मंत्रिमंडळ

प्रधानमंत्री जन धन योजनेतील बदलांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी


प्रत्येक घरातील प्रत्येक प्रौढ व्यक्तीचे खाते उघडण्यावर भर

Posted On: 05 SEP 2018 10:56PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 5 सप्टेंबर 2018

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत आयोजित केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रधानमंत्री जन धन योजनेतील बदलांसह, योजना पुढे सुरू ठेवायला मंजुरी देण्यात आली. या योजनेत पुढीलप्रमाणे बदल करण्यात आले आहेत.

  • 14.08.2018 नंतरही वित्तीय समावेशनासाठी राष्ट्रीय मोहिम (प्रधानमंत्री जनधन योजना) चालू राहणार
  • सध्याच्या ओव्हर ड्राफ्ट मर्यादेत 5000 रुपयांवरुन 10,000 रुपयांपर्यंत वाढ
  • 2000 रुपयांपर्यंतच्या ओव्हरड्राफ्टला कोणतीही अट लागू नाही
  • ओव्हरड्राफ्ट सुविधेचा लाभ घेण्याच्या वयोमर्यादेत 18 ते 60 वर्षांवरुन 18 ते 65 वर्षे असा बदल करण्यात आा.
  • प्रत्येक घरातील प्रत्येक प्रौढाला संरक्षण देण्याच्या दृष्टीने 28.08.18 नंतर प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत खाते सुरू करणाऱ्या रुपये कार्ड धारकांना दिल्या जाणाऱ्या अपघात विमा संरक्षणात 1 लाख रुपयांवरुन 2 लाख रुपयांपर्यंतची वाढ

 

परिणाम

ही योजना सुरू राहणार असल्यामुळे देशातील प्रत्येक घरातील प्रत्येक प्रौढाचे बँक खाते उघडले जाईल. ज्यायोगे त्यांना इतर वित्तीय सेवा, सामाजिक सुरक्षा योजना आणि दहा हजार रुपयांपर्यंतच्या ओव्हरड्राफ्ट सुविधेचा लाभ घेता येईल. त्यामुळे अशा सर्व नागरिकांना वित्तीय सेवांच्या मुख्य प्रवाहात आणणे शक्य होईल तसेच विविध सवलत योजनांचे लाभ, संबंधित लाभार्थींच्या खाती थेट हस्तांतरीत करता येतील.

प्रधानमंत्री जन धन योजनेची कामगिरी

  • सुमारे 32.41 कोटी बँक खाती उघडण्यात आली, त्याद्वारे 81,200 कोटी रुपयांची ठेव प्राप्त झाली.
  • 59 टक्के जनधन खातेधारक आणि जनधन खातेधारक असणाऱ्या 53 टक्के महिला या ग्रामीण किंवा निमशहरी भागातील आहेत. आसाम, मेघालय आणि जम्मू काश्मीर वगळता 83 टक्क्यांपेक्षा जास्त सक्रीय जनधन खाती, आधारशी संलग्न आहे, त्यापैकी 24.4 कोटी खातेधारकांना रुपे कार्ड जारी करण्यात आली आहेत.
  • 7.5 कोटी पेक्षा जास्त जनधन खातेधारकांना थेट लाभ हस्तांतरणाचा लाभ मिळाला आहे.
  • 1.26 लाख उप सेवा क्षेत्रांमध्ये बँकिंग करस्पाँडन्ट नेमण्यात आले असून ते प्रत्येकी 1000 ते 1500 घरांना सेवा देतात. त्यांच्या माध्यमातून जुलै 2018 मध्ये आधार सक्षम प्रदान यंत्रणेच्या माध्यमातून 13.16 कोटी व्यवहार झाले आहेत.
  • प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजनेच्या 13.98 कोटी सदस्यांचे 388.72 कोटी रुपये मूल्याचे 19,436 दावे निकाली काढण्यात आले आहेत.
  • प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजनेच्या 5.47 कोटी सदस्यांचे 2206.28 कोटी रुपये मूल्याचे 1.10 लाख दावे निकाली काढण्यात आले.
  • 1.11 कोटी नागरिकांनी अटल पेंशन योजनेचे सदस्यत्व स्वीकारले.
  • प्रधानमंत्री जन धन योजनेच्या अंमलबजावणीसाठी जनधन खाती आणि मोबाईल बँकिंग आधाराला जोडण्याची यंत्रणाही तयार करण्यात आली. या यंत्रणेच्या माध्यमातून बचत, कर्ज प्रदान तसेच सामाजिक सुरक्षा अशा सुविधांबरोबरच थेट लाभ हस्तांतरणाचे लाभही लाभार्थींना प्रदान केले जातात.

प्रत्येक घरातील प्रत्येक प्रौढ व्यक्तीचे खाते उघडण्याच्या दृष्टीने प्रधानमंत्री जनधन योजना सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

 

पार्श्वभूमी

बँकिंग व्यवहार वाढविण्याबरोबरच वित्तीय समावेशनाला प्रोत्साहन देणे तसेच देशातील प्रत्येक घरात किमान एका व्यक्तीचे बँक खाते असावे, या हेतूने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2014 रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त केलेल्या भाषणात या योजनेची घोषणा केली. राष्ट्रीय स्तरावर 28 ऑगस्ट 2014 रोजी पंतप्रधानांनी या योजनेचे औपचारिक उद्‌घाटन केले.

 

S.Tupe/M.Pange/P.Kor



(Release ID: 1545122) Visitor Counter : 164


Read this release in: English