पंतप्रधान कार्यालय

इंडोनेशिया, मलेशिया आणि सिंगापूर दौऱ्याआधी पंतप्रधानांचे वक्तव्य

Posted On: 28 MAY 2018 9:23PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 28 मे 2018

 

इंडोनेशिया, मलेशिया आणि सिंगापूर दौऱ्यावर रवाना होण्याआधी पंतप्रधानांचे वक्तव्य खालीलप्रमाणे-

‘मी 29 मे ते 2 जून 2018’ या कालावधीत इंडोनेशिया, मलेशिया आणि सिंगापूरच्या दौऱ्यावर जात आहे. या तिन्ही देशांबरोबर भारताची मजबूत धोरणात्मक भागीदारी आहे.

इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको व्हिडोडो यांच्या निमंत्रणानुसार मी 29 मे रोजी जकार्ता येथे असणार आहे. पंतप्रधान म्हणून इंडोनेशियाचा माझा हा पहिलाच दौरा आहे. 30 मे रोजी राष्ट्रपती जोको व्हिडोडो यांच्यासोबतच्या चर्चेसाठी तसेच भारत-इंडोनेशियाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मंचांसोबतच्या संयुक्त संवादासाठी उत्सुक आहे. मी इंडोनेशियामध्ये भारतीय समुदायाला संबोधित देखील करणार आहे.

भारत आणि इंडोनेशियाचे संबंध दृढ आणि मैत्रीपूर्ण आहेत तसेच उभय देशांमध्ये ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंध देखील आहेत. उभय देशांमध्ये बहुवासी, बहु धार्मिक, बहुविध आणि मुक्त समाज आहे. मला विश्वास आहे की, माझ्या या दौऱ्यामुळे आशियाच्या दोन मोठ्या लोकशाहींमध्ये तालबद्धता निर्माण होईल आणि भविष्यात आमचे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ होतील.

31 तारखेला सिंगापूरला जाताना नवीन मलेशिया नेतृत्वाचे अभिनंदन करण्यासाठी अगदी थोड्या वेळासाठी मलेशियाला थांबणार आहे. मी पंतप्रधान डॉ. महाथीर मोहम्मद यांना भेटण्यास उत्सुक आहे.

सिंगापूर दौऱ्यादरम्यान मी फाइनटेक, कौशल्य विकास, शहरी नियोजन आणि कृत्रिम बुद्धीमत्ता या क्षेत्रात भारत-सिंगापूर भागीदारी अधिक बळकट करण्यावर लक्ष केंद्रीत करणार आहे. शहरी विकास, नियोजन, स्मार्ट सिटीज आणि पायाभूत सुविधा विकास यासारख्या क्षेत्रात सिंगापूर हा भारताचा मुख्य भागीदार आहे. माझ्या सिंगापूर दौऱ्यामुळे भविष्यात उभय देशांचे संबंध अधिक मजबूत होण्याच्या संधी निर्माण होतील.

31 मे रोजी मी, भारत-सिंगापूर उद्योग आणि नवोन्मेष प्रदर्शनाला भेट देणार आहे. सिंगापूरच्या प्रमुख मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत व्यवसाय आणि गुंतवणूक संधींबाबत चर्चा केल्यानंतर मी व्यावसायिक आणि समुदाय कार्यक्रमांना संबोधित करणार आहे.

1 जून रोजी मी सिंगापूरचे राष्ट्रपती हलिमा याकोब यांची भेट घेणार आहे. तसेच सिंगापूरचे पंतप्रधान ली यांच्यासोबत शिष्टमंडळस्तरीय चर्चा देखील करणार आहे. नानयांग तांत्रिकी विद्यापीठातील तरुण विद्यार्थ्यांशी संवाद साधायला मी उत्सुक आहे.

त्याच दिवशी संध्याकाळी मी शांगरी-ला डायलॉग येथे भाषण देणार आहे. भारतीय पंतप्रधान येथे भाषण देण्याची ही पहिलीच वेळ आहे. प्रांतीय सुरक्षा आणि प्रदेशामध्ये स्थिरता आणि शांती कायम राखण्यासाठी भारताचा दृष्टीकोन मांडण्याची ही उत्तम संधी आहे.

2 जून रोजी क्लिफफोर्ड पीर जिथे 27 मार्च 1948 रोजी गांधीजींच्या अस्थि समुद्रात विसर्जित केल्या होत्या तिथे एका फलकाचे उद्‌घाटन करणार आहे. भारतीय सभ्यतेशी संबंध असलेल्या काही प्रार्थनास्थळांना देखील मी भेट देणार आहे.

माझ्या दौऱ्यातील शेवटचा कार्यक्रम म्हणजे सिंगापूरमधील चांगी नौदल तळाला भेट, जिथे मी भारतीय नौदल जहाज आयएनएस सातपुरला भेट देऊन मी भारतीय नौदल आणि रॉयल सिंगापूर नौदलाचे अधिकारी आणि खलाशांशी संवाद साधणार आहेत.

मला विश्वास आहे की , माझ्या इंडोनेशिया, मलेशिया आणि सिंगापूर दौऱ्यामुळे सरकारच्या ॲक्ट इस्ट पॉलिसीला बळकटी प्राप्त होईल आणि तिन्ही देशांसोबत आपले संबंध अधिक दृढ होतील.

 

B.Gokhale/S.Mhatre/P.Kor



(Release ID: 1533747) Visitor Counter : 72


Read this release in: English