मंत्रिमंडळ

इंदूरमधील मेट्रो रेल्वे जोडणीला चालना

रिंग लाईन(बंगाली स्क्वेअर-विजय नगर-भावरसाला -विमानतळ-पॅटॅसिया-बंगाली स्क्वेअर)चा समावेश असलेल्या इंदूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाला मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 03 OCT 2018 8:22PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  3 ऑक्टोबर 2018

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने इंदूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. यामध्ये बंगाली स्क्वेअर-विजय नगर-भावरसाला -विमानतळ-पॅटॅसिया-बंगाली स्क्वेअर या 31.55 किलोमीटर लांबीच्या रिंग लाईनचा समावेश आहे.  हा मार्ग इंदूरच्या सर्व प्रमुख आणि शहरी भागांना जोडेल.

विवरण:-

रिंग लाइनची लांबी 31.55 किलोमीटर आहे.

रिंग लाइन बंगाली स्क्वेअर-विजय नगर-भावरसाला -विमानतळ-पॅटॅसिया-बंगाली स्क्वेअर पर्यंत असेल.

रिंग लाइनवर एकूण ३० स्थानके असतील.

या प्रकल्पामुळे इंदूरशहरात  सुरक्षित, विश्वसनीय आणि वेगवान वाहतूक व्यवस्था उपलब्ध होईल ज्यामुळे शहरातील सर्व प्रमुख केंद्रे जोडली जातील. तसेच अपघात, प्रदूषण, प्रवासाचा वेळ, इंधनाचा वापर, समाज-विरोधी घटना कमी होतील आणि शाश्वत विकासासाठी जमिनीचा वापर आणि विस्तार यांचे नियमन होईल.

प्रकल्पाचा एकूण खर्च  7500.80 कोटी रुपये असून चार वर्षात हा प्रकल्प पूर्ण केला जाईल.

लाभ:-

इंदूरमधील ३०  लाख लोकसंख्येला या मेट्रो रेल्वे प्रकल्पामुळे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष लाभ होण्याची शक्यता आहे. रेल्वे आणि बस स्थानकांशी हे कॉरिडॉर्स विविध ठिकाणी जोडलेले असतील. या प्रकल्पातून भाडे आणि जाहिराती स्वरूपात तसेच टीओडी आणि टीडीआरच्या माध्यमातून महसूल मिळेल.

या मेट्रो रेल्वे कॉरिडॉरलगतच्या रहिवासी भागाला या प्रकल्पाचा लाभ होणार असून त्यांना शहरातील विविध भागात पोहचणे सोयीचे होईल.

ही रिंग लाईन शहरातील  बस, रेल्वे स्थानक , विमानतळ आणि  आगामी स्मार्ट सिटीच्या क्षेत्र आधारित विकास(एबीडी)ला तसेच दाट लोकवस्तीच्या भागाला नवीन विकसित होणाऱ्या भागाशी जोडेल .नागरिक, प्रवासी, कार्यालय  कर्मचारी , विद्यार्थी आणि पर्यटक यांना ही मेट्रो रेल्वे पर्यावरण-स्नेही आणि शाश्वत सार्वजनिक वाहतूक सेवा पुरवेल.

प्रगती:-

या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी मध्य प्रदेश मेट्रो रेल कं .लि. ची स्थापना करण्यात आली आहे.

इंदूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाला केंद्र सरकार आणि मध्य प्रदेश सरकार समप्रमाणात आणि  युरोपिअन इन्व्हेस्टमेंट बँकेकडून अंशतः कर्ज स्वरूपात अर्थसहाय्य पुरवतील.

इंदूर मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी सल्लागार म्हणून मे. लुईस बर्गर एसएएस आणि मे. जिओडेटा इंजिनीरिंग यांच्यासह मे. डीबी इंजिनीअरिंग अँड कन्सल्टिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पहिल्या टप्प्यातील कामासाठी निविदा मागवण्यात आल्या असून लवकरच काम सुरु होईल.

B.Gokhale/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 



(Release ID: 1548450) Visitor Counter : 75


Read this release in: English