पंतप्रधान कार्यालय

“मिशन गंगे”च्या प्रतिनिधींनी घेतली पंतप्रधानांची भेट

Posted On: 04 OCT 2018 2:17PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 4 ऑक्टोबर 2018

 

गंगा नदीच्या स्वच्छतेबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी मोहीम हाती घेतलेल्या 40 गिर्यारोहकांच्या गटाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या गटात एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या आठ गिर्यारोहकांचा समावेश आहे. एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला बचेंद्री पाल या गटाचे नेतृत्व करत आहे.

केंद्र सरकारच्या नमामी गंगे अभियानावरुन प्रेरणा घेऊन आखलेल्या या मोहिमेचे नांव मिशन गंगे ठेवण्यात आले आहे. हा गट महिनाभर नदीतून हरिद्वार ते पाटणा असा प्रवास करणार आहे. बिजनौर, नरोडा, फरुकाबाद, कानपूर, अलाहाबाद, वाराणसी आणि बकसार या नऊ शहरांमध्ये गटाचा मुक्काम असेल. या ठिकाणी गंगा स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात येईल आणि स्वच्छता उपक्रम हाती घेतले जातील.

या मोहिमेसाठी पंतप्रधानांनी गटाचे कौतुक केले. गंगेच्या स्वच्छतेचे महत्व त्यांनी अधोरेखित केले. शालेय विद्यार्थ्यांमध्ये याबाबत विशेष करुन जनजागृती करण्याचे आवाहन, पंतप्रधानांनी या गटाला केले.

 

B.Gokhale/S.Kakade/P.Malandkar

 

 

 



(Release ID: 1548550) Visitor Counter : 87


Read this release in: English