Posted On:
29 NOV 2026 2:46PM by PIB Mumbai
केंद्रीय ऊर्जा आणि गृहनिर्माण व नगरविकास मंत्री मनोहर लाल यांच्या अध्यक्षतेखाली 27 आणि 28 नोव्हेंबर 2026 रोजी नवी दिल्लीत झालेल्या दोन दिवसीय वीज मंत्र्यांच्या परिषदेचा काल संध्याकाळी समारोप झाला. ऊर्जा क्षेत्रात स्वावलंबन आणि 2047 पर्यंत विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी 28 राज्ये, 8 केंद्रशासित प्रदेश आणि नियामक संस्थांनी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार या परिषदेत व्यक्त केला.

27 नोव्हेंबर रोजी झालेल्या परिषदेच्या उद्घाटन सत्रात भारताची एकूण वीज निर्मिती क्षमता 563 गिगावॅट असल्याची माहिती देण्यात आली. यापैकी 55 टक्क्यांहून अधिक वीज निर्मिती क्षमता बिगर-जीवाश्म स्रोतांमधून आहे. 2035-36 पर्यंत ही क्षमता दुपटीहून अधिक म्हणजे 1 हजार 297 गिगावॅटपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट या परिषदेत निश्चित करण्यात आले.
गेल्या वर्षभरात 60 गिगावॅट वीज निर्मिती क्षमता वाढवण्यात आली असून, त्यापैकी 87 टक्के क्षमता बिगर-जीवाश्म स्रोतांमधून आली आहे. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये वीज वितरण कंपन्यांनी एकत्रितपणे कर भरल्यानंतर नफा नोंदवला आहे. तसेच, पुढील 20 वर्षांत वीज क्षेत्रात 200 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होण्याची संधी असल्याचेही या सत्रात सांगण्यात आले. या परिषदेला केंद्रीय ऊर्जा आणि नवीन व नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक, विविध राज्यांचे आणि केंद्रशासित प्रदेशांचे ऊर्जामंत्री, ऊर्जा विभागाचे सचिव पंकज अग्रवाल, केंद्रीय विद्युत प्राधिकरणाचे अध्यक्ष, केंद्रीय विद्युत नियामक आयोगाचे अध्यक्ष, तसेच राज्य आणि संयुक्त विद्युत नियामक आयोगांचे अध्यक्ष उपस्थित होते. याशिवाय केंद्र आणि राज्य सरकारांचे वरिष्ठ अधिकारीही या परिषदेत सहभागी झाले होते.
निष्पत्ती आणि कालमर्यादित वचनबद्धता
संसाधनांची पर्याप्त उपलब्धता आणि ऊर्जा साठवणूक प्रणालींची उभारणी: राज्यांनी आर्थिक वर्ष 2029-30 पर्यंतच्या आपल्या संसाधन पर्याप्तता योजनांचा आढावा घेण्याचे मान्य केले. यामध्ये खात्रीशीर पारेषण जोडणी आणि वास्तववादी मागणीचे अंदाज सुनिश्चित करून, एका महिन्याच्या आत या योजना सादर करण्याचे ठरवण्यात आले. तसेच, अतिरिक्त क्षमता वाढ आणि संसाधनांच्या उपलब्धतेसाठी केलेल्या करारांचा तिमाही आढावा घेण्याचेही मान्य करण्यात आले.
पारेषण आणि मार्गाधिकाराची अंमलबजावणी: वीज निर्मिती आणि पारेषण या दोन्ही गोष्टी समांतरपणे पुढे जाणे आवश्यक असल्याचे अधोरेखित करत, राज्यांनी पारेषण संसाधन पर्याप्ततेचे आराखडे तातडीने अंतिम करण्याचे मान्य केले. यामध्ये पारेषण वाहिन्या आणि उपकेंद्रांसाठी स्पष्ट उद्दिष्टे निश्चित करणे, राज्यांतर्गत पारेषणासाठी (आयएनएसटीएस) दराधारित स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया (टीबीसीबी) स्वीकारणे आणि केंद्रीय विद्युत प्राधिकरणाच्या (सीईए) सुधारित तांत्रिक मानकांचा अवलंब करणे यांचा समावेश आहे.
वीज वितरण कंपन्यांची आर्थिक व्यवहार्यता, स्मार्ट मीटरिंग आणि ग्राहक-केंद्रित प्रशासन: सरकारी वीज बिलांची वारंवार निर्माण होणारी थकबाकी संपुष्टात आणण्यासाठी, राज्यांनी एका तिमाहीत सर्व प्रलंबित सरकारी देयके चुकती करण्याचे मान्य केले. तसेच, अर्थसंकल्पीय निधी उपलब्ध होण्याची वाट न पाहता, सर्व सरकारी वीज जोडण्या आगाऊ रिचार्जच्या आधारावर कार्यरत असलेल्या प्रीपेड स्मार्ट मीटरवर स्थलांतरित करण्याचे ठरवण्यात आले.

कृषी क्षेत्राचे सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण आणि अणुऊर्जा विस्तार: वीज खरेदीचा खर्च आणि अनुदानाचा भार कमी करण्यासाठी फीडरचे विलगीकरण आणि कृषी फीडरचे सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण यांना गती देण्याची राज्यांनी वचनबद्धता व्यक्त केली. अणुऊर्जेबाबत, विकसित भारत@2027 साठी 2047 पर्यंत 100 गिगावