आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
योग्य औषधे योग्य कालावधीसाठी घेतल्यास क्षयरोग पूर्णपणे बरा होतो - डॉ.सोमशेकर एन, संचालक, राष्ट्रीय क्षयरोग संस्था
शासकीय रुग्णालयात क्षयरोग निदान तसेच क्षयरोगाची औषधे मोफत दिली जातात
शासनाकडून दिल्या जाणाऱ्या मोफत सुविधांचा लाभ घेण्यासाठी लोकांनी पुढे यावे
रिलॅप्स अर्थात पुन्हा होणारा क्षयरोग हा मुख्यतः धूम्रपान करणारे, मद्यपान करणारे, अनियंत्रित मधुमेह असलेल्या व्यक्तींना होतो;
रिलॅप्स क्षयरोग देखील बरा होऊ शकतो.
Posted On:
23 MAR 2022 12:54PM by PIB Mumbai
मुंबई: मार्च 23, 2022
2008 मध्ये, पुरातत्वशास्त्रज्ञांनी दोन 9,000 वर्षे जुने सांगाडे शोधून काढले होते ज्यांना क्षयरोगास कारणीभूत ठरणाऱ्या मायकोबॅक्टेरियम ट्यूबरक्युलोसिसचा प्रादुर्भाव झाला होता. या रोगजंतूंनी इतके दिवस कसा टिकाव धरला?
आजही क्षयरोग हा सर्वात संसर्गजन्य मारकांपैकी एक आहे, ज्यामुळे मलेरिया किंवा एड्सपेक्षा जास्त मृत्यू होतात. आपण 24 मार्च 2022 रोजी जागतिक क्षयरोग निर्मूलन दिन पाळतो आणि जगभरातील एकूण क्षयरोग रुग्णांपैकी सुमारे 26% भारतात आढळतात त्यामुळे पत्र सूचना कार्यालय या रोगाविषयी आणि त्याच्या उपचारांबद्दल महत्त्वाची वस्तुस्थिती तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे.
डॉ. सोमशेकर एन, संचालक, राष्ट्रीय क्षयरोग संस्था (NTI), बेंगळुरू आणि डॉ. रविचंद्र सी., मुख्य वैद्यकीय अधिकारी, राष्ट्रीय क्षयरोग संस्था बेंगळुरू या तज्ज्ञ वक्त्यांनी पत्र सूचना कार्यालय ,पश्चिम विभागाच्या वतीने आयोजित वेबिनारमध्ये (https://youtu.be/X4OivuFPj60) सहभागी झाले होते.
प्रश्न) क्षयरोग बरा होऊ शकतो का?
रुग्णाने खंड न पाडता योग्य कालावधीत योग्य औषधे घेतल्यास, होय ! क्षयरोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. मात्र औषध घेण्याविषयीच्या सूचनांचे योग्य पालन न केल्यास रुग्णाचा मृत्यूही होऊ शकतो - डॉ.सोमशेकर. एन संचालक, राष्ट्रीय क्षयरोग संस्था
प्रश्न) क्षयरोगाच्या उपचारांना इतका वेळ का लागतो?
पूर्ण बरे होण्यासाठी, रुग्णाने क्षयरोगाची औषधे किमान सहा महिने काटेकोरपणे घ्यावीत; क्षयरोगाच्या प्रकारावर आधारित, हा उपचार कालावधी आणखी वाढू शकतो. याचे कारण म्हणजे मायकोबॅक्टेरियम
क्षयरोगाचे जिवाणू मंद गतीने प्रगती करतात, फारच मंद गतीने विभागतात आणि केवळ संसर्गातून क्षयरोग होण्यास जास्त वेळ लागतो. त्यामुळे क्षयरोगाच्या उपचारांना दीर्घ उपचारांची आवश्यकता असते.
औषधे घेतल्यानंतर दोन महिन्यांनंतर संसर्गाचा परिणाम नकारात्मक असला तरीही, चयापचयदृष्ट्या निष्क्रिय सुप्त सूक्ष्म जंतू रुग्णाला सक्रिय झाल्यावर हानी पोहोचवू शकतात. जेव्हा सुप्त जीवाणू सक्रिय होतात तेव्हा औषधाची पातळी नियमितपणे राखली न गेल्यास पुन्हा संसर्गाची शक्यता जास्त असते. त्यामुळे अशी कोणतीही घटना टाळण्यासाठी औषधे जास्त काळ सेवन केली जातात.
