पंतप्रधान कार्यालय

19 मे, 2018 रोजी शेर-ए-काश्मीर कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठ, जम्मूच्या दीक्षांत समारंभात पंतप्रधानांचे भाषण

Posted On: 19 MAY 2018 8:17PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19 मे 2018

 

येथे उपस्थितीत सर्व मान्यवर आणि माझ्या तरुण मित्रांनो,

मित्रांनो आज सकाळी मला जम्मू काश्मीरच्या वेगवेगळ्या भागांमध्ये जाण्याची संधी मिळाली. मला इथे यायला उशीर झाला, आम्ही जवळजवळ एक तास उशिरा पोहोचलो आहोत आणि यासाठी सर्वातआधी मी तुमच्या सर्वांची क्षमा मागतो मला इथे यायला उशीर झाला. लेह पासून श्रीनगर पर्यंत अनेक विकास प्रकल्पांचे आज लोकार्पण झाले. काही नवीन कामांना सुरवात झाली आहे. जम्मूच्या शेती पासून काश्मीरच्या बगीच्यांपर्यंत आणि लेह-लडाखच्या नैसर्गिक आणि आध्यात्मिक शक्तीचा मी नेहमीच अनुभव घेतला आहे. देशाच्या एका क्षेत्रात विकासाच्या मार्गावर बरीच प्रगती करण्याची शक्ती आहे मी जेव्हा कधी इथे येतो तेव्हा माझा हा विश्वास अधिक दृढ होतो. येथील कर्तृत्ववान आणि  मेहनती लोक आणि तुमच्यासारख्या हुशार युवकांच्या सार्थक प्रयत्नांमुळे आम्ही योग्य दिशेने वाटचाल करत आहोत आणि यश प्राप्त करीत आहोत.

मित्रांनो या विद्यापीठाला अंदाजे 20 वर्ष झाली आहेत आणि तेव्हापासून आतापर्यत अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थिनिंनी येथून पदवी घेतली आहे. आणि ते सर्व सामाजिक जीवनात कुठे ना कुठेतरी आपले योगदान देत आहेत.

आज विद्यापीठाचा सहावा दीक्षांत समारोह आहे. या निमित्ताने मला तुम्हाला भेटण्याची संधी मिळाली. या आमंत्रणासाठी मी विद्यापीठ प्रशासनाचा आभारी आहे. आज येथे जम्मू मधील शाळेतील काही मुलं, काही विद्यर्थी देखील हजर आहेत याचा मला खूप आनंद होत आहे. आज येथे 400 हून अधिक विद्यार्थ्यांना पदवी, पदक आणि प्रशस्तीपत्र देण्यात आले. हे तुमच्या मेहनतीचे फळ आहे जे तुम्ही देशाच्या या प्रतिष्ठित संस्थेचा भाग असताना साध्य केले आहे. मी आज तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो आणि तुम्हाला खूप शुभेच्छा देतो आणि विशेषतः मुलींचे कौतुक करतो कारण त्यांनी आज बाजी मारली आहे.

आज तुम्ही देशातील क्रीडा क्षेत्र बघा, शिक्षण क्षेत्र बघा सगळीकडे मुली कमाल करत आहेत. मला तुम्हा सर्वांच्या नजरेत एक चमक दिसत आहे, आत्मविश्वास दिसत आहे. भविष्यातील स्वप्न आणि आव्हाने या दोघांना समजण्याच्या भावनेतून ही चमक निर्माण झाली आहे.

मित्रांनो, तुमच्या हातात ही केवळ पदवी किंवा प्रशस्तीपत्र नाही तर देशातील शेतकऱ्यांचे आशा पत्र आहे. तुमच्या हातात जे प्रशस्तीपत्र आहे त्यात देशातील शेतकऱ्यांच्या आशा-अपेक्षा आहेत. हे त्या कोट्यावधी अपेक्षांचे दस्तावेज आहेत जे देशाचे अन्नदाता, देशाचे शेतकरी तुमच्यासारख्या गुणवंत लोकांकडे मोठ्या आशेने बघत आहेत.

