राष्ट्रपती कार्यालय

भारताच्या अफाट प्रतिभेचा सेवा क्षेत्रांना नैसर्गिक लाभ – राष्ट्रपती


सेवा क्षेत्र भारतीय अर्थव्यवस्थेला तीन ट्रिलियन डॉलर्सचे योगदान देईल – सुरेश प्रभू

महाराष्ट्र सेवा क्षेत्रासाठी अनुकूल वातावरण निर्माण करेल – मुख्यमंत्री

Posted On: 15 MAY 2018 2:34PM by PIB Mumbai

मुंबई, 15  मे  2018

 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज मुंबईत सेवांवरील चौथ्या जागतिक प्रदर्शनाचे उद्‌घाटन केले.

यावेळी बोलतांना राष्ट्रपतींनी या उपक्रमाबद्दल वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, केंद्र आणि महाराष्ट्र सरकार तसेच अन्य संबंधितांची प्रशंसा केली. या उपक्रमामुळे भारतीय सेवा क्षेत्राला प्रोत्साहन मिळेल आणि जागतिक सेवा क्षेत्राबरोबर भारताचे संबंध अधिक दृढ होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 12 चॅम्पियन क्षेत्रांमुळे भारतीय अर्थव्यवस्था तसेच जागतिक अर्थव्यवस्थेत मोलाचे योगदान लाभेल आणि रोजगार निर्मिती होईल असे ते म्हणाले.

सेवा क्षेत्र हा जागतिक अर्थव्यवस्थेचा महत्वाचा आणि विस्तारणारा घटक आहे. रोजगार, मूल्यवर्धन, उत्पादकता आणि नवसंशोधन याबाबतीत सेवा क्षेत्राचे आज वर्चस्व आहे, असे राष्ट्रपती म्हणाले. तंत्रज्ञानाच्या वाढत्या वेगामुळे कृषी, पायाभूत विकास आणि उत्पादन क्षेत्रातही सेवा क्षेत्राचे महत्वपूर्ण योगदान आहे. सेवा क्षेत्र हे 21व्या शतकातील जागतिक अर्थव्यवस्थेचा कणा आहे असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही असे ते म्हणाले.

भारतात, सकल मूल्यात सेवा क्षेत्राचे 61 टक्के योगदान आहे, असे राष्ट्रपती म्हणाले. तरुणांची मोठी संख्या, अफाट प्रतिभा आणि तंत्रज्ञानाचे ज्ञान यामुळे या क्षेत्रात भारताला नैसर्गिक लाभ असून, जगाला सेवा पुरवणारा मोठा देश बनण्यासाठी सज्ज आहे.

औद्योगिक युग आणि पारंपरिक निर्मिती अर्थव्यवस्थेने कारखान्यांमध्ये रोजगार निर्माण केले आणि पूरक उद्योगांच्या स्वरुपात उद्यमशीलतेला प्रोत्साहन दिले असे राष्ट्रपती म्हणाले. आज आपल्याला सेवा क्षेत्रात लहान परंतु उत्तम स्टार्ट अप्स हवे आहेत. तंत्रज्ञानाच्या जोरावर स्थानिक सेवा कंपन्या राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेत आहेत. भारत हे जगातील तिसरे सर्वात मोठे स्टार्ट अप केंद्र आहे. ज्याने तरुण उद्योजकांच्या महत्वाकांक्षा पल्लवित केल्या आहेत.

तळागाळातील 12 कोटी उद्योगांना भांडवल पुरवणाऱ्या आणि बहुतांश सेवा क्षेत्रात उद्यमशीलतेच्या संस्कृतीचे बीज रोवणाऱ्या स्टार्ट अप इंडिया आणि मुद्रा योजनेचा राष्ट्रपतींनी उल्लेख केला. आगामी काळात या स्टार्ट अप्सचे रुपांतर प्रचंड मोठ्या उद्योगांमध्ये होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राष्ट्रपतींनी सेवांवरील एक पोर्टलही सुरु केले.

संपूर्ण जगाला सेवा पुरवठादार म्हणून भारताला केंद्र बनवण्यासाठी राष्ट्रपतींनी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी आभार मानले. सेवा क्षेत्रात अमाप संधी असल्याचे ते म्हणाले. आगामी काळात सेवा क्षेत्र भारतीय अर्थव्यवस्थेत तीन ट्रिलियन डॉलर्सचे योगदान देईल, असे ते म्हणाले. बँकिंग आणि वित्त, पर्यटन आणि आदरातिथ्य, वाहतूक, प्रसार माध्यमे आणि मनोरंजन, आरोग्य सेवा, बांधकाम उद्योग, कायदेशीर सेवा, पर्यावरण, लेखा आणि वित्त, माहिती तंत्रज्ञान आणि संचार तसेच क्रीडा या 12 चॅम्पियन क्षेत्रांचा यात प्रमुख वाटा असेल. हे क्षेत्र केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण करेल, असे ते म्हणाले.

जागतिक अर्थव्यवस्थेच्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्था वेगाने वाढत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले. भारताने सेवा क्षेत्राच्या वेगवान विकासासाठी मार्गप्रशस्त केले आहे. या क्षेत्रात  मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण करण्याची क्षमता असल्यामुळे महाराष्ट्र अनुकूल वातावरण निर्माण करेल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

15 ते 18 मे 2018 दरम्यान मुंबईत बॉम्बे एक्झीबिशन सेंटर येथे हॉल क्रमांक 4 मध्ये सेवांवरील चौथ्या जागतिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्र आणि महाराष्ट्र सरकारचे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, भारतीय उद्योग महासंघ आणि सेवा निर्यात प्रोत्साहन परिषद यांनी संयुक्तपणे या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.

सेवांवरील हे प्रदर्शन सेवांवरील व्यापार वाढवण्यासाठी तसेच सर्व संबंधितांमध्ये बहुराष्ट्रीय संबंध अधिक मजबूत करण्यासाठी एक जागतिक मंच आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल चे. विद्यासागर राव, वाणिज्य सचिव रिटा टिओटिया, भारतीय उद्योग महासंघाचे अध्यक्ष राकेश भारती मित्तल आणि अन्य मान्यवर उद्‌घाटन समारंभाला उपस्थित होते.

 

 

 

N.Sapre/S.Kane/D.Rane


(Release ID: 1532128) Visitor Counter : 102


Read this release in: English , English