पंतप्रधान कार्यालय

महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय स्वच्छता परिषदेच्या सांगता समारंभात पंतप्रधानांचे भाषण

Posted On: 02 OCT 2018 3:55PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 2 ऑक्टोबर 2018

 

नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय स्वच्छता परिषदेच्या सांगता समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले विचार व्यक्त केले. या चार दिवसांच्या परिषदेत जगभरातील स्वच्छता मंत्री तसेच पाणी, स्वच्छता आणि आरोग्याची काळजी या विषयातील तज्ञ सहभागी झाले होते. या सांगता समारंभानंतर, पंतप्रधान आणि संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस ॲन्टोनियो गुटारेस यांनी स्वच्छता विषयक डिजिटल प्रदर्शनाला भेट दिली तसेच यावेळी महात्मा गांधींवरच्या टपाल तिकिटाचे अनावरण करण्यात आले आणि गांधीजींचे आवडते भजन वैष्णव जन तो सुरावटींवर वाजवण्यात आले. तसेच स्वच्छ भारत पुरस्कारांचे वितरणही यावेळी झाले.

यावेळी बोलतांना पंतप्रधानांनी सांगितले की, महात्मा गांधींनी स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य दिले होते तसेच 1945 साली गांधीजींनी दिलेल्या रचनात्मक कार्यक्रमाची आठवणही त्यांनी सांगितली. यात ग्रामीण स्वच्छता हा महत्वाचा विषय आहे.

आपल्या आजूबाजूचा परिसर अस्वच्छ असेल आणि तो स्वच्छ केला नाही तर हळूहळू आपण त्या परिस्थितीचा स्वीकार करायला लागतो. याउलट जर एखाद्याने आपला सभोवतालचा परिसर स्वच्छ केला तर त्याला नवी ऊर्जा मिळते आणि तो त्यानंतर कधीही अस्वच्छ परिसरासमोर शरण जात नाही असे पंतप्रधान म्हणाले.

महात्मा गांधीच्या प्रेरणेतूनच स्वच्छ भारत अभियान सुरु केल्याचे त्यांनी सांगितले. महात्मा गांधीकडूनच प्रेरणा घेऊन भारतीय जनतेने हे अभियान जगातली सर्वात मोठी चळवळ बनवली असल्याचे ते म्हणाले. ग्रामीण स्वच्छतेचे प्रमाण 2014 साली 38 टक्के होते ते आता 94 टक्के झाले आहे. भारतातील पाच लाख पेक्षा अधिक गावे हागणदारी मुक्त झाली आहेत असेही ते म्हणाले. स्वच्छ भारत अभियानामुळे भारतीयांची जीवनशैली बदलत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. शाश्वत विकासाचे उदिृष्ट पूर्ण करण्याच्या दिशेने भारताची योग्य वाटचाल सुरु आहे असे ते म्हणाले. जग स्वच्छ करण्यासाठी चार पी महत्वाचे आहेत. ते चार पी म्हणजे- पोलिटिकल लिडरशीप (राजकीय नेतृत्व), पब्लिक फंडींग (सार्वजनिक निधी), पार्टनरशीप (भागीदारी) आणि पीपल्स पार्टिसिपेशन  म्हणजे (लोकसहभाग) असे मोदी यांनी सांगितले.   

 

B.Gokhale/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 



(Release ID: 1548339) Visitor Counter : 84


Read this release in: English