काळानुरूप तंत्रज्ञानात वेगाने बदल होत आहेत आणि बदललेल्या तंत्रज्ञानामुळे सर्व प्रणालीमध्ये अमुलाग्र परिवर्तन घडत आहे. यावेगाच्या बरोबरीने जर कोणी चालू शकत असेल तर तो आपल्या देशातील तरुण आहे, आपल्या देशातील युवक आहे. आणि आज जेव्हा मला तुमच्या सगळ्यांशी बोलण्याची संधी मिळाली आहे ती माझ्यासाठी खूप महत्वाची बाब आहे.

तरुण मित्रांनो तंत्रज्ञान जसे कामाचे स्वरूप बदलत आहे, रोजगाराच्या नवनवीन संधी विकसित होत आहेत तसेच कृषी क्षेत्रात देखील नवीन कार्य संस्कृती विकसित करण्याची आवश्यकता आहे. आपल्या पारंपारिक पद्धतींद्वारे जेवढ्या अधिक प्रमाणात आपण तंत्रज्ञान केंद्रित करू तितका अधिक लाभ शेतकऱ्यांना होईल; आणि या दृष्टीकोनातून, केंद्र सरकार देशातील आधुनिक शेती पद्धतींना प्रोत्साहन देत आहे.

देशभरात आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मृदा आरोग्य पत्रिका वितरित करण्यात आल्या आहेत. यामध्ये जम्मू काश्मीर मधील ११ लाख शेतकऱ्यांचा समावेश आहे. शेतामध्ये कोणत्या खताची आवश्यकता आहे, कशाची गरज आहे या सर्व गोष्टींची माहिती शेतकऱ्यांना या मृदा आरोग्य पत्रीकांमुळे मिळत आहे.

शेतकऱ्यांना 100% निम लेपित युरियाचा फायदा झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढले आहे आणि युरियाचा प्रती हेक्टर वापर देखील कमी झाला आहे.

आधुनिक सिंचन तंत्रज्ञान आणि पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा उपयोग करण्याच्या विचारासह सूक्ष्म आणि स्प्रिंकलर सिंचनांना प्रोत्साहन दिले जात आहे आहे. प्रति थेंब अधिक पीक हे आमचे ध्येय असले पाहिजे.

गेल्या चार वर्षांत 24 लाख हेक्टरपेक्षा जास्त जमीन सूक्ष्म आणि स्प्रिंकलर सिंचन पद्धती अंतर्गत आणण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्रिमंडळाने सूक्ष्म सिंचनसाठी पाच हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. ही सर्व धोरणे, सर्व निर्णय शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या आमच्या ध्येयाला अधिक बळकटी प्रदान करतात. अशा सर्व प्रयत्नांनी बनलेल्या प्रणालीचा तुम्ही सर्व एक मुख्य भाग आहात.

येथून शिक्षण पूर्ण केल्यानंतर तुम्ही वैज्ञानिक दृष्टिकोन, तंत्रज्ञानातील नवचैतन्य आणि संशोधन आणि विकास यांच्या माध्यमातून शेतीला नफा कमावण्याच्या व्यवसाय बनवण्यात तुम्ही सक्रिय भूमिका बजावाल, अशी देशाची अपेक्षा आहे. शेतीपासून ते पशुसंवर्धन आणि इतर संबंधित उद्योगांना नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उत्तम  बनविण्याची जबाबदारी आपल्या युवा पिढीच्या खांद्यावर आहे.

येथे येण्यापूर्वी आपल्या प्रयत्नांविषयी माझी आशा वाढली आहे. तुमच्याकडून माझ्या अपेक्षा आणखी वाढल्या आहेत. शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला चालना देण्यासाठी, तुमच्या विद्यापीठाने आपल्या क्षेत्रासाठी विकसित केलेल्या मॉडेलबद्दल देखील मला सांगण्यात आले आहे. आपण याला एकात्मिक शेती यंत्रणा अर्थात आयएफएस मॉडेल असे नाव दिले आहे. या मॉडेलमध्ये धान्य आहे, फळे- भाजी आहेत आणि फुले आहेत, तेथे पशुधन देखील आहे, मासे देखील आहे आणि कुक्कुटपालन देखील आहेतेथे कंपोस्ट आहे, मशरूम, बायोगॅस आणि काठावर झाड लावण्याची संकल्पना देखील आहे. यामुळे दरमहा उत्पन्न तर सुनिश्चित होईलच, परंतु एका वर्षात रोजगाराच्या दुप्पट संधी निर्माण होतील.

