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आलात, त्याबद्दल मी हृदयापासून आपला सर्वांचा आभारी आहे.

अनेकानेक आभार!!!

 

B.Gokhale/M.Pange/P.Kor



(Release ID: 1549352) Visitor Counter : 69


Read this release in: English