युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
13 व्या आदिवासी युवा-संपर्क-संवाद कार्यक्रम- आदिवासी युवकांची राजभवनाला भेट, महाराष्ट्राच्या राज्यपालांशी संवाद
मोठी स्वप्ने पहा, आपल्या मित्रांच्या संपर्कात रहा- राज्यपाल कोश्यारी यांचा आदिवासी युवकांना सल्ला
बिहार आणि तेलंगणातील युवक जेव्हा मुंबईचा निरोप घेतील, त्यावेळी, त्यांच्या मनात या शहरभेटीच्या हृदय आठवणी असतील- केंद्रीय मंत्री निशीथ प्रामाणिक
Posted On:
25 MAR 2022 5:51PM by PIB Mumbai
तेराव्या युवासंवाद कार्यक्रमाचा भाग म्हणून, बिहार आणि तेलंगणाच्या 200 आदिवासी युवकांना आज म्हणजेच 25 मार्च 2022 रोजी मुंबईत येण्याची तसेच राजभवनाला भेट देत, महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेण्याची संधी मिळाली.
“आज या आदिवासी युवा-संपर्क-संवाद कार्यक्रमानिमित्त तुम्ही ज्यांना भेटलात, त्या भेटीची माहिती आपल्या बिहार आणि तेलंगणाच्या मित्रांनाही सांगा. एकमेकांना फोन करा, मेसेज पाठवा, ज्यांच्याकडे फोन नाही, त्यांना पत्र पाठवा, मात्र एकमेकांच्या संपर्कात रहा,” असा सल्ला राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी या युवकांना दिला. जर तुम्हाला मला काही प्रश्न विचारायचे असतील, तर मलाही पत्र पाठवा, असेही राज्यपाल पुढे म्हणाले.
युवकांनी कायम मोठी स्वप्ने पाहावीत, असा प्रोत्साहनपर सल्लाही राज्यपालांनी यावेळी दिला. त्यांनी त्यांच्या आयुष्यातले संघर्ष आणि त्यांचे बालपण याविषयीच्या आठवणी सांगितल्या. “ आपण भविष्यात राज्यपाल बनू शकू, असे तुमच्यापैकी किती जणांना वाटते?” असा प्रश्न त्यांनी युवकांना विचारला. तुमच्यापैकी ज्यांनी ज्यांनी मोठी स्वप्ने बघितली आहेत, ते आयुष्यात मोठी उद्दिष्टे निश्चित साध्य करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री निशीथ प्रामाणिक यांनीही यावेळी युवकांशी संवाद साधला आणि या संपर्क अभियानाबद्दलचे त्यांचे अनुभव मुलांना विचारले. “ नवा भारत, युवकांचा भारत असावा, असे पंतप्रधानांचे ध्येय आहे. आणि हे ध्येय साध्य करण्यासाठीच, 2014 पासून केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय असे कार्यक्रम आयोजित करत आहे,” अशी माहिती त्यांनी दिली.
आतापर्यंत त्यांच्या मंत्रालयाने अशाप्रकारचे, 88,000 कार्यक्रम राबवले असून, त्यात 21,000 आदिवासी युवकांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे. अशी माहिती देखील त्यांनी दिली.
देशातल्या नक्षलग्रस्त भागातूनही हे आदिवासी येतात, त्यामुळे या संपर्क आणि देशाटन अभियानातून त्यांना भारतातील व्यापक संस्कृति आणि इतिहासाविषयी माहिती मिळेल, असेही त्यांनी सांगितले. “एका राज्याच्या प्रमुखाला भेटण्याची संधी हा त्यांच्या आयुष्यातील मैलाचा दगड ठरू शकेल. जेव्हा ते मुंबईचा निरोप घेतील, त्यावेळी त्यांच्याकडे या शहराविषयीच्या अनेक उत्तम स्मृति असतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
क्रीडा मंत्रालयाच्या राज्यमंत्र्यांनीही आदिवासी युवकांच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल माहिती दिली. त्यांनी क्रीडाक्षेत्रातील तरुण आदर्श (यूथ आयकॉन) मेरी कोम, ऑलिम्पिक पदक विजेती लोव्हलिना बोरगोहेन आणि साईखोम मीराबाई चानू यांची उदाहरणे दिली ज्यांनी देशासाठी विजयश्री खेचून आणली. देशातील आदिवासी तरुणांच्या क्षमतेबद्दल आशा व्यक्त करत,ते म्हणाले,"हे सर्वजण आदिवासी प्रदेश आणि आदिवासी समुदायातून आले आहेत,"
बिहारमधील जमुई, लखीसेराई आणि गया या जिल्ह्यांतील आणि तेलंगणातील भद्राद्री कोठागुडेम येथील 218 आदिवासी तरुण युवा-संपर्क-संवाद उपक्रमाचा भाग म्हणून मुंबईत आले आहेत.
महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी तरुणांना केरळ आणि तामिळनाडूमध्ये पाठवण्यात आले आहे.
गया, बिहार येथील सुनील देव तुडू यांनी तरुणांना अशा संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल भारत सरकार आणि नेहरू युवा केंद्राचे आभार मानले. ते म्हणाले, “आम्हाला इतर राज्यांतील नवीन लोकांशी बोलायला मिळाले आणि त्यांना जाणून घेण्याची संधीही मिळाली. एकमेकांना ओळखल्यामुळे, आपण निश्चितपणे राष्ट्रीय एकात्मता साजरी करू शकतो,”
राज्यपाल आणि मंत्रीमहोदय यांनीही या तरुणांसोबत छायाचित्रे काढली आणि त्यांच्याशी वैयक्तिक संवाद साधला.
महाराष्ट्र आणि गोवा, येथील नेहरू युवा केंद्र संघटन (NYKS), आणि केंद्रीय राखीव पोलीस दल, पश्चिम क्षेत्र, मुंबई यांच्या समन्वयाने 22 ते 28 मार्च 2022 या कालावधीत आठवडाभर चालणारा आदिवासी युवा-संपर्क-संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. निवडक राज्ये आणि जिल्ह्यांतील आदिवासी तरुणांना आपल्या राष्ट्रीय जीवनात आढळणारी विविधतेतील एकता, लोकांचे सांस्कृतिक आचरण आणि भाषा तसेच जीवनशैली समजून घेण्यासाठी देशातील विविध ठिकाणी भेट देण्याची संधी उपलब्ध करुन देणे,हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. आदिवासी तरुणांना देशातील विविध राज्यांमध्ये जेथे विविध विकासाच्या संधी, शैक्षणिक, कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत, अशा राज्यांतील तांत्रिक आणि औद्योगिक विकासाविषयी माहिती देणे यासाठी देखील हा उपक्रम आयोजित केला आहे.
***
S.Patil/R.Aghor/S.Patgaonkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1809725)
Visitor Counter : 229