पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युगांडा संसदेमध्ये केलेले भाषण

Posted On: 25 JUL 2018 6:15PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 25 जुलै 2018

 

सन्माननीय राष्ट्रपती महोदय योवेरी मुसेवेनी,

सन्माननीय उपराष्ट्रपती,

युगांडा संसदेच्या सभापती माननीय रेबेका कडागा,

मंत्री महोदय,

प्रतिष्ठीत सज्जन,

बंधू आणि भगिनींनो,

नमस्कार!

बालामुसिजा!

या महान संसदेच्या सभागृहामध्ये भाषण करण्यासाठी आपण मला आमंत्रित केलेत, यामध्ये मला स्वतःचा गौरव होत असल्याचा अनुभव येत आहे. इतर विविध देशांच्या संसद सदनांमध्येही मला भाषण देण्याची संधी यापूर्वी प्राप्त झाली आहे. तरीही माझ्या या अनुभवाला वेगळे महत्व आहे. कारण युगांडा संसद सदनामध्ये भाषण करण्याचा सन्मान भारताच्या पंतप्रधानाला पहिल्यांदाच मिळाला आहे. हा केवळ माझा किंवा पंतप्रधानाचा सन्मान नाही, तर भारताच्या सव्वाशे कोटी जनतेचा सन्मान आहे. या सदनामधून मी युगांडाच्या जनतेला भारतीय नागरिकांच्यावतीने शुभेच्छा देतो आणि त्यांच्याकडून मी मैत्रीचा संदेश घेवून आलो आहे, तोही आपल्यापर्यंत पोहोचवतो. सभापती महोदया, आपण इथे उपस्थित असल्यामुळे मला आमच्या लोकसभा सदनाची आठवण येत आहे. आमच्याकडेही एक महिलाच लोकसभा सभापतीपदी विराजमान आहे. या सभागृहामध्ये मला युवा सदस्य मोठ्या संख्येने दृष्टीस पडत आहेत. हा  लोकशाहीच्या दृष्टीने एक चांगला संकेत आहे, असे मला वाटते. ज्या ज्यावेळी मी युगांडा इथं येतो, त्या त्यावेळी मी या ‘अफ्रिकी मोत्यांनी’ अगदी मंत्रमुग्ध होवून जातो. आपल्या देशाला निसर्ग सौंदर्याचे आणि नैसर्गिक साधन संपत्ती यांच्या समृद्धीचे वरदान लाभले आहे. इथल्या नद्या आणि सरोवरांनी या विशाल भूभागाचे चांगल्या प्रकारे सिंचन केलं आहे आणि या भूमीचे उत्तम पोषणही केले आहे. आत्ता यावेळी मी इतिहासाविषयी जागरूक आहे. सर्वात मोठ्या लोकशाहीचा पंतप्रधान दुस-या एका राष्ट्राच्या निवडून आलेल्या संसद सदस्यांना मार्गदर्शन करत आहे. आपल्यामधील प्राचीन सामुद्रिक संपर्क, वसाहतवादाच्या  काळातील अंधारयुग, स्वातंत्र्यासाठी आपण केलेला संघर्ष, युद्धामुळे खंडित झालेल्या विश्वामध्ये स्वतंत्र देश म्हणून त्याकाळामध्ये निर्माण झालेली अनिश्चित दिशा. या सर्वांमध्ये नवीन संधींचा उदय आणि आमच्या युवा पिढीच्या आशा आकांक्षा हा आपल्यामधील समान दुवा आहे. हा सेतूच आपल्याला जोडणारा आहे.

 

