पंतप्रधान कार्यालय

नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन येथे महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय स्वच्छता परिषदेच्या समारोप सत्रात पंतप्रधानांनी केलेले भाषण

Posted On: 02 OCT 2018 3:45PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 2 ऑक्टोबर 2018

 

संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस महामहीम अँटोनियो गुटेरेस , स्वच्छतेच्या संकल्पात साथ देण्यासाठी जगभरातून आलेले विविध देशांचे माननीय मंत्रीगण, मंत्रिमंडळातील माझे सहकारी सुषमाजी , उमा भारती जी, हरदीप पुरी जी, रमेश जी, देशातील आणि जगभरातून आलेले विशेष  अतिथिगण, बंधू आणि भगिनींनो,

भारतात, पूज्य बापूंच्या या भूमीत तुम्हा सर्वांचे मनापासून खूप-खूप स्वागत. सव्वाशे कोटी भारतीयांच्या वतीने तुम्हा सर्वाना नमस्कार. स्वच्छतेसारख्या महत्वपूर्ण विषयाबाबत आपली वचनबद्धता आणि ती वचनबद्धता सामूहिकपणे मानवजातीसमोर सादर करणे, प्रेरित करणे आणि यासाठी  तुमच्यासारखे जागतिक नेते आणि स्वच्छता व शाश्वत विकासाशी संबंधित महान व्यक्तींबरोबर उपस्थित राहणे हा माझ्यासाठी अतिशय सौभाग्याचा क्षण आहे.   

महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय स्वच्छता परिषदेत सहभागी झाल्याबद्दल आणि आपल्या देशातील अनुभव सांगितल्याबद्दल आणि एक प्रकारे या परिषदेला आपल्या अनुभवांनी, आपल्या विचारांनी ,आपल्या दूरदृष्टीने समृद्ध केल्याबद्दल मी तुमचा खूप-खूप आभारी आहे.

आज जगासमोर अनेक आव्हाने असून मानवतेशी संबंधित एका महत्वपूर्ण विषयावर एवढे देश एकत्र येणे, यावर मनन-चिंतन करणे ही एक अभूतपूर्व घटना आहे.

तुम्ही सर्वानी जो वेळ दिलात, तुम्ही सगळे सहभागी झालात, आजचे हे आयोजन , ही संधी आगामी काळात मानव कल्याणाच्या कार्याशी संबंधित एक मैलाचा दगड ठरेल असा मला विश्वास वाटतो.

मित्रांनो, आज आपण महात्मा गांधींची 150 व्या जयंती वर्षात आणि 150 वर्ष संपूर्ण जगात व्यापक स्वरूपात साजरी करण्याच्या दिशेने पाऊल टाकत आहोत. पूजनीय बापूना सर्वांच्या वतीने मी आदरपूर्वक श्रद्धासुमन अर्पण करतो. आणि मी पाहतो आहे की पूज्य बापूचे स्वप्न स्वच्छतेशी निगडित होते. आज त्या स्वच्छतेशी संबंधित निरनिराळ्या मान्यवरांचा सत्कार करण्याची संधी मला मिळाली, एक प्रकारे श्रद्धांजली बरोबरच कार्यांजली वाहण्याचे सौभाग्य आपल्याला लाभले आहे.

तुम्ही सर्वांनी बापूंच्या आश्रमातही एक दिवस घालवला. साबरमतीच्या काठी जिथून पुज्य बापूंनी देशाला स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी तयार केले होते. तिथला  साधेपणा, तिथले जीवन जवळून पाहिले आहे. मला विश्वास आहे की स्वच्छतेच्या मोहिमेशी संबंधित असलेल्या लोकांसाठी बापूंचे विचार नवीन ऊर्जा, नवीन चैतन्य  आणि नवीन प्रेरणांची निश्चितच एक संधी बनली असेल. आज आपण महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय स्वच्छता परिषदेच्या समारोप प्रसंगी देखील एकत्र जमलो आहोत हे देखील सार्थक आहे.

