पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रवांडा, युगांडा आणि दक्षिण आफ्रिका या देशांचा राजकीय दौरा

Posted On: 23 JUL 2018 3:04PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 23 जुलै 2018

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी रवांडा प्रजासत्ताक (23 ते 24 जुलै), युगांडा प्रजासत्ताक (24 ते 25 जुलै) आणि दक्षिण आफ्रिका प्रजासत्ताक (25 ते 27 जुलै) या देशांच्या राजकीय दौऱ्यावर असतील. भारतीय पंतप्रधानांनी रवांडाला भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे तर तब्बल 20 वर्षानंतर भारतीय पंतप्रधान युगांडाला भेट देणार आहेत. ब्रिक्स शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान दक्षिण आफ्रिकेला भेट देणार आहेत.

रवांडा आणि युगांडाच्या या अधिकृत दौऱ्यादरम्यान पंतप्रधान या दोन्ही देशांच्या राष्ट्रपतीसह द्विपक्षीय बैठका, प्रतिनिधी मंडळस्तरीय चर्चा आणि उद्योजक तसेच भारतीय समुदायाची भेट घेणार आहेत. रवांडामध्ये पंतप्रधान जेनोसाईड स्मारकाला भेट देतील आणि राष्ट्रपती पॉल कागने यांनी व्यक्तीश: सुरू केलेल्या ‘गिरींका’ (प्रति कुटुंब एक गाय) या राष्ट्रीय सामाजिक सुरक्षा योजनेशी संबेधित उपक्रमात सहभागी होतील. पंतप्रधान युगांडाच्या संसदेलाही संबोधित करणार आहेत. भारतीय पंतप्रधानांनी युगांडाच्या संसदेला संबोधित करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

पंतप्रधान दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रपतींबरोबर द्वीपक्षीय बैठक घेणार आहेत. तसेच ब्रिक्स शिखर परिषद आणि ब्रिक्सशी संबंधित इतर बैठकांमध्येही सहभागी होणार आहेत. ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान सहभागी देशांसोबत द्वीपक्षीय बैठका घेण्याचेही नियोजन करण्यात आले आहे.

आफ्रिकेसोबत भारताचे आजवरचे संबंध उत्तम आहेत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये मोठ्या संख्येने असलेला भारतीय समुदाय, या गतिमान विकासाच्या भागीदारीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्यादरम्यान संरक्षण, व्यापार, संस्कृती, कृषी तसेच दुग्धव्यवसाय क्षेत्रातील सहकार्याबाबत दोन्ही देशांमध्ये सामंजस्य करार आणि करांरांवर स्वाक्षऱ्या होणार आहेत.

गेल्या काही वर्षांमध्ये आफ्रिकन देशांसोबत विविध क्षेत्रात आपले सहकार्य वाढले आहे. गेल्या चार वर्षांमध्ये राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान स्तरावर दक्षिण आफ्रिकेचे 23 दौरे झाले  असून भारताच्या परराष्ट्र धोरणात आफ्रिकेला नेहमीच प्राधान्य राहिले आहे. पंतप्रधानांच्या या रवांडा, युगांडा आणि दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यामुळे आफ्रिकेन उपमहाद्वीपासह आपले संबंध अधिक दृढ होतील.

 

B.Gokhale/M.Pange/P.Kor



(Release ID: 1539622) Visitor Counter : 114


Read this release in: English