आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समिती

विद्युतीकरणासह इंदूर (मांगलीयागांव)-बुधनी या नवीन रेल्वे मार्गाला (205.5 किमी) मंत्रिमंडळाची मंजुरी

यामुळे जबलपूर आणि इंदूर मधील अंतर 68 किमी ने कमी होणार
इंदूर ते मुंबई आणि दक्षिण भारत यामधील प्रवासाचा वेळ कमी होणार
या प्रकल्पाच्या बांधकामादरम्यान सुमारे 49.32 लाख मनुष्य दिवस एवढा थेट रोजगार निर्माण होणार

Posted On: 19 SEP 2018 3:48PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  19 सप्टेंबर 2018

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीने बुधनी ते इंदूर (मांगलीयागांव) या सुमारे 205.5 किमी लांबीच्या नवीन रेल्वेमार्गाच्या बांधकामाला मंजुरी दिली. या प्रकल्पाचा अंदाजे खर्च 3261.82 कोटी रुपये इतका आहे.

या प्रकल्पाचा मुख्य उद्देश मागास भागांचा विकास आणि इंदूर ते जबलपूर तसेच इंदूर ते मुंबई आणि दक्षिण भारताकडील प्रवासाचा वेळ कमी करणे हा आहे. सध्याच्या मार्गाच्या तुलनेत हे अंतर 68 किलोमीटर कमी होईल. यामुळे या परिसरातील लोकांना आणि उद्योगांना वाहतुकीच्या उत्तम सुविधा उपलब्ध होतील तसेच या भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यात मदत होईल. या प्रकल्पातून बांधकामादरम्यान 49.32 लाख मनुष्य दिवस एवढी थेट रोजगार निर्मिती होईल.

प्रस्तावित लाईन बुधनीच्या सध्याच्या यार्डमधून सुरु होईल आणि इंदूरजवळ पश्चिम रेल्वेच्या मांगलीयागांव या सध्याच्या स्थानकाशी जोडली जाईल. या मार्गावर दहा नवीन क्रॉसिंग स्टेशन आणि सात नवीन हॉल्ट स्टेशन बांधण्याचे प्रस्तावित आहे. या नवीन मार्गामुळे सिहोर, देवास आणि इंदूर जिल्ह्याला लाभ होईल आणि बुधनी ते इंदूर दरम्यान थेट संपर्क स्थापित होईल. सध्या बुधनी ते बरखेडा घाट सेक्शनसह भोपाळ-इटारसी या गर्दीच्या मार्गाने जावे लागते.

या नवीन मार्गामुळे आसपासच्या परिसरातील आधुनिक विकासासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध होतील आणि त्यातून सामाजिक, आर्थिक लाभ होईल. हा प्रकल्प या परिसरातील मागास भागाच्या विकासासाठी तसेच नसरुल्लागंज, खाटेगांव आणि कन्नोद यासारख्या विविध शहरं / गावे यांच्याशी थेट संपर्क स्थापित होईल. सध्या येथे रेल्वे संपर्क नाही.

 

N.Sapre/ S.Kane/P.Malandkar



(Release ID: 1546668) Visitor Counter : 89


Read this release in: English