काही वेळापूर्वी मला इथे काही स्‍वच्‍छाग्रहिचा सन्मान आणि पुरस्कार देण्याची संधी मिळाली. सर्व पुरस्कार विजेत्यांचे मी खूप-खूप अभिनंदन करतो , विशेषत: आदरणीय अम्मा यांना प्रणाम करतो. कारण जेव्हापासून  कामाला  सुरुवात केली , पूज्य अम्मा यांनी सक्रियपणे एक प्रकारे ही संपूर्ण मोहिम आपल्या  खांद्यावर घेतली. अशा अगणित लोकांनी अशा महापुरुषांच्या , महान माणसांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन, आज या स्वच्छता अभियानाला लोकचळवळ बनवले, खूप मोठी ताकद दिली. या मंचावरून आज मी त्या सर्वांना प्रणाम करतो.

मित्रांनो,  स्वातंत्र्यासाठी लढत असतांना गांधीजींनी एकदा म्हटले होते की जर त्यांना स्वातंत्र्य आणि स्वच्छता यापैकी एकाची निवड करण्याबाबत विचारले  असते तर त्यांचे स्वच्छतेला प्राधान्य राहिले असते. गांधीजींनी स्वातंत्र्यलढ्यासाठी आपले आयुष्य वेचले. पण स्वातंत्र्य आणि स्वच्छता यापैकी स्वच्छतेला प्राधान्य देण्याचा त्यांचा संकल्प होता.

त्यांनी 1945 मध्ये आपले विचार शब्दबद्ध केले होते, लिहिले होते आणि त्या प्रकाशित आवृत्तीमध्ये त्यांनी  ते एक रचनात्मक कार्यक्रम म्हणून सादर केले  होते.  मी उल्लेख केलेल्या महत्त्वाच्या गोष्टींपैकी, महात्मा गांधींच्या त्या दस्तावेजात ग्रामीण स्वच्छता देखील एक महत्त्वाचा घटक होता.

प्रश्न असा आहे की, गांधीजी वारंवार स्वच्छतेवर इतका भर का देत होते? केवळ याचसाठी की अस्वच्छतेमुळे आजार होतात ? माझा आत्मा म्हणतो, नाही इतका मर्यादित उद्देश नव्हता.

मित्रानो, जर तुम्ही बारकाईने पाहिलेत , मनन केलेत तर लक्षात येईल  की   जेव्हा आपण अस्वच्छता, घाण दूर करत नाही, तेव्हा तीच अस्वच्छता आपल्यामध्ये परिस्थिती स्वीकारण्याची प्रवृत्ती निर्माण करण्याचे कारण बनते, तशी वृत्ती निर्माण होऊ लागते. एखादी गोष्ट अस्वच्छतेने घेरलेली आहे, एखाद्या जागी अस्वच्छता आहे   आणि तिथे उपस्थित व्यक्तीने जर ते बदलले नाही, साफसफाई केली नाही तर हळूहळू  तो ती अस्वच्छता स्वीकारू लागतो. काही काळानंतर अशी स्थिती होते, अशी मनःस्थिती होते की ती अस्वच्छता त्याला अस्वच्छता वाटतच नाही. म्हणजे एक प्रकारे अस्वच्छता व्यक्तीच्या चेतनेला, त्याच्या विचार प्रक्रियेला जखडून टाकते.

आता याच्या उलट परिस्थिति बाबत विचार करा- जेव्हा व्यक्ती अस्वच्छता स्वीकारत नाही, ती साफ करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्याची चेतनाही जागृत होते, त्याच्यात एक प्रवृत्ती निर्माण होते आणि तो परिस्थितीचा सहजासहजी स्वीकार करत नाही.