संपूर्ण वर्षभर शेतकऱ्यांना उत्पनाची हमी देणारं हे मॉडेल अतिशय महत्वाचे आहे. स्वच्छ इंधन देखील मिळाले, कृषी कचऱ्यापासून मुक्ती मिळाली, गाव देखील स्वच्छ झाले, पारंपारिक शेतीतून शेतकऱ्यांना जे उत्पन्न मिळते त्याहून अधिक उत्पन्न या मॉडेल मधून मिळणर आहे. येथील हवामानविषयक परिस्थिती लक्षात घेऊन, तुम्ही जे हे मॉडेल विकसित केले आहे, मी त्याची विशेष प्रशंसा करू इच्छितो. माझी अशी इच्छा आहे की  जम्मू आणि आजूबाजूच्या क्षेत्रांत या मॉडेलचा अधिकाधिक प्रसार आणि वापर व्हावा.

मित्रांनो, शेतकऱ्यांनी केवळ एकाच पिकावर अवलंबून रहावे अशी सरकारची मुळीच इच्छा नाही, तर अतिरिक्त उत्पनाची जितकी संसाधाने आहेत त्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्य सरकार करत आहे. भविष्यात कृषीमध्ये नविन क्षेत्रांचा विकास हा शेतकऱ्यांच्या विकासाचा एक अविभाज्य भाग बनणार आहे आणि सहायक देखील ठरेल.

हरित आणि शुभ्र क्रांतीसोबतच आपण जैविक क्रांती, जल क्रांती, नील क्रांती, मधुर क्रांतीला जितक्या अधिक प्रमाणत प्रोत्साहन देवू तितके अधिक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल. यावेळी, आम्ही जो अर्थसंकल्प सादर केला त्यामध्ये सरकारने हाच विचार व्यक्त केला आहे. दुग्धोत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी याआधी एका वेगळ्या निधीची व्यवस्था करण्यात आली होती परंतु यावेळी मत्स्यपालन आणि पशुपालनासाठी दहा हजार कोटी रुपयांचे दोन वेगळे निधी निर्माण करण्यात आले आहेत. म्हणजेच कृषी आणि पशुपालनासाठी शेतकऱ्यांना आता आर्थिक सहाय्य सुलभरीत्या उपलब्ध होईल. याआधी शेतीपर्यंत मर्यादित असलेली किसान क्रेडीट कार्डची सुविधा आता मत्स्योद्योग आणि पशुपालनासाठी देखील उपलब्ध करण्यात आली आहे.

कृषी क्षेत्र सुधारण्याकरिता अलीकडेच एक मोठी योजना जाहीर करण्यात आली आहे. शेतीशी संबंधित 11 योजनांचा समावेश हरित क्रांती कृषी उन्नती योजनेमध्ये करण्यात आला आहे. यासाठी 33,000 कोटीपेक्षा अधिक निधीची तरतूद करण्यात आली आहे; आणि 33 हजार कोटी रुपये ही काही छोटी रक्कम नाही.

कचऱ्यापासून संपत्ती निर्माण करण्यावर सरकारदेखील लक्ष केंद्रित करते. देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये, कृषी कचऱ्यापासून संपत्ती निर्माण करण्याची मोहीम जोर धरत आहे.

सरकारने यावर्षी अर्थसंकल्पात गोबर धन योजनेची देखील घोषणा केली आहे. ही योजना ग्रामीण स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासोबतच गावात निर्माण होणाऱ्या जैव कचऱ्यापासून शेतकरी आणि गुराख्यांचे उत्पन्न वाढवण्यास मदत करतील. केवळ उपउत्पादनांपासूनच संपत्ती निर्माण होऊ शकते असे नाही. जे मुख्य पीक आहे, जे मुख्य उत्पादन आहे, त्याचा देखील वेगळ्या पद्धतीने वापर केल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढू शकेल. काथ्याचा कचरा असो, नारळाची करवंटी असो, बांबू कचरा असो, कापणीनंतर शेतात जो पेंढा शिल्लक राहतो, या सर्वांपासून उत्पन्न वाढू शकते.

या व्यतिरिक्त, बांबूच्या जुन्या नियमांत आम्ही सुधारणा केली आहे, बांबू लागवड आता सुलभ झाली आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आपण सुमारे 15 हजार कोटी किमतीच्या बांबूची आयात करतो. यात काही तर्क नाही.