“आज जरी मला क्षयरोगाची लागण झाली असली तरी हा आजार होण्यासाठी मला किमान सहा महिने किंवा अगदी 60 वर्षे लागतात”- डॉ.सोमशेकर. एन . संचालक, राष्ट्रीय क्षयरोग संस्था
प्रश्न) क्षयरोगाचे उपचार
क्षयरोगाची औषधे थेट रुग्णांना दिली जात नाहीत परंतु ती देखरेखीखाली दिली जातात ज्याला डायरेक्टली ऑब्झवर्ड ट्रीटमेंट, शॉर्ट कोर्स (डॉट्स) थेरपी म्हणतात. याचे कारण असे की, प्रत्येक जुनाट आजाराप्रमाणे, क्षयरोगाची औषधे फक्त लक्षणे कमी होईपर्यंतच घ्यावी लागतात आणि त्यानंतर ती चालू ठेवू नयेत – अशा प्रकारे उपचारांना रुग्ण-केंद्रित दृष्टिकोनाची आवश्यकता असते. या अंतर्गत ‘उपचार समर्थक’ औषधे ठेवतील आणि रुग्णाला दररोज भेट देऊन त्यांच्याकडून औषधे घ्यावी लागतील.
क्षयरुग्णांसाठी सरकारी पाठबळ:
विशेषतः सार्वजनिक क्षेत्रातील रुग्णालयांमध्ये क्षयरोगाचे प्रत्येक औषध आणि क्षयरोगाचे निदान मोफत आहे. रुग्णाला काहीही खर्च करण्याची गरज नाही; लोकांनी पुढे येऊन सरकारकडून मोफत दिल्या जाणाऱ्या सुविधांचा लाभ घ्यावा; जरी खासगी रुग्णालयात रुग्णाचे निदान झाले - तरीही उपचार आणि फायदे समान आहेत - डॉ. सोमशेकर. एन, संचालक, राष्ट्रीय क्षयरोग संस्था
भारत सरकार थेट लाभ हस्तांतरणाद्वारे सर्व नोंदणीकृत आणि अधिसूचित क्षयरुग्णांना दरमहा 500 रुपये देते. हे पाठबळ उपचार कालावधीपर्यंत प्रदान केले जाते जरी उपचार दोन वर्षांपर्यंत वाढले तरीही.
मुळात रूग्णांना पोषक आहार मिळावा यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. उच्च प्रथिनयुक्त आहारामुळे उपचारादरम्यान होणारे प्रतिकूल परिणाम कमी होण्यास मदत होते आणि सरकार रुग्णांची काळजी घेण्यासाठी आणि त्यांना यशस्वी उपचार पूर्ण करण्यात मदत करण्यासाठी हे पाठबळ प्रदान करते.
सरकार उपचार सहाय्यकांना प्रोत्साहन देखील प्रदान करते, जे सामान्यतः रूग्णांना औषध देण्याचे आणि त्याचे निरीक्षण करण्यासाठी प्रभारी असतात.
रुग्णाने निवड केल्यास ते खासगी रूग्णालयातही उपचार घेऊ शकतात, परंतु योग्य देखरेखीखाली जेणेकरून ते उपचार पूर्ण करू शकतील.
खासगी क्षेत्रातही, सरकार खासगी डॉक्टर्स आणि नर्सिंग होम्सना सरकार मानधनाच्या स्वरूपात प्रोत्साहन रक्कम देते.
प्रश्न) क्षयरोग पुन्हा होऊ शकतो का?
सुमारे 10 ते 12% बरे झालेल्या रूग्णांना पुन्हा क्षयरोग होऊ शकतो ज्याला रिलॅप्स टीबी/रिकरिंग टीबी म्हणतात आणि सामान्यतः धूम्रपान करणारे, मद्यपान करणारे आणि अनियंत्रित मधुमेह असलेल्या लोकांमध्ये तो दिसून येतो. कुपोषण हे देखील क्षयरोग पुन्हा होण्याचे एक कारण आहे.
म्हणूनच उपचार पूर्ण झाल्यानंतरही, कोणतीही लक्षणे नसतानाही, उपचारपश्चात पाठपुरावा केला जातो ज्यात रुग्ण दर सहा महिन्यांनी दोन वर्षांपर्यंत पाठपुरावा भेट देत असतो.
