मंत्रिमंडळ

भारतीय खाण विभागाच्या पुनर्रचनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, नवी पदे, काही पदे रद्द आणि सहसचिव दर्जा आणि वरच्या काही पदांचा श्रेणी सुधार होणार

Posted On: 02 MAY 2018 5:26PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 2 मे 2018

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाने आज भारतीय खाण विभागाच्या पुनर्रचनेला मंजुरी दिली. याअंतर्गत काही नवी पदे तयार केली जाणार आहेत तर काही रद्द केली जाणार आहेत. त्याशिवाय सहसचिव आणि त्यावरच्या पदांचा श्रेणीसुधार होणार आहे. मात्र, भारतीय खाण विभागात सध्या अस्तित्वात असलेली 1,477 ही एकूण पदसंख्या कायम करण्यात आली आहे.

या पुनर्रचनेमुळे विभागाच्या निर्णय क्षमतेत वाढ होईल आणि खनिज क्षेत्रात नियमन आणि सुधारणा करण्याच्या कामाला गती मिळेल, अशी अपेक्षा आहे. त्याशिवाय खनिज नियमन आणि विकासासाठीची क्षमता सुधारण्याच्या दृष्टीने माहिती तंत्रज्ञान तसेच अवकाश तंत्रज्ञान याचा वापर करण्याची विभागाची क्षमताही वाढवली. या संस्थेत निर्णय क्षमता आणि जबाबदारीचे तत्त्व वाढवण्याच्या दृष्टीने पुनर्रचनेचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

प्रभाव-

या निर्णयामुळे, महत्त्वाच्या जबाबदारीच्या तांत्रिक पदांसाठी थेट रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. खनिज आणि माहिती तंत्रज्ञान अशा दोन्ही क्षेत्रातल्या तज्ञांसाठी यामुळे रोजगाराची दारे उघडी होतील. तसेच पुनर्रचनेमुळे या विभागाची कार्यक्षमता वाढल्याने याचा लाभ एकूण खाण क्षेत्राला मिळेल.

 

सविस्तर माहिती -

या बदलानुसार मुख्य खाण नियंत्रक स्तर 15 साठी एक पद तर खाण नियंत्रक स्तर 14 साठी 3 नवी पदे तयार करण्यात आली आहेत. याशिवाय 15 आणि 16 स्तराच्या महानियंत्रक पदासह एकूण 11 पदांचा श्रेणी सुधार केला जाणार आहे.

सध्या अस्तित्वात असलेले उपमहासंचालक (सांख्यिकी) हे पद रदृ करण्यात आले आहे.

 

N.Sapre/R.Aghor/P.Kor

 



(Release ID: 1531007) Visitor Counter : 84


Read this release in: English