मित्रांनो, मला असे देखील सांगण्यात आले आहे की इथे तुम्ही 12 पिकांचे विविध प्रकार विकसित केले आहेत. रणबीर बासमती, तो कदाचित संपूर्ण देशभरात प्रसिद्ध आहे. तुमचे हे प्रयत्न प्रशंसनीय आहेत; परंतु आज शेतीत जी आव्हाने आहेत ती बियाणांच्या गुणवत्तेपेक्षा अधिक आहेत. ही आव्हान हवामानबदलाशी देखील संबंधित आहेत. आपले शेतकरी, कृषी वैज्ञानिकांचे परिश्रम आणि सरकारी धोरणाचा परिणाम म्हणजे शेतक-यांनी मागील वर्षी आपल्या देशात अन्नधान्याचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. गहू असो, तांदूळ असो किंवा मग डाळी, जुने सगळे विक्रम तुटले आहेत. तेलबिया आणि कापसाच्या उत्पादनात देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. परंतु आपण गेल्या काही वर्षांच्या आकडेवारीवर लक्ष दिल्यास, आपल्याला आढळेल की उत्पादन क्षेत्रात अनिश्चितता आहे आणि याचे सर्वात मोठे कारण म्हणजे आमची शेती पावसावर अवलंबून आहे.

एकीकडे, हवामान बदलाच्या प्रभावामुळे, जेथे तापमान वाढत आहे, काही भागात पाऊस देखील कमी होत आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये देखील त्याचा परिणाम दिसून येत आहे. भातशेती असो, बागकाम किंवा पर्यटन; यासर्वासाठी पुरेसे पाणी आवश्यक आहे. जम्मू काश्मीर मध्ये पाण्याची आवशक्यता हिमनग पूर्ण करतात. परंतु ज्याप्रकारे तापमानात वाढ होत आहे हिमनग वेगाने वितळत आहे. परिणामी काही भागात कमी पाणी तर काही भागात पुराचा सामना करायला लागत आहे.

मित्रांनो, मी इथे येण्यापूर्वी आपल्या विद्यापीठांबद्दल वाचत होतो तेव्हा, मी आपल्या FASAL प्रकल्पाबद्दल देखील वाचले. याद्वारे तुम्ही हंगामाच्या आधीच किती उत्पादन होईल आणि वर्षभर किती आर्द्रता राहू शकेल याचा अंदाज वर्तवता. पण आता यापेक्षा पुढे जाण्याची आवश्यकता आहे. नव्या परिस्थिति हाताळण्यासाठी नवीन धोरणांची आवश्यकता आहे. ही धोरणे पीक स्तरावर आणि तंत्रज्ञानाच्या पातळीवर देखील केली पाहिजेत. आपल्याला अशा विविध पिकांवर लक्ष केंद्रित करायला हवे ज्यांना कमी पाणी लागते. या व्यतिरिक्त, कृषी उत्पादनांचे मूल्यवर्धन कसे केले जाऊ शकते, याचा तुम्ही सतत विचार केला पाहिजे.

मी तुम्हाला सी बक्थॉर्नचे उदाहरण देतो. तुम्हाला सगळ्यांना सी बक्थॉर्न बद्दल माहिती असेलच. लडाख भागामध्ये सापडणारी ही वनस्पती किमान 40 ते कमाल 40 डिग्री सेंटीग्रेड तापमान सहन करू शकते. कितीही दुष्काळ असला तरीही ते आपोआप वाढते. 8 व्या शतकात लिहिलेल्या तिबेटी साहित्यात देखील याच्या औषधी गुणधर्माचा उल्लेख आढळतो. देशातील आणि परदेशातील अनेक आधुनिक संशोधन संस्थांनी या सी बक्थॉर्नचे महत्व अधोरेखित केले आहे.रक्तदाब असो, ताप असो, ट्यूमर असो, स्टोन असो, अल्सर असो  किंवा सर्दी खोकला असो सी बक्थॉर्नपासून बनविलेल्या अनेक प्रकारची औषध या सर्वावर गुणकारी आहेत.

