पंतप्रधान कार्यालय

रवांडा सरकारच्या गिरींका कार्यक्रमांतर्गत, रेवरु आदर्श गावातील ग्रामस्थांना पंतप्रधानांच्या हस्ते गायी भेट

Posted On: 24 JUL 2018 5:41PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24  जुलै  2018

 

रवांडा सरकारच्या गिरींका कार्यक्रमांतर्गत रवांडामधील रेवरु आदर्श गावातील, स्वत:ची गाय नसणाऱ्या ग्रामस्थांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 200 गायी भेट दिल्या. रवांडाचे राष्ट्रपती पॉल कागामे यांच्या उपस्थितीत गायी प्रदान करण्याचा हा समारंभ पार पडला.

यावेळी बोलतांना पंतप्रधानांनी गिरींका कार्यक्रमाचे तसेच तो राबविण्यासाठी पुढाकार घेणारे  राष्ट्रपती पॉल कागामे यांचे कौतुक केले. रवांडामधील गावांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी अशा प्रकारे गायी देण्यात आल्याचे पाहून भारतातील नागरिकांनाही सुखद आश्चर्य वाटेल अशी भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली. दोन्ही देशांमधील ग्रामीण जीवनातील साम्य स्थळांबद्दल पंतप्रधानांनी माहिती दिली. गिरींका हा कार्यक्रम रवांडामधील गावांचे चित्र बदलण्याच्या कामी सहाय्यक ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पार्श्वभूमी :

गिरींका या शब्दाचा अर्थ आहे. तुमच्याकडे एक गाय असावी. एखाद्या व्यक्तीप्रती आदर आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठी त्या व्यक्तीला गाय देणे ही रवांडामधील कित्येक शतकांपूर्वीची प्रथा आहे. रवांडा देशात कुपोषणामुळे होणाऱ्या बाल मृत्यूचे मोठे प्रमाण लक्षात घेत या भागात गरीबी हटवण्याबरोबरच बालकांना चांगले पोषण मिळावे या उद्देशाने रवांडाचे राष्ट्रपती पॉल कागामे यांनी गिरींका कार्यक्रम हाती घेतला आहे. 2006 साली या कार्यक्रमाला सुरुवात झाली. तेंव्हापासून जून 2016 पर्यंत 248,566 गायी या देशातील गरीब घरांना प्रदान करण्यात आल्या आहेत. बालकांच्या पोषणाबरोबरच दूध आणि दूग्धजन्य पदार्थांचे उत्पादन घेऊन त्यापासून गरीब घरांमधील आर्थिक उत्पन्न वाढावे हा सुद्धा या कार्यक्रमामागचा उद्देश आहे.

 

B.Gokhale/M.Pange/P.Malandkar

 

 

 

 

 

 


(Release ID: 1539915) Visitor Counter : 168
Read this release in: English