पंतप्रधान कार्यालय
रशियाच्या अध्यक्षांच्या भारत भेटीदरम्यान पंतप्रधानांनी केलेले निवेदन
Posted On:
05 OCT 2018 4:30PM by PIB Mumbai
महामहीम,
रशियाचे अध्यक्ष आणि माझे घनिष्ठ मित्र व्लादिमिर पुतिन ,
दोन्ही देशांचे सन्माननीय प्रतिनिधी, नमस्कार.
दोब्री दीन.
एकोणिसाव्या वार्षिक शिखर परिषदेसाठी अध्यक्ष पुतिन आणि त्यांच्या प्रतिनिधिमंडळाचे भारतात स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे.
आम्ही एका अशा देशाचे अध्यक्ष म्हणून तुमचे स्वागत करत आहोत , ज्यांच्याबरोबर आमचे अद्वितीय संबंध आहेत. या संबंधांसाठी तुम्ही अमूल्य वैयक्तिक योगदान दिले आहे.
अध्यक्ष पुतिन द्वारा सोचीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या अनौपचारिक शिखर परिषदेच्या आठवणी माझ्या मनात आजही ताज्या आहेत. त्या खास भेटीमुळे आपणा दोघांना मोकळेपणाने विस्तृत चर्चा करण्याची संधी मिळाली.
अध्यक्ष महोदय,
रशियाबरोबरच्या आपल्या संबंधांना भारत सर्वोच्च प्राधान्य देतो. वेगाने बदलणाऱ्या या जगात आपले संबंध आणखी प्रासंगिक झाले आहेत.
एकोणीस शिखर परिषदेच्या निरंतर मालिकेमुळे आपल्या विशेष आणि धोरणात्मक भागीदारीला सातत्याने नवी ऊर्जा आणि दिशा मिळाली आहे आणि जागतिक मुद्द्यांवर आपल्या सहकार्याला नवीन अर्थ आणि उद्देश मिळाला आहे.
आपल्या सहकार्याला तुमच्या भेटीमुळे धोरणात्मक दिशा मिळाली आहे. आज आम्ही असे महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत, जे दीर्घकालीन दृष्ट्या आपल्या संबंधांना आणखी शक्तिशाली बनवेल.
मनुष्यबळ विकास पासून नैसर्गिक आणि ऊर्जा संसाधनांपर्यंत , व्यापारापासून गुंतवणूकीपर्यंत , अणुऊर्जेच्या शांतीपूर्ण सह्कार्यापासून सौर ऊर्जेपर्यंत, तंत्रज्ञानापासून व्याघ्र संवर्धनापर्यंत, आर्क्टिक पासून दूर पूर्वेपर्यंत, आणि सागरापासून अंतराळापर्यंत भारत आणि रशियाच्या संबंधांचा आणखी विशाल विस्तार होईल. हा विस्तार आपल्या सहकार्याला भूतकाळातील काही निवडक कक्षांच्या पलीकडे घेऊन जाईल.
त्याचबरोबर, आपल्या संबंधांचे महत्वपूर्ण आधार स्तंभ अधिक मज़बूत होतील.
भारताच्या विकास यात्रेत रशिया नेहमीच आमच्याबरोबर राहिला आहे. अंतराळातील आमचे पुढील लक्ष्य भारताच्या गगनयानातून भारतीय अंतराळवीराला पाठवणे हे आहे. मला खूप आनंद होत आहे की तुम्ही या अभियानात रशियाकडून पूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले आहे.
युवकांमध्ये आपल्या देशांच्या भविष्याचा कायापालट करण्याची क्षमता आहे. मला या गोष्टीचा आनंद आहे की भारत आणि रशियाची प्रतिभावान मुले एकत्रितपणे आपल्या नाविन्यपूर्ण कल्पनांचे सादरीकरण आज दुपारी करतील. या कल्पना त्यांनी एकत्रितपणे विकसित केल्या आहेत.
आम्ही भारताच्या महत्वपूर्ण कार्यक्रमांमध्ये आणि व्यापाराच्या व्यापक संधींमध्ये रशियाच्या भागीदारीचे स्वागत करतो. मला या गोष्टीचा आनंद देखील आहे की आता थोड्या वेळांनंतर आम्ही भारत-रशिया व्यापार शिखर परिषदेत सहभागी होऊ. यामध्ये दोन्ही देशांचे सुमारे 200 प्रमुख उद्योजक सहभागी होणार आहेत.
भारत आणि रशिया परस्पर हिताच्या सर्व आंतराराष्ट्रीय मुद्द्यांवर दृढ सहकार्य करत आले आहेत. अध्यक्ष पुतिन आणि मी यावर देखील सविस्तर चर्चा केली आहे.
भारत आणि रशिया वेगाने बदलणाऱ्या जगात बहु -ध्रुवीयवाद (मल्टी-पोलेरिटी) आणि बहुपक्षीयवाद (मल्टी-लेटरलिस्म) सुदृढ करण्यावर सहमत आहे. दहशतवादाविरोधात लढा, अफगाणिस्तान आणि भारत प्रशांत क्षेत्रातील घटनाक्रम, हवामान बदल, SCO, BRICS सारख्या क्षेत्रीय संघटना तसेच G20 आणि ASEN सारख्या बहुपक्षीय संघटनांमध्ये सहकार्य करण्याबाबत आम्हा दोन्ही देशांचे समान हित आहे. आम्ही आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये आमचा लाभदायक सहकार्य आणि समन्वय कायम ठेवण्यावर सहमत झालो आहोत.
मी पुतीन यांनी रशियाच्या पूर्वेकडील विकासासाठी उचललेल्या पावलांमुळे खूप प्रभावित झालो आहे. भारत या क्षेत्रात सहकार्यासाठी तत्पर आहे.
आज घेण्यात आलेल्या निर्णयांमुळे आमच्या सहकार्यात आणखी वृद्धी होईल आणि आव्हानांनी भरलेल्या जगात शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्यात योगदान मिळेल.
बंधू आणि भगिनींनो,
भारत आणि रशियाच्या संबंधांच्या शक्तीचा स्त्रोत सामान्य माणसांमध्ये एकमेकांप्रति सद्भावना आणि मैत्री हा आहे. आम्ही आज अशा अनेक प्रयत्नांवर चर्चा केली ज्यामुळे उभय देशांच्या जनतेमधील संबंध अधिक मज़बूत होतील आणि दोन्ही देशांच्या लोकांची विशेषतः युवकांची एकमेकांबद्दल माहिती आणि परस्पर सामंजस्य अधिक वाढेल. यामुळे भारत-रशिया संबंधांच्या भविष्याचा एक नवीन पाया रचला जाईल.
मित्रांनो,
मी विश्वासाने सांगू शकतो की भारत-रशिया मैत्री वेगळीच आहे. मला पूर्ण खात्री आहे की या विशिष्ट नात्यासाठी अध्यक्ष पुतिन यांच्या कटिबद्धतेमुळे या संबंधांना अधिक ऊर्जा मिळेल आणि आपल्यामध्ये प्रगाढ विश्वास आणि मैत्री अधिक दृढ होईल आणि आपल्या विशेष आणि खास धोरणात्मक भागीदारीला नवी उंची प्राप्त होईल.
धन्यवाद
स्पासिबा.
***
Sonal Tupe/Sushama Kane
(Release ID: 1548794)
Visitor Counter : 95