या काळात क्षयरोगाची कोणतीही लक्षणे दिसल्यास रुग्णाने ताबडतोब डॉक्टरांकडे जावे.
रिलॅप्स टीबी देखील बरा होतो - डॉ.सोमशेकर. एन, संचालक, राष्ट्रीय क्षयरोग संस्था
प्रश्न) क्षयरोग आणि कोविड-19 यांचा काही संबंध आहे का?
आतापर्यंत कोविड-19 आणि क्षयरोग यांच्यात थेट संबंध असल्याचा कोणताही पुरावा नाही. मात्र फुफ्फुसाचा क्षयरोग होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने केवळ यातील औत्सुक्य वाढत आहे. जिथे जिथे कोविडची जास्त प्रकरणे आहेत तिथे फुफ्फुसाच्या क्षयरोगाची अधिक प्रकरणे नोंदवली जात आहेत - रविचंद्र सी मुख्य वैद्यकीय अधिकारी,एन टी आय
कोविड-19 चा राष्ट्रीय क्षयरोग कार्यक्रमावर मोठा परिणाम झाला, कारण महामारी आणि टाळेबंदीमुळे रूग्णांनी रूग्णालयांना भेट देणे बंद केले आहे किंवा ते भेट देऊ शकले नाहीत. क्षयरोगासाठी वाटप केलेली संसाधने आणि मनुष्यबळ कोविडच्या कामासाठी वळवण्यात आल्याने गंभीर परिणाम झाले.
दोन्ही रोगांचे लक्षण देखील समान होते - खोकला. म्हणून कोविड-19 च्या सुरुवातीच्या टप्प्यात, भारत सरकारने एक परिपत्रक जारी केले ज्यामध्ये कोविडचे कोणतेही लक्षण आढळून आलेल्या रुग्णांची क्षयरोगाची आणि क्षयरोगाची लक्षणे असलेल्यांची कोविड चाचणी देखील केली जावी असे म्हटले होते.
असे असूनही, क्षयरोगाचे निदान मोठ्या प्रमाणात कमी झाले. लोकांना खोकला असतानाही त्यांनी कोविड होण्याच्या भीतीने किंवा विलगीकरणाच्या भीतीने रुग्णालयात जाणे बंद केले. यामुळे कुटुंबातील इतर सदस्यांनाही संसर्ग होण्याचा मार्ग मोकळा झाला. महामारीच्या काळात अनेक रुग्णांना त्रास सहन करावा लागला ज्यामुळे अनेक क्षयरुग्णांचे मृत्यूही झाले.
प्रश्न) क्षयरोगाच्या औषधांचे काही दुष्परिणाम आहेत का?
कोणतेही औषध जास्त काळ घेतल्यास मळमळ होऊ शकते - डॉ.सोमशेकर. एन
सामान्य दुष्परिणाम आणि उपाय:
खाज येणे - मॉइश्चरायझर किंवा खोबरेल तेलाचा वापर उपयोगी ठरू शकतो.
जठरदाह – क्षयरोगाची औषधे रिकाम्या पोटी घेणे टाळा; ती नेहमी जेवणानंतर घ्या.
दृष्टी अंधुक होणे - जिथे हिरवी पाने लाल दिसतात; कोणताही रंगबदल आढळल्यास ताबडतोब वैद्यकीय अधिका-यांना कळवावे जे नेत्रतज्ञांना आवश्यक ते निर्देश देतील.
काही क्षयरोगाच्या औषधांमुळे श्रवणशक्ती कमी होते, थायरॉईड विकार होतात ज्यामुळे सांधेदुखी होऊ शकते.
आपले शरीर जुळवून घेईपर्यंत सर्व दुष्परिणाम दोन महिन्यांत दूर होतील. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेणे बंद करू नका - डॉ. सोमशेकर. एन
टीप: क्षयरोग याविषयावरील वेबिनारसंदर्भातील हे दुसरे प्रसिद्धीपत्रक आहे. या वेबिनारमध्ये झालेल्या चर्चेचा गोषवारा असलेले पहिले प्रसिद्धीपत्रक येथे पाहू शकता . अधिक माहिती जाणून घेण्यासाठी संपूर्ण वेबिनार येथे पाहू शकता
***
Jaydevi PS/Vasanti J/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1808597)
Visitor Counter : 13548