पूज्‍य बापूनी स्वच्छतेला जेव्हा लोकचळवळ बनवले तेव्हा त्यामागे जी एक  मनोभावना होती, ती देखील व्यक्तीची  मानसिकता बदलण्याची होती.जडत्वापासून चैतन्याकडे जाण्याचा आणि ती चेतना , त्यातून जडत्व संपवण्याची चेतना जागवणे हाच त्यांचा प्रयत्न होता.जेव्हा आपणा भारतीयांमध्ये हीच चेतना जागली तेव्हा या स्वातंत्र्य चळवळीचा जसा प्रभाव आपण पाहिला आणि देश स्वतंत्र झाला.

आज मी तुमच्यासमोर हे स्वीकारतो की जर आपण भारतीय आणि माझ्यासारखे अनेक लोक पूज्य बापूंच्या विचारांशी परिचित झाले नसते, एक विद्यार्थी म्हणून त्यांचे व्यक्तिमत्व जाणून-समजून घेण्याचा प्रयत्न केला नसता , त्यांनी सांगितलेल्या गोष्टी जगाला सांगून त्या समजून घेतल्या नसत्या तर बहुधा कुठल्याही सरकारसाठी हा कार्यक्रम प्राधान्य बनला नसता.

आज हा अशासाठी प्राधान्य बनला , आम्ही १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून हा कार्यक्रम करण्याची इच्छा अशासाठी व्यक्त केली कारण गांधीजींच्या विचारांचा, आदर्शांचा मनावर प्रभाव होता. आणि हेच कारण आहे की तो आज या कार्यासाठी कुठल्याही अपेक्षेशिवाय कोट्यवधी लोकांना प्रेरणा देत आहे, जोडत आहे.

आज मला अभिमान वाटतो की, गांधीजींनी दाखवलेल्या मार्गावर चालताना सव्वाशे कोटी भारतीयांनी स्वच्छ भारत अभियानाला जगातील सर्वात मोठी लोकचळवळ बनवली आहे. याच लोकभावनेचा परिणाम आहे की २०१४ पूर्वी ग्रामीण स्वच्छतेची व्याप्ती जी सुमारे अडतीस टक्के होती , ती आज चौऱ्यान्ना व टक्के झाली आहे. चार वर्षात ३८ वरून ९४ टक्क्यांवर पोहचणे, हे जनसामान्यांच्या कर्तव्याशी जुळण्याचे सर्वात मोठे यशस्वी उदाहरण आहे.

भारतात उघड्यावरील शौचापासून मुक्‍त open defecation free (ODF) गावांची संख्या आज 5 लाखांच्या पुढे गेली आहे. भारतातील 25 राज्यांनी स्वतःला हागणदारीमुक्त घोषित केले आहे.

मित्रांनो, चार वर्षांपूर्वी उघड्यावर शौच करणाऱ्या जागतिक लोकसंख्येपैकी साठ टक्के भारतात होते. आज हे प्रमाण साठ टक्क्यांवरून कमी होऊन वीस टक्क्यांच्याही खाली गेले आहे. म्हणजे एक प्रकारे आपली ही मेहनत जगाच्या नकाशात देखील एक नवा उत्साह, नवी चेतना जागवत आहे. आणि मोठी गोष्ट ही देखील आहे की या चार वर्षात केवळ शौचालये बांधली नाही , गावे- शहरे ODF झाली नाही तर ९० टक्क्यांहून अधिक शौचालयांचा नियमित वापरही होत आहे.

सरकार यावरही नियमितपणे लक्ष ठेवत आहे की ज्या गावे आणि शहरांनी स्वतःला ओडीएफ घोषित केले आहे, ते पुन्हा जुन्या सवयींकडे वळू नयेत. यासाठी वर्तनात बदल आणि तेच सर्वात मोठे काम असते, त्यावर सातत्याने भर दिला जात आहे. त्यामध्ये गुंतवणूक केली जात आहे.

