पंतप्रधान कार्यालय

‘आयुष्यमान भारत’ अंतर्गत आरोग्य विमा योजनेच्या तयारीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आढावा

प्रविष्टि तिथि: 07 MAY 2018 3:08PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7  मे  2018

 

आयुष्यमान भारत अंतर्गत महत्वाकांक्षी आरोग्य विमा योजना लागू करण्यात येणार आहे. या योजनेच्या प्रारंभासाठी सुरु असलेल्या तयारीचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज घेतला.

आरोग्य विमा योजनेची वेगाने आणि सुरळीतपणे अंमलबजावणी करता यावी, यासाठी राज्यांशीही चर्चा विनिमय करण्यात आला आहे. या योजनेसाठी केलेल्या तयारीविषयी पंतप्रधानांनी कौतुक केले. या योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला पाच लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण मिळणार आहे. या योजनेमधून 10 कोटी गरीब आणि गरजू कुटुंबांना लाभ मिळवून देण्याचे उदिृष्ट निश्चित केले आहे.

या योजनेचा लाभ समाजातल्या अतिशय गरीब आणि खऱ्या गरजू लोकांना मिळावा, यावर पंतप्रधान मोदी यांनी भर दिला.

या योजनेची अंमलबजावणी कशा पद्धतीने करण्यात येणार आहे, याची माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी, पंतप्रधान कार्यालय आणि निती आयागाचे अधिकारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज दिली.

‘आयुष्यमान भारत’ अंतर्गत गेल्या महिन्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी पंतप्रधानांनी देशातल्या पहिल्या हेल्थ आणि वेलनेस सेंटर चे उद्‌घाटन केले होते. हा कार्यक्रम छत्तीसगड राज्यातल्या बिजापूर येथे झाला होता.

 

N.Sapre/S.Bedekar/P.Malandkar

 

 

 

 

 


(रिलीज़ आईडी: 1531486) आगंतुक पटल : 187
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English