एका अभ्यासानुसार, जगभरात उपलब्ध असलेल्या सी बक्थॉर्नमध्ये, संपूर्ण मानवजातीची जीवनसत्व ‘क’ ची गरज पूर्ण करण्याची क्षमता आहे. या कृषी उत्पादनांच्या मूल्यवर्धनाने चित्र बदलले आहे. सी बक्थॉर्नचा वापर आता हर्बल चहा, जाम, संरक्षणात्मक तेल, संरक्षणात्मक क्रीम आणि आरोग्य पेयांमध्ये देखील मोठ्याप्रमाणात केला जातो. उच्च पर्वतराजीवर तैनात सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांसाठी हे खूप उपयुक्त आहे. सी बक्थॉर्नपासून अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडेंट उत्पादने तयार केली जात आहेत.

आज या व्यासपीठावर मी हे उदाहरण देत आहे कारण, भविष्यात देशातल्या कोणत्याही ठिकाणाला जेव्हा तुम्ही तुमचे कार्यक्षेत्र म्हणून निवडाल तेव्हा तुम्हाल अशी अनेक उत्पादने मिळतील. तेथे तुम्ही तुमच्या प्रयत्नातून एक मॉडेल विकसित करू शकता. कृषी विद्यार्थी ते कृषी शास्त्रज्ञ हा प्रवास करताना, मूल्य वर्धन करताना तुम्ही कृषी क्रांतीचे नेतृत्व करू शकता.

कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता हा एक महत्त्वाचा विषय आहे. आगामी काळात हा शेतीमध्ये क्रांतीकारक परिवर्तन घडवून आणणार आहे. देशाच्या काही भागांमध्ये, शेतकरी याचा मर्यादित पातळीवर वापर करत आहेत जसे की औषधे आणि कीटक नाशकांसाठी ड्रोनसारख्या तंत्रज्ञानाचा वापर हळूहळू सुरू झाला आहे.

याशिवाय, मृदा परिक्षण आणि सामुदायिक किंमतींमध्येही तंत्रज्ञान काम करत आहे. याशिवाय, येत्या काही दिवसात ब्लॉक चैन तंत्रज्ञानाची देखील प्रमुख भूमिका असेल. या तंत्रज्ञानामुळे पुरवठा श्रृंखलेचे वास्तविक वेळ परीक्षण करण्यात मदत होईल, ज्यामुळे कृषी व्यवहारांत पारदर्शकता निर्माण होईल. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मध्यस्थांना लगाम बसेल आणि उत्पन्नाची नासाडी होणार नाही.

मित्रांनो, सरकारने ई-नाम योजनेद्वारे आधीच देशभरातील  बाजारपेठा जोडण्याचे काम सुरु केले आहे. याव्यतिरिक्त, 22 हजार ग्राम बाजारांना घाऊक बाजार आणि जागतिक बाजारपेठांशी जोडण्याचा प्रयत्न सुरु आहे. सरकार शेतकरी उत्पादक संस्था एफपीओला देखील प्रोत्साहन देत आहे. शेतकरी त्यांच्या पातळीवर लहान संस्था तयार करून, त्यांच्या क्षेत्रात सहज ग्रामीण हाट आणि मोठ्या बाजारपेठांशी जोडले जाऊ शकतात.

आता ब्लॉक साखळीचे तंत्र आमच्या प्रयत्नांना आणखी फायदेशीर ठरेल. भविष्यातील तंत्रज्ञानपूरक तसेच स्थानिक गरजांनुसार मॉडेल विकसित करण्याबद्दल तुम्ही विचार करायला हवा.

कृषी क्षेत्रात स्टार्टअप कसे येतील, नवोन्मेश कसे येतील यावर आपण आमचे लक्ष केंद्रित केले पाहिजे. स्थानिक शेतक-यांना तंत्रज्ञानाशी जोडण्याचे आपले प्रयत्न चालू ठेवले पाहिजेत. आणि मला सांगण्यात आले आहे की अभ्यास करताना तुम्ही ग्रामीण पातळीवर लोकांना सेंद्रीय शेतीचा वापर करण्यासाठी भरपूर काम केले आहे. विविध सेंद्रीय शेती पिकांबद्दलही तुम्ही संशोधन करत आहोत. प्रत्येक स्तरावर अशा विविध प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांचे आयुष्य समृद्ध करण्याचे प्रयत्न केले जातील.