मित्रांनो , जेव्हा आम्ही हे अभियान सुरु केले होते, तेव्हा असा प्रश्न देखील उपस्थित करण्यात आला होता की यासाठी खूप पैसा खर्च करावा लागेल. मात्र पैशांपेक्षा भारत सरकारने या सामाजिक परिवर्तनाला प्राधान्य दिले, त्याच्या महत्वावर भर दिला आणि जेव्हा मनात परिस्थिती पालटते तेव्हा वास्तवात परिस्थिती पालटण्यासाठी सरकारची गरज भासत नाही, लोक स्वतः सुरुवात करतात.

आज जेव्हा मी ऐकतो, पाहतो  कि स्‍वच्‍छ भारत अभियानाने भारताच्या लोकांची वृत्ती बदलली आहे. कशा प्रकारे भारतातील गावांमधील रोगराई कमी झाली आहे. उपचारांवर होणारा खर्च कमी झाला आहे. आणि जेव्हा अशा बातम्या ऐकायला मिळतात, तेव्हा किती समाधान मिळते.

संयुक्‍त राष्ट्राशी संबंधित निरनिराळ्या संघटनांनी अभ्यास देखील केला आहे आणि या अभ्यासाद्वारे अभियानाच्या नवनवीन आयामांना जगासमोर सादर केले आहे.

बंधू आणि भगिनींनो, कोट्यवधी भारतीयांनी या चळवळीला आशा आणि परिवर्तनाचे प्रतीक बनवले आहे. स्‍वच्‍छ भारत अभियान आज जगातील सर्वात मोठा  domino effect सिद्ध होत आहे.

मित्रांनो , आज मला या गोष्टीचा देखील अभिमान आहे की स्‍वच्‍छ भारत अभियानामुळे  भारत स्‍वच्‍छते प्रति, आपल्या प्राचीन संस्काराप्रती पुन्हा एकदा  जागृत झाला आहे.  स्‍वच्‍छतेचा हा  संस्‍कार आपली प्राचीन परंपरा, संस्‍कृति और आणि विचारात अंतर्निहित आहे., विकृत्ति नंतर आल्या आहेत.  मनुष्याच्या जीवन जगण्याच्या योग्य पद्धतीचे वर्णन करताना अष्‍टांग योग बाबत माहिती देताना  महर्षि पंतजलि म्हणाले होते –

शौच संतोष तप: स्‍वाध्‍याय ईश्‍वर प्रणिधान नि नियम:

म्हणजे  समृद्ध आयुष्य जगण्याचे जे पाच नियम आहेत - वैयक्तिक स्वच्छता , संतोष, तपस्‍या, स्वाध्याय  आणि  ईश्‍वर चेतना. यातही, या पाच मध्येही सर्वात पहिला नियम स्‍वच्‍छता- याचे पतंजलि यांनीही समर्थन केले आहे.  ईश्‍वर  चेतना आणि तपस्‍या देखील स्‍वच्‍छतेनंतर शक्य आहे. स्वच्छतेचा हा सद्गुण भारताच्या जीवनाचा भाग राहिला आहे.

आता जेव्हा मी या सभागृहात येत होतो, तेव्हा महामहीम अँटोनियो गुटेरेस यांच्याबरोबर मला एक प्रदर्शन पाहण्याची संधी मिळाली होती. त्यात दाखवण्यात आले होते की कशा प्रकारे  सिंधु घाटी संस्कृतीत शौचालय , मलनिःस्सारण याची किती उत्तम व्यवस्था होती.

मित्रांनो, महामहीम अँटोनियो गुटेरेस यांच्या नेतृत्वाखाली संयुक्‍त राष्‍ट्र शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्याच्या दिशेने पुढे जात आहे. याअंतर्गत,  2030 पर्यंत जगभरात  स्‍वच्‍छता, उघड्यावरील शौचपासून मुक्ती, स्वच्छ ऊर्जा यासारखी सतरा उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत. ती साध्य करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

सरचिटणीस  महोदय, मी हे तुम्हाला  आश्‍वस्‍त करतो  कि भारताची यात प्रमुख भूमिका असेल, आम्ही आमची उद्दिष्टे मुदतीपूर्वी साध्य करू. समृद्ध दर्शन, प्राचीन प्रेरणा, आधुनिक तंत्रज्ञान आणि  प्रभावी कार्यक्रमांच्या मदतीने, लोकसहभागातून  आज भारत शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्याच्या दिशेने वेगाने मार्गक्रमण करत आहे.