राष्ट्रपती महोदय,

आपले सगळे लोक या साखळीचा एक भाग आहेत. युगांडा आणि भारत यांना जोडणारी ही एक कडी आहे. एका शताब्दीपूर्वी अथक परिश्रमातून रेल्वेच्या माध्यमातून युगांडा आणि हिंद महासागराचा किनारा जोडला गेला होता. आपल्या सर्वांची उपस्थिती म्हणजे, आमच्या जनतेमध्ये मित्रता आणि एकजूटता यांचे मूल्य दाखवून देत आहे. आपण आपल्या देशामध्ये आणि या पूर्ण क्षेत्रामध्ये, भागामध्ये शांतता प्रस्थापित केली आहे. अनेक संकटं आणि आव्हानांना तोंड देवून आपण विकास आणि प्रगतीचा मार्ग स्वीकारला आहे. आपण महिलांना सक्षम बनवून त्यांनाही राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात सहभागी करून घेतले आहे. आपल्याकडच्या दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वामुळे भारतीय वंशाच्या युगांडामधल्या नागरिकांना आपल्या घरी, मायदेशी परतणे शक्य झाले आहे. त्यांना तेवढे सक्षम बनवण्याचे काम आपण केले आहे. आपण त्यांना जीवनात एक नवीन अध्याय सुरू करण्याची प्रेरणा दिली आहे. त्यामुळे या युगांडावासी मूळ भारतीयांनाही आता आपल्या प्रिय भारत देशाच्या नवनिर्माणासाठी मदत करता येणार आहे. युगांडामध्ये शासकीय स्तरावर आपण दीपावली महोत्सवाचे आयोजन करून भारत आणि युगांडा यांचे संबंध अधिक दृढ झाले आहेत, आणि उभय देशातल्या स्नेहबंधाच्या सर्व साखळ्या आता चांगल्या चमकदार बनण्यास मदत झाली आहे. जिन्‍जा हे स्थान खूप पवित्र आहे. नील नदीच्या उगमस्थानानजीक जिन्जा आहे. याच स्थानी महात्मा गांधींच्या अस्थिंचा काही भाग विसर्जित करण्यात आला होता. गांधीजी जीवंत असताना ते अफ्रिकी लोकांबरोबर होतेच परंतु त्यांच्या अस्थि या भागात विसर्जित केल्यामुळे आता जीवनानंतरही ते आपल्या बरोबरच आहेत. जिन्जा या पवित्र स्थानी, ज्याठिकाणी आज महात्मा गांधी यांची प्रतिमा बसवण्यात आली, त्याठिकाणी आम्ही गांधी वारसा केंद्र बनवणार आहोत. महात्मा गांधी यांची आता 150वी जयंती येत आहे. त्यांचे येथे वारसा केंद्र बनवण्यासाठी, यापेक्षा चांगला मुहूर्त दुसरा कोणताही असू शकणार नाही. महात्मा गांधी यांच्या मिशनला आकार देण्याच्या कार्यामध्ये अफ्रिकेची किती महत्वाची भूमिका होती, हे या केंद्रामुळे आपल्याला सर्वांना माहिती होणार आहे. त्याचबरोबर अफ्रिका स्वतंत्र व्हावा आणि या देशाला न्याय मिळावा, यासाठी गांधींच्या कार्यातून कशा प्रकारे प्रेरणा या देशाला मिळाली, हे या प्रदर्शनातून उमजणार आहे. त्याचबरोबर महात्मा गांधी यांचे जीवन आणि त्यांनी दिलेला संदेश यांचे मूल्य याविषयीही आपल्या सर्वांना माहिती मिळू शकणार आहे.

 

महोदय,

भारताचा स्वतंत्रता संग्राम आणि अफ्रिका यांच्यामध्ये खूप खोलवर संबंध जोडले गेलेले आहेत. यामध्ये  केवळ अफ्रिकेमध्ये गांधीजी यांनी 21 वर्षे काळ व्यतीत केला किंवा त्यांचे पहिले असहकार आंदोलन इथं झालं, इतका मर्यादित भाग नाही. भारतासाठी स्वातंत्र्य लढ्यामध्ये नैतिक सिद्धांताच्या जोरावर किंवा शांतीपूर्ण माध्यमाने ते प्राप्त करण्याची प्रेरणा भारताच्या सरहद्दीपर्यंतच मर्यादित राहिली नव्हती. फक्त भारतीयांच्या भविष्याचा विचार त्यामध्ये नव्हता. तर संपूर्ण मानवाच्या मुक्तीसाठी, सन्मानासाठी, सर्वांना समान संधी मिळाल्या पाहिजेत, सगळीकडे समानता असली पाहिजे, यासाठी हा लढा सार्वभौमाच्या शोधासाठी होता. मला वाटतं, ही गोष्ट अफ्रिकेइतकी कुठंच लागू होवू शकत नाही. आम्हाला  स्वातंत्र्य मिळण्याआधी 20 वर्षे आमच्याकडच्या स्वांतत्र्य लढ्यातल्या नेत्यांनी भारताच्या स्वांतत्र्य लढ्याशी संपूर्ण जगातल्या आणि विशेष करून अफ्रिकेतल्या वसाहतवादाच्या जुलमी राजवटीविद्ध संघर्षाचे बीज पेरले होते. ज्यावेळी भारत स्वातंत्र्याच्या दाराशी उभा होता, त्यावेळी आमच्या मनामध्ये अफ्रिकेच्या भविष्याचा विचार होता. महात्मा गांधी यांनी ठामपणाने स्पष्ट केलं होतं की, जोपर्यंत अफ्रिका गुलामीच्या बेड्यांमध्ये जखडलेला आहे, तोपर्यंत भारताला मिळालेले स्वातंत्र्य अपूर्ण आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही महात्मा गांधींच्या शब्दांचे आमच्या देशाला कधीच विस्मरण झालं नाही. भारताने बानडुंग येथे अफ्रिका-अशियाई एकजूटता कशी होईल, यासाठी प्रयत्न केले होते. आम्ही दक्षिण अफ्रिकेमध्ये असलेल्या रंगभेदाला नेहमीच, सातत्याने कडाडून विरोध केला आहे. आम्ही पूर्वीचा रोडेशिया, म्हणजेच आत्ताचा झिम्बाब्वे आहे, तिथल्या गिनी बसाऊ, अंगोला आणि नामिबिया यांच्या प्रश्नांमध्ये स्पष्ट भूमिका घेतली आहे. गांधीजी यांच्या शांतीपूर्ण असहकार आंदोलनाने नेल्सन मंडेला, डेसमंड टूटू, अल्बर्ट लुतहुली, जूलियस न्येरेरे आणि क्वामे एनक्रुमाह यांच्यासारख्या नेत्यांना प्रेरणा देण्याचे कार्य केले आहे. भारत आणि अफ्रिका यांनी प्राचीन काळात केलेला संघर्ष, शांतिपूर्ण मार्गाने केेलेली आंदोलने, याची साक्ष इतिहासात मिळते. अफ्रिकेमध्ये घडवून आणण्यात आलेले अनेक महत्वपूर्ण बदल हे गांधीवादी पद्धतीमुळे येवू शकले आहेत. अफ्रिका मुक्ती आंदोलनाला सैद्धांतिक समर्थन दिल्यामुळे भारताला बरेचवेळा व्यापारी नुकसान सोसावे लागले होते. परंतु अफ्रिकेला मिळालेल्या स्वातंत्र्यापुढे या नुकसानाला फारसे महत्व भारताने कधीच दिलेले नाही. आमच्या देशाच्या दृष्टीने अफ्रिकेचे स्वातंत्र्य अधिक महत्वाचे आहे.

 

सन्माननीय महोदय,

गेल्या सात दशकांचा विचार केला तर उभय देशांमध्ये आर्थिक आणि आंतरराष्ट्रीय सामंजस्य यांच्यामुळे भारत आणि अफ्रिका यांच्यात नैतिक सिद्धांत आणि भावनिक नाते अधिकाधिक दृढ बनले आहे. आमच्या दृष्टीने बाजारपेठेत आणि साधनांमध्ये समानता असावी. इतकेच नाही तर, विश्वाच्या बाजारपेठेमध्ये पायाभूत विकासासाठी आपण एकत्रित संघर्ष केला आहे. त्याचबरोबर आपण दक्षिणेकडील देशांमध्ये आर्थिक सामंजस्य निर्माण व्हावे, त्यामध्ये विविधता यावी, यासाठीही काम केले आहे. आमच्या देशातले डॉक्टर आणि अध्यापक अफ्रिकेमध्ये आले, ते केवळ त्यांना व्यावसायिक विकासाची संधी मिळतेय, म्हणून आलेले नाहीत. तर स्वंतत्र देशांच्या विकासामध्ये आपणही भागिदार बनावे, या देशांमध्ये एकजूटीची भावना निर्माण व्हावी, यासाठी हे व्यावसायिक इथं आले आहेत. राष्ट्रपती मुसेवेनी यांनी दिल्लीमध्ये 2015मध्ये आयोजित केलेल्या भारत-अफ्रिका शिखर परिषदेमध्ये सांगितलं होतं, त्याचाच मी आत्ता इथं पुनरूच्चार करतो. ‘‘आपण वसाहतवादाच्या जुलमी राजवटीविरूद्ध एकजूट होवून संघर्ष केला आहे. चला, तर मग आताही समृद्धीसाठी आपण एकत्र होवून संघर्ष करूया’’.

आज भारत आणि अफ्रिका यांच्यामध्ये अपार संभावना आहेत. आपल्याकडे भरपूर आत्मविश्वास आहे. सुरक्षित, ऊर्जावान आणि कठोर परिश्रम करण्यास सिद्ध असलेली जनता आहे. अफ्रिकेच्या विकासाचे एक चांगले उदाहरण म्हणजे युगांडा आहे. आता इथं लैंगिक समानता वाढत आहे. शैक्षणिक आणि आरोग्य यांच्या दर्जामध्ये खूप चांगली सुधारणा झाली आहे. त्याचबरोबर पायाभूत सुविधा आणि संपर्क व्यवस्था यांचा विकास तसेच विस्तार होत आहे. वाढता व्यापार आणि गुंतवणूक यांच्यासाठी हा भाग चांगला आहे. आता होत असलेल्या नवाचाराचा विकास आपल्यासाठी लाभदायक ठरणारा आहे. या देशाशी आमचे मैत्रीचे अतिशय घट्ट संबंध असल्यामुळे अफ्रिकेला मिळत असलेल्या प्रत्येक यशाचे आम्ही स्वागत करतो.

 

महोदय,

अफ्रिकेच्या मैत्रीबद्दल भारताला गर्व वाटतो आणि या उपखंडामध्ये युगांडाच्या विकासाविषयी आम्ही कटिबद्ध आहोत. कालच मी युगांडासाठी व्दिस्तरीय ऋण देण्याची घोषणा केली आहे. यामध्ये पहिल्या स्तरामध्ये वीज प्रकल्पासाठी 141 दशलक्ष अमेरिकी डाॅलर कर्ज देण्यात येणार आहे. तर दुस-या स्तरावर कृषी आणि दुग्ध उत्पादनासाठी 64 दशलक्ष अमेरिकी डॉलर कर्ज देण्यात येणार आहे. भूतकाळात आपण ज्याप्रमाणे मदत केली आहे, त्याप्रमाणे आपण कृषी, आरोग्य सुविधा, शिक्षण आणि प्रशिक्षण, संरचना आणि ऊर्जा, सरकारमध्ये क्षमता निर्माण करणे आणि संरक्षण क्षेत्रामध्ये प्रशिक्षण देणे, यासाठी युगांडातील जनतेच्या आशा-आकांक्षांचा प्रामुख्याने विचार करण्यात येणार आहे. अंतरराष्ट्रीय सौर आघाडीमध्ये सहभागी होण्याचा निर्णय आपल्या देशाने घेतला आहे, याबद्दल मी राष्ट्रपती मुसेवेनी आणि या सदनाला धन्यवाद देतो.

 

महोदय,

युगांडाच्याबरोबर आम्ही या विशाल अफ्रिकेबरोबर सामंजस्य अधिक मजबूत केले आहे. गेल्या चार वर्षांमध्ये आमचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती तसेच मी सुद्धा सामुहिक रूपामध्ये अफ्रिकतल्या 25 देशांची यात्रा केली आहे. आमच्या मंत्र्यांनीही संपूर्ण अफ्रिकी देशांची यात्रा केली आहे. ऑक्टोबर 2015 मध्ये झालेल्या तिसऱ्या अफ्रिका-भारत फोरम शिखर परिषदेमध्ये 54 देशांपैकी 30पेक्षा जास्त राष्ट्राध्यक्ष तसेच सरकारी स्तरावरील 54 देशांचे यजमानपद भूषवले आहे. आम्ही आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या उद्‌घाटन बैठकीसाठी अफ्रिकी नेत्यांसाठी यजमानपद भूषवले आहे. या बैठकींव्यतिरिक्त गेल्या चार वर्षांमध्ये अफ्रिकेच्या 32 राष्ट्राध्यक्ष आणि शासनाध्यक्षांनी भारताला भेटी दिल्या आहेत. माझ्या गृहराज्यात- गुजरातमध्ये  मोठ्या उत्साहात आणि अतिशय शानदारपणे गेल्याच वर्षी अफ्रिकी विकास बँकेची पहिली बैठक पार पडली. या बैठकीचे यजमानपद गुजरातने खूप चांगल्या पद्धतीने भूषवले. आम्ही अफ्रिकेमध्ये नवीन 18 राजदूतावास सुरू करीत आहोत.

महोदय,

विकास प्रकल्पांचा विचार केला तर आम्ही 40 पेक्षा जास्त अफ्रिकी देशांमध्ये संयुक्त प्रकल्प राबवत आहोत. यामध्ये 11 अब्ज अमेरिकी डॉलर्सचा पतपुरवठा करण्यात आला आहे. या वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी 600 दशलक्ष डॉलरचे अनुदान मिळणार आहे. विविध कार्यक्रमांअंतर्गत दरवर्षी 8000पेक्षा जास्त अफ्रिकी युवकांना प्रशिक्षित करण्याचे कार्य भारतामध्ये केले जात आहे. आम्ही नेहमीच कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यायचे, याचा विचार करून योजना तयार करतो. त्याप्रमाणे भारतीय कंपन्यांनी अफ्रिकेमध्ये 54 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे. अफ्रिकेबरोबर आम्ही 62 अब्ज डॉलर्सपेक्षाही जास्त व्यापारी व्यवहार केले आहेत. हे व्यवहार गेल्यावर्षीच्या तुलनेत  21 टक्के जास्त आहेत. संपूर्ण अफ्रिका ई-नेटवर्कने जोडले गेले आहे. यामध्ये अफ्रिकेतले 48 देश भारताशी जोडले गेले आहेत. यामुळे अफ्रिकेमध्ये डिजिटलचा प्रसार चांगल्या पद्धतीने आणि वेगाने होत आहे. किनारपट्टीलगत असलेल्या विविध देशांबरोबर आम्ही सामंजस्य निर्माण करून नील अर्थव्यवस्थेचा पाया अधिक भक्कम कसा करता येईल, याचा विचार भारत करीत आहे. त्याचबरोबर आरोग्य सेवेच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त ठरत असलेल्या औषधांची माहिती भारताकडे आहे. भविष्यात काही आजार अफ्रिकेच्या दृष्टीने अतिशय भयानक ठरणार आहेत, त्या आजारांवर भारतीय औषधे अतिशय कमी दरामध्ये, सर्वांना परवडणारी आहेत. त्या औषधांचा लाभ अफ्रिकेलाही देण्याची तयारी भारताने दाखवली आहे. या भारतीय औषधांमुळे अफ्रिकेच्या जनतेला आरोग्य सेवा आता कमी दरामध्ये उपलब्ध होवू शकणार आहे.

 

महोदय

ज्याप्रमाणे आम्ही विकासासाठी, समृद्धीसाठी संयुक्तपणे कार्यरत आहोत, अगदी त्याचप्रमाणे सर्वत्र शांतता प्रस्थापित व्हावी, यासाठीही आम्ही एकत्र आलेले आहोत. अफ्रिकी मुलांना शांतीचा अनुभव भविष्यात घेता यावा, यासाठी भारतीय सैनिकांनी सेवा दिली आहे. 1960मध्ये कांगोमध्ये आमच्या पहिल्या तुकडीने संयुक्त राष्ट्र शांती मोहिमेअंतर्गत भारतीय शांती सैनिकांनी केलेल्या कार्याचा आम्हाला अभिमान आहे. संपूर्ण जगामध्ये संयुक्त राष्ट्र शांती मोहिमेमध्ये 163 भारतीयांनी सर्वोच्च बलिदान दिले. इतर देशांचा विचार करता, हा आकडा सर्वाधिक आहे. यापैकी 70टक्के सैनिकांनी अफ्रिकेमध्ये हौतात्म्य पत्करले आहे. आज अफ्रिकेमध्ये सहा हजारांपेक्षा जास्त सैनिक पाच शांती कारवाईमध्ये सहभागी झाले आहेत. भारतीय महिलांनी लायबेरियामध्ये संयुक्त राष्ट्राच्या संयुक्त महिला पोलिस दलामध्ये योगदान देवून ऐतिहासिक कार्य केले आहे. अफ्रिकी देशांबरोबर आम्ही संरक्षण आणि सुरक्षा सहकार्य वृद्धी करीत आहोत. दहशतवाद आणि चाचेगिरी यांचा सामना करण्यासाठी आणि आपल्या सागरी सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही संयुक्तपणे कार्यरत आहोत.

 

महोदय,

अफ्रिकेबरोबर भारत करीत असलेल्या सहयोगाचे 10 सिद्धांत आहेत.

1. अफ्रिका आमच्या दृष्टीने सर्वोच्च प्राथमिकता असलेला देश असेल.आम्ही अफ्रिकेबरोबर सहकार्य कायम ठेवणार आहोत आणि हे सहकार्य निरंतर, नियमित असेल.

2. आम्ही विकासासाठी सामंजस्य करणार आहोत, त्यासाठी आपल्याला प्राधान्य देणार आहोत. आपल्याला योग्य, अनुकूल असलेल्या नियमांनुसार हे सामंजस्य असेल. यामध्ये आपल्या क्षमतांची बाधा उत्पन्न होणार नाही. तसेच आपल्याला भविष्यामध्ये त्याचा त्रास होणार नाही. आम्ही अफ्रिकेची योग्यता आणि अफ्रिकेकडे असलेले कौशल्य यांच्यावर भरवसा करतो. स्थानिक पातळीवर असलेली निर्मिती क्षमता त्याचबरोबर  स्थानिक लोकांना मिळू शकणारी संधी, यांचाही विचार आम्ही करतो.

3. आमची बाजारपेठ अफ्रिकेसाठी मुक्त असणार आहे. अफ्रिकी व्यापा-यांना ती अधिक आकर्षित करू शकेल, अशी ही बाजारपेठ असेल. यामुळे भारताबरोबर अधिकाधिक व्यापार होवू शकेल. आम्ही अफ्रिकेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आमच्या उद्योजकांना प्रोत्साहन देवू.

4. आम्ही अफ्रिकेच्या विकासासाठी प्रोत्साहन देवू. त्याचबरोबर सेवा क्षेत्र, शिक्षण आणि आरोग्य सुविधा यांच्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी, डिजिटल साक्षरतेचा प्रसार करण्यासाठी, वित्तीय समावेशाच्या विस्तारासाठी आणि वंचित, शोषित लोकांना मुख्य धारेमध्ये आणण्यासाठी भारताने ज्या प्रकारे डिजिटल क्रांती घडवून आणली, त्या अनुभवाचा वापर अफ्रिकेसाठी भारत करेल.

हे कार्य संयुक्त राष्ट्राच्या निरंतर विकास कार्याचे लक्ष्य गाठण्यासाठी म्हणून केले जाणार नाही तर डिजिटल युगामध्ये अफ्रिकेतील युवकही सहभागी झाले पाहिजेत, यासाठी भारत हे काम अफ्रिकेमध्ये करणार आहे.

5. धान्य लागवडीसाठी योग्य अशा जगातल्या एकूण भूमीपैकी 60 टक्के जमीन अफ्रिकेमध्ये आहे. परंतु जगाच्या उत्पादनामध्ये अफ्रिकेचा हिस्सा फक्त 10 टक्के आहे. हे लक्षात घेवून आम्ही अफ्रिकेच्या कृषी क्षेत्रामध्ये सुधारणा करण्यासाठी सहयोग देणार आहोत.

6. हवामान परिवर्तनामुळे निर्माण झालेल्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी आम्ही सहकार्य करणार आहोत. आपण आंतरराष्ट्रीय हवामान व्यवस्था चांगल्या प्रकारे कार्यरत करण्यासाठी काम करणार आहोत. आपल्याकडील जैव विविधतेचे संवर्धन करण्यासाठी आणि स्वच्छ तसेच परवडणारी ऊर्जा मिळावी, यासाठी अफ्रिकेच्या बरोबर कार्य करणार आहे.

7. आम्ही दहशतवाद आणि कट्टरवाद यांचा संयुक्तपणे सामना करणार आहोत. सायबर स्पेस सुरक्षित ठेवण्यासाठी आणि शांतीसाठी संयुक्त राष्ट्राला पाठिंबा देण्यासाठी सहकार्य आणि परस्परांना मदत करण्यात येणार आहे. आणि यातून एकमेकांना मजबूत बनवणार आहोत.

8. सागरी सीमांचे बंधन न ठेवता, त्या मुक्त ठेवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर सर्व देशांचा लाभ व्हावा, कोणालाही नुकसान सहन करावे लागू नये, यासाठी अफ्रिकी देशांच्या बरोबर काम करणार आहोत. अफ्रिकेच्या पूर्व किनारपट्टीचा भाग आणि हिंद महासागराचा पूर्व भाग यांच्यामध्ये सहकार्याची आवश्यकता आहे. या भागामध्ये स्पर्धा करणे योग्य नाही, म्हणून हिंद महासागराच्या भागात सुरक्षा राखण्यासाठी भारत सहयोग आणि समावेशकता, यांचा अवलंब करते. यामुळे सुरक्षा आणि विकास या दोन्ही गोष्टी साध्य होत आहेत.

9. हे कलम माझ्या दृष्टीने विशेष महत्वपूर्ण आहे. अफ्रिकेत वैश्विक सहयोग, वृद्धी लक्षात घेवून आपण सर्वजण एकत्रित काम करण्याची गरज आहे. त्यायोगे अफ्रिकेला पुन्हा कधीच प्रतिव्दंदीच्या आखाड्याचे रूप येणार नाही. याउलट अफ्रिकी युवकांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करणारं स्थान बनले पाहिजे, असे वाटते.

10. भारत आणि अफ्रिका यांनी अगदी बरोबरीने वसाहतवादाची जुलमी राजवट सहन केली आहे. म्हणूनच आपण न्याय-उचित, प्रतिनिधीमूलक आणि लोकशाही व्यवस्था कायम ठेवून एकत्रित येवून कोणतेही कार्य केले पाहिजे. अफ्रिका आणि भारत या देशांमध्ये राहणा-या एक तृतियांश जनतेला मानवतेचा आवाज, भूमिका माहीत नाही. तो अधिकार त्यांना देण्याची गरज आहे. वैश्विक संस्थांमध्ये सुधारणा घडण्यासाठी अफ्रिकेचाही विकास भारताच्याबरोबरीने झाला पाहिजे, असे आम्हाला वाटते. आमच्या विदेश नीतीचा हाच महत्वपूर्ण उद्देश असणार आहे.

 

महोदय,

सध्याचे शतक जर आपण देशांच्या स्वातंत्र्यांचे आणि समानतेचे मानले तरच सर्वांमध्ये जागृती निर्माण होणार आहे. मानवाला मिळत असलेल्या  कोणत्याही संधींचे हे युग आहे, असे मानले तर आपले भविष्य निश्चितच खूप उज्ज्वल आहे. अफ्रिकी देशांना उर्वरित जगाच्या बरोबरीने एक साथ ‘कदमताल’ मिळवून चालले पाहिजे. भारत आपल्या बरोबर आहे, आपल्यासाठी कार्यरत आहे. आमच्यातील  सामंजस्यामुळे अफ्रिकेमध्ये सशक्तीकरणाचे उपाय अधिक परिणामकारक ठरणार आहेत. आपल्या प्रयत्नांमध्ये पारदर्शकता असली पाहिजे. त्याचबरोबर समानतेच्या सिद्धांताविषयी एकजूटतेने आपण कार्य करणार आहोत. भारताची दोन तृतियांश लोकसंख्या आणि अफ्रिकेची दोन तृतियांश लोकसंख्या यांचे वय 35 वर्षांपेक्षा कमी आहे. म्हणजेच भविष्य युवकांचे आहे. ही शताब्दी आमची आहे. युगांडामध्ये एक म्हण प्रचलित आहे. ‘‘ जो कोणी अधिक प्रयत्न करतो, त्याला अधिक लाभ मिळतो’’ आपल्यालाही हेच सिद्ध करायचे आहे. भारताने अफ्रिकेसाठी जास्त, अतिरिक्त प्रयत्न केले आहेत आणि अफ्रिकेच्या चांगल्या भविष्यासाठी यापुढेही असेच भरपूर प्रयत्न आम्ही सातत्याने करीत राहणार आहे.

धन्यवाद. खूप खूप धन्यवाद!

 

B.Gokhale/S.Bedekar/P.Kor



(Release ID: 1542896) Visitor Counter : 255


Read this release in: English