मित्रांनो, जम्मू-काश्मिरचे शेतकरी आणि बागायतदार यांच्याकरिता गेल्या चार वर्षांत केंद्र सरकारने अनेक योजनांना मंजुरी दिली आहे. फलोत्पादन आणि अन्य संबंधित योजनांसाठी 500 कोटी रुपये मंजूर केले आहेत, त्यातील 150 कोटी रुपयांचा निधी जारी केला आहे. लेह आणि कारगिलमध्ये शीतगृह बांधण्याचे काम सुरू आहे. या व्यतिरिक्त, सोलर ड्रायर सेटअप लावणाऱ्यांना 20 कोटी रुपयांच्या अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे.

मला आशा आहे की, बियाण्यांपासून ते बाजारापर्यंत सरकार करत असलेल्या प्रयत्नांमुळे येथील शेतकरी अधिक सशक्त होतील. मित्रांनो, 2022 मध्ये, देश आपल्या स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करणार आहे. मला विश्वास आहे की, तोपर्यंत तुमच्यातील अनेक विद्यार्थी महान शास्त्रज्ञ म्हणून नावारूपाला आलेले असतील. वर्ष 2022 लक्षात ठेवून तुमच्या विद्यापीठाने आणि इथल्या विद्यार्थ्यांनी काहीतरी ध्येय निर्धारित करावे अशी मी विनंती करतो. जसेकी, विद्यापीठ स्तरावर असा विचार केला जाऊ शकतो की, कशाप्रकारे देशातीलच नाही तर जगभरातील अव्वल 200 विद्यापीठांमध्ये या विद्यापीठाचा कशाप्रकारे समावेश केला जाऊ शकेल. याचप्रमाणे, येथील विद्यार्थी प्रति हेक्टर कृषी उत्पादन वाढवणे आणि अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोहोचवण्याचा संकल्प करू शकतात. जेव्हा आपण शेतीला तंत्रज्ञान संचालित आणि उद्योजकचलित बनवण्याविषयी बोलतो तेव्हा दर्जात्मक मनुष्यबळाची निर्मिती करणे हे एक मोठे आव्हान असते.

तुमच्या विद्यापीठांसह देशातील अशा प्रकरच्या संस्थाची संख्या जबाबदारी आणखी वाढते. आणि अशावेळी माझ्या दृष्टीने पाच टी- (training) प्रशिक्षण, (talent) प्रतिभा, (technology)तंत्रज्ञान, (timely action)वेळेवर कारवाई आणि (trouble free approach) अडथळा-मुक्त दृष्टीकोनचे महत्व मोठ्या प्रमाणात वाढते आहे. देशाच्या शेतीव्यवस्थेमध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणण्यासाठी हे पाच टी अत्यंत आवश्यक आहेत. मला आशा आहे की संकल्प निर्धारित करताना तुम्ही याचा देखील विचार कराल.

मित्रांनो, आज तुम्ही एक बंद वर्ग वातावरणातून बाहेर येत आहात, मी तुम्हाला शुभेच्छा देतो. परंतु आता भिंतींचा वर्ग मागे पडणार आहे आणि एक खूप मोठा खुला वर्ग तुमची वाट पाहत आहे. तुमच्या शिक्षणाचा एक टप्पा इथे पूर्ण झाला आहे; खऱ्या आयुष्यातील खडतर शिक्षणाला आता सुरवात होणार आहे. म्हणूनच तुम्ही तुमच्यातल्या विद्यर्थ्याला नेहमी जिवंत ठेवा. तरच आपण देशातील शेतकऱ्यांसाठी नविन कल्पनांसह चांगले मॉडेल विकसित करू शकाल.

तुमची स्वतःची स्वप्ने, तुमच्या पालकांची स्वप्ने पूर्ण करण्याचा तुम्ही संकल्प करा. राष्ट्र-उभारणीत सक्रिय योगदान करा. याच आशेसह मी माझे भाषण संपवतो आणि यशस्वी मित्रांना खूप खूप शुभेच्छा देतो, त्यांचे अभिनंदन करतो. त्यांच्या कुटुंबीयांना देखील मनपूर्वक शुभेच्छा.

खूप खूप धन्यवाद.

 

 

 

B.Gokhale/S.Mhatre/D.Rane



(Release ID: 1533040) Visitor Counter : 109


Read this release in: English