आमचे सरकार स्वच्छतेबरोबरच पोषणावरही तितकाच भर देत आहे. भारतात आता कुपोषणाविरोधातही लोकचळवळ सुरु करण्यात आलिया हे. वसुधैव कुटुम्‍बकम- म्हणजे संपूर्ण जगाला एक कुटुंब मानत आम्ही जे कार्य करत आहोत, ते कार्य आमचे समर्पण, आज जगासमोर आहे, मानवजातीसमोर आहे.

मित्रांनो, मी तुमचे अभिनंदन करतो की, चार दिवसांच्या या परिषदेनंतर आपण या निष्कर्षावर पोहोचलो आहोत की जगाला स्वच्छ बनवण्यासाठी चार ‘P’ आवश्‍यक आहेत आणि या  चार ‘P’ चा आमचा मंत्र आहे - राजकीय नेतृत्व (political leadership), सार्वजनिक निधी (public funding),  भागीदारी (partnership), लोकसहभाग (people's participation). दिल्ली घोषणापत्राच्या माध्यमातून तुम्ही सर्वानी सर्वव्‍यापी स्‍वच्‍छतेमध्ये या  चार महत्‍वपूर्ण मंत्रांना मान्‍यता दिली आहे. यासाठी मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो.

याप्रसंगी मी  स्‍वच्‍छ भारतअभियान पुढे नेणाऱ्या लोकांना, कोट्यवधी स्‍वच्‍छाग्रहिना, माध्यमातील माझ्या सहकाऱ्यांना आणि मी माध्यमांचा उल्लेख अशासाठी करतो आहे कारण स्वच्छता अभियानाने मीडिया संबंधी जे साधारण मत होते ते बदलले. माझा देश अभिमानाने म्हणू शकतो कि माझ्या देशातील माध्यमांच्या प्रत्येक छोट्या-मोठ्या विभागाने - मग ती वृत्तपत्रे असतील किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमे , त्यांनी स्वच्छतेसाठी काम करणाऱ्या लोकांची सातत्याने चर्चा केली आहे, चांगल्या गोष्टींची चर्चा केली आहे, त्याचा  व्‍यापक प्रचार-प्रसार केला आहे आणि या बातम्यांमुळे एक प्रकारे प्रेरणादायी वातावरण देखील निर्माण झाले आहे. आणि म्हणूनच मी माध्यमांचे देखील आणि त्यांनी दिलेल्या सक्रिय योगदानाचे आग्रहपूर्वक आभार व्‍यक्‍त करू इच्छितो.

तुम्हा सर्वांच्या सहभागामुळे, भागीदारीमुळे, तसे हे काम कठीण वाटत होते, मात्र कठीण वाटणारे हे काम-लक्ष्य साध्य करण्याच्या दिशेने आज देश पुढे जात आहे. अजून आमचे काम बाकी आहे. आपण  इथे समाधान मानण्यासाठी एकत्र जमलो नाहीत. अजून जे बाकी आहे ते अधिक वेगाने करण्याची प्रेरणा मिळवण्यासाठी आपण एकत्र जमलो आहोत.

आपल्याला पुढे जायचे आहे आणि  राष्‍ट्रपिता महात्‍मा गांधीना त्यांच्या 150 व्या जयंतीदिनी स्‍वच्‍छ आणि स्‍वस्‍थ भारताची भव्‍य काव्‍य कार्यांजलि अर्पण करायची आहे. मला आशा आहे, पूर्ण विश्वास आहे  कि आपण भारतीय हे स्वप्न पूर्ण करून दाखवू , हा संकल्‍प सिद्ध करून दाखवू आणि यासाठी जे काही आवश्यक परिश्रम करावे लागतील, ज्या जबाबदाऱ्या उचलाव्या लागतील, कुणीही भारतीय मागे राहणार नाही.

तुम्ही सर्वजण या महत्‍वपूर्ण प्रसंगी इथे आलात, भारताला तुमचा सत्कार करायची संधी दिलीत, यासाठी मी तुम्हा सर्वांचे, सर्व अतिथींचे खूप-खूप आभार मानतो. 

आज इथे भारत सरकारच्या टपाल विभागाच्या वतीने या महत्‍वपूर्ण प्रसंगी पूज्‍य बापूच्या टपाल तिकिटाचे लोकार्पण करण्याची संधी आपल्याला मिळली. मी  भारताच्या टपाल विभागाची सक्रियता आणि टपाल तिकीट स्वतः एक निरोप्या असतो. तो इतिहासाबरोबर देखील जोडतो, समाजातील बदलत्या प्रभावांशी देखील जोडतो.

आज एक महत्‍वपूर्ण प्रसंग मी पाहत होतो - वैष्‍णव जन तो तेने रे कहिए – पूज्‍य बापू विश्‍व मानव होते. आणि त्यांच्याबाबत म्हटले गेले होते कि शतकांनंतर जेव्हा कुणी पाहिलं की असाही कुणी मानव होऊन गेला होता, तेव्हा तो म्हणेल - नाही-नाही , ही तर कल्पना असेल, असा कुणी माणूस असू शकतो? असे महापुरुष होते पूज्‍य बापू आणि त्यांची जी प्रेरणा होती - वैष्‍णव जन तो तेने कहिए- मनात एक छोटासा विचार आला होता की जगातील  150 देशांमध्ये कुणी 150 वर्ष आहेत, तिथले जे प्रसिद्ध गीतकार, संगीतकार, गायक, वादक, जे कुणी आहेत, त्यांनी एकत्रितपणे - वैष्‍णव जन – त्याच स्वरूपात पुन्हा एकदा सादर करावे.

मी सहजच सुषमाजीना म्हटले होते मात्र सुषमाजी आणि त्यांच्या पूर्ण टीमने ज्या तन्मयतेने, जगभरातील सर्व दूतावासात बसलेल्या आमच्या सहकार्यांनी ज्याप्रकारे याला महत्व दिले आणि जो दर्जा होता, परदेशातील लोकांनी हे गायले असेल, मला वाटते बहुधा त्यांनी अनेक दिवस सराव केला असेल. म्हणजे एक प्रकारे ते गांधीमय झाले होते.

आमच्याकडे एक कैसेट आली आहे , मात्र मी खात्रीने सांगतो, त्या देशांमधील कलाविश्वातील हे लोक गांधीमय झाले असतील. त्यांच्या मनात प्रश्न पडला  असेल , काय आहे हे,कोण महापुरुष होते, त्यांनी अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला असेल. वैष्‍णव भजनाचे जागतिक स्वरूप प्रथमच जगासमोर येत आहे. आणि मला विश्वास आहे की दीडशे वर्षानिमित्ताने हा जो प्रयत्न झाला आहे , हे स्वर, हे  दृश्‍य, ही जगातील प्रत्येक देशाची ओळख आणि मी संयुक्त राष्ट्राच्या  सरचिटणिसांना सांगत होतो की तुमच्या मातृभूमीतील बासरीवाद्क देखील आज यामध्ये बासरी वाजवत होते.

जगातील देशांचे लोक आपल्या कलाकारांना पाहतील, ऐकतील, एक उत्सुकता निर्माण होईल, ते समजून घेण्याचा प्रयत्न होईल. आम्हा भारतीयांना तर माहीतच नाही की वैष्‍णव भजन कुठल्या भाषेत आहे. आमच्या रक्तात ते असे उतरले आहे की त्याची मूळ भाषा कुणालाच माहित नाही, आम्ही गात आलो आहोत.  एखाद्या भाषेत शिकले असतील, भारताच्या कानाकोपऱ्यात गाणारे भेटतात. तसेच जगभरात मानवजातीच्या हृदयात ते नक्की स्थान निर्माण करेल असा मला विश्वास वाटतो. मी पुन्हा एकदा  सुषमाजीच्या टीमचे देखील हृदयपूर्वक खूप-खूप अभिनंदन करतो.

आज स्‍वच्‍छता क्षेत्रात आपल्याला जे फलित मिळाले आहे , हे फलित अधिक काम करण्याची प्रेरणा देते. आम्ही कधीही हा  दावा केला नाही  कि आम्ही सगळे काही केले आहे. मात्र आमचा विश्वास निर्माण झाला हे की ज्या गोष्टीला आपण घाबरत होतो, हात लावत नव्हतो, दूर पळत होतो, त्या अस्वच्छतेला हात लावून आम्ही स्वच्छता निर्माण करण्यात यश मिळवलेआहे आणि आणखी यश मिळवू शकतो. सामान्य जनतेला अस्वच्छता आवडत नाही. सामान्य माणूस स्वच्छतेत सहभागी व्हायला तयार आहे या विश्वासाला बळ मिळाले आहे. 

आणि या कामासाठी उमा भारती जी, त्यांचा विभाग, त्यांची पूर्ण टीम, देशभरातील नागरिकांनी , विविध संघटनांनी हे जे काम केले आहे, आज ते अभिनंदनाला पात्र आहेत,  अभिनंदनाचे अधिकारी आहेत. मी उमाजीना रमेशजीना आणि त्यांच्या संपूर्ण टीमला , ज्या समर्पित भावनेने काम होत आहे,  कुणी बाहेर बसून कल्‍पना करू शकणार नाही , सरकारी कार्यालयात नोकरशहांची प्रतिमा काहीही असेल, मात्र या कामात मी म्हणू शकतो की तिथे कुठलीही बाबूगिरी नाही, केवळ आणि केवळ गांधीगिरी, स्‍वचछता गिरी दिसून येते.

एवढे मोठे  काम एक टीम या नात्याने केले आहे. छोट्या-मोठ्या प्रत्येक कर्मचाऱ्याने, अधिकाऱ्याने याला आपला  कार्यक्रम बनवले आहे. हे खूप दुर्मिळ असते. आणि मी यात भावनिकदृष्ट्या गुंतलो असल्यामुळे,  मी बारकाईने पाहतो तेव्हा मला समजते की लोक किती मेहनत करत आहेत, किती प्रयत्न करत आहेत,  तनामनाने यात गुंतले आहेत. तेव्हा कुठे आपल्याला देशात परिवर्तन दिसायला लागते.

आज माझ्यासाठी एक संकल्पाचे निमित्त आहे, समाधानाचे देखील निमित्त आहे. माझ्या देशबांधवानी पूज्य बापूना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली बरोबरच कार्यांजली स्वरूपात  स्‍वच्‍छतेच्या यशाला पुढे नेले आहे. मी पुन्हा एकदा सर्वांचे खूप-खूप आभार मानतो.

सरचिटणिसजी स्वतः वेळ काढून  पूज्‍य बापूच्या जन्‍म जयंती निमित्त आपल्यात सहभागी झाले आणि संयुक्त राष्ट्राची जी उद्दिष्टे आहेत, ती उद्दिष्टे आपण भारतात कशा प्रकारे साध्य करत आहोत आणि जगातील एवढे मित्र जेव्हा या कामात सहभागी झाले आहेत, त्याला त्यांनी स्वतः उपस्थित राहून शोभा वाढवली, यासाठी मी त्यांचेही आज हृदयपूर्वक खूप-खूप आभार मानतो.

तुम्हा सर्वांचे खूप-खूप आभार!

 

 

B.Gokhale/S.Kane/P.Malandkar

 

 

 


(Release ID: 1548571)
Read this release in: English