देशाच्या विकास प्रक्रियेत तरुणांनी मोलाचे योगदान देण्याचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांचे आवाहन
पुणे, 28 ऑक्टोबर 23
सरकारी नोकरी ही सुवर्णसंधी समजून त्या माध्यमातून देशाच्या विकास प्रक्रियेत मोलाचे योगदान देण्याचे आवाहन केंद्रीय रेल्वे , कोळसा आणि खाण विभागाचे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी आज केले.
पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात असलेल्या भारतीय रेल्वे सिव्हील इंजिनियरिंग इन्स्टिट्युट मध्ये आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते . त्यांच्या प्रमुख उपस्थितीत एकंदर 80 जणांना यावेळी सरकारी नोकरीची नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आली.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना रावसाहेब दानवे पाटील पुढे म्हणाले की सरकारच्या कारभारात आता पूर्णपणे पारदर्शकता आली असून त्यामुळेच केवळ गुणवत्तेच्या आधारे सरकारी नोकरी मिळण्याची पद्धत अमलात आली आहे .
2047 मध्ये देशाच्या स्वातंत्र्याला 100 वर्षे पूर्ण होत असून त्यावेळी जगाच्या पाठीवर विकसित आणि सर्वार्थाने बलाढ्य देश म्हणून भारताची ओळख संपूर्ण जगाला व्हावी यासाठीचे नियोजन आत्तापासूनच सुरू झाल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
दोन वर्षांपूर्वी आलेली कोविड ची साथ असो किंवा जी 20 परिषद असो , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारख्या दूरदृष्टीच्या नेत्यांमुळे आज संपूर्ण जगात भारताचे नाव आदराने घेतले जात असल्याचे सांगून दानवे पाटील पुढे म्हणाले की , आज देशाची अर्थव्यवस्था जगात पाचव्या स्थानावर पोचली असून आगामी 25 वर्षात आणखी खूप काही बदल होणार आहेत . सक्षम नेतृत्व असेल तर देशात अनेक चांगल्या व्यवस्था निर्माण होऊ शकतात हे गेल्या 9 वर्षात देशवासीयांनी अनुभवले आहे.
मध्य रेल्वे पुणे विभागाच्या प्रबंधक इंदू दुबे यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर अतिरिक्त प्रबंधक ब्रुजेश कुमार सिंह यांनी आभार मानले.
***
VS/MI/PK
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai