पंतप्रधान कार्यालय

जागतिक जैवइंधन दिन कार्यक्रमात पंतप्रधानांचे मार्गदर्शन

Posted On: 10 AUG 2018 2:38PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 ऑगस्ट 2018

 

जागतिक जैवइंधन दिनानिमित्त आज नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला शेतकरी, शास्त्रज्ञ, उद्योजक, विद्यार्थी, सरकारी अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

21 व्या शतकात जैवइंधने भारताला नवी गती देऊ शकतात, असे पंतप्रधान म्हणाले. पिकापासून तयार केलेले हे इंधन असून गावातील तसेच शहरातील नागरिकांचेही जीवन ते बदलू शकतात.

अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना जैवइंधनापासून इथेनॉल उत्पादनाची योजना आखण्यात आली होती. 2014 नंतर इथेनॉल मिश्रण उपक्रमासाठी आराखडा तयार करण्यात आला, असे पंतप्रधानांनी सांगितले. याचा शेतकऱ्यांना फायदा झालाच. याशिवाय गेल्या वर्षी 4000 कोटी रुपयांच्या परकीय चलनाची बचत करण्यातही मदत झाली. पुढल्या वर्षी हे लक्ष्य 12 हजार कोटी रुपये ठेवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

बायोमासचे रुपांतर जैवइंधनात करण्यासाठीच्या प्रयत्नात केंद्र सरकार मोठी गुंतवणूक करत आहे. 12 आधुनिक शुद्धीकरण कारखाने उभारण्याची सरकारची योजना आहे. या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होईल, असे पंतप्रधान म्हणाले.

जनधन, वनधन आणि गोबरधनसारख्या योजना गरीब, आदिवासी आणि शेतकऱ्यांचे जीवन बदलण्यात साहाय्यकारी ठरत आहेत.

जैवइंधनापासून परिवर्तन घडवण्याची क्षमता केवळ विद्यार्थी, शिक्षक, शास्त्रज्ञ, उद्योजक आणि नागरिकांच्या सहभागातूनच प्रत्यक्षात उतरु शकेल, असे ते म्हणाले.जैवइंधनाचे फायदे ग्रामीण भागात पोहोचविण्यासाठी मदत करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले.

जैवइंधनावरील राष्ट्रीय धोरण 2018 वरील पुस्तिकेचे प्रकाशनही पंतप्रधानांच्या हस्ते झाले. परिवेश या एकल खिडकी केंद्राचा प्रारंभही त्यांच्या हस्ते झाला.

 

B.Gokhale/S.Kakade/P.Malandkar

 

 

 



(Release ID: 1542570) Visitor Counter : 109


Read this release in: English