पर्यटन मंत्रालय
सहावी आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट कॉन्क्लेव्ह २०१८ औरंगाबाद येथे आयोजित होणार
Posted On:
23 AUG 2018 5:57PM by PIB Mumbai
मुंबई, 23 ऑगस्ट 2018
महाराष्ट्रातील महत्त्वाची बौद्ध वारसा ठिकाणे आणि तीर्थस्थळे यांना चालना देण्याच्या उद्दिष्टाने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे पर्यटन खात्याच्या सहकार्याने २४ ऑगस्ट २०१८ रोजी औरंगाबाद येथे ६ व्या आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट कॉन्क्लेव्ह २०१८ चे आयोजन करण्यात आले आहे. या आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट कॉन्क्लेव्ह २०१८ मध्ये जगभरातील पारंपरिक व ऐतिहासिक बुद्ध पैलूंवर प्रकाश टाकण्यात येईल.
या कॉन्क्लेव्हसाठी बौद्ध अभ्यागत, भिक्खू आणि १२ ते १५ बौद्ध राष्ट्रांमधील महावाणिज्य दूत (कौन्सुलेट जनरल) उपस्थित राहणार आहेत. या निमित्ताने त्यांच्यात व स्थानिक सहल आयोजकांमध्ये बैठका होणार आहेत. त्याचप्रमाणे राज्यातील बौद्ध आकर्षणांवर प्रकाश टाकणारी सादरीकरणे आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या कॉन्क्लेव्हमध्ये संभाव्य पर्यटकांशी सहभागींना संवाद साधता येणार आहे, त्याचप्रमाणे तीर्थ पर्यटनाला चालना, पॅकेज आणि संभाव्य पर्यटकांना त्यांची विक्री करता येणार आहे.
आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट कॉन्क्लेव्ह म्हणजे आपल्या देशातील बुद्ध वारशाच्या अंतरंगाचा अनुभव घेऊ इच्छिणाऱ्या प्रवाशांना व पर्यटकांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या पर्यटन खात्याच्या आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या बांधिलकीचे द्योतक आहे.
या प्रसंगी प्रतिक्रिया देताना महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल म्हणाले, "बुद्ध पर्यटन हे प्रगतीशील क्षेत्र आहे आणि आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट कॉन्क्लेव्हच्या निमित्ताने आपल्या राज्यातील बुद्ध स्थळांमधील क्षमता आणि संधी समजून घेण्यास मदत होणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून जगभरातील बुद्धप्रेमी प्रवाशांना महाराष्ट्र राज्य आकर्षित करेल, असा मला विश्वास आहे. पर्यटन मंत्रालयानेही देशभरातील स्तूप आणि विहारांची माहिती घेतली आहे आणि ते बुद्ध परिक्रमा विकसित करण्याची योजना आखत आहेत. अधिक माहितीसाठी खालील ठिकाणी भेट द्या: http://www.maharashtratourism.gov.in/
N.Sapre/MTDC/P.Kor
(Release ID: 1543720)
अभ्यागत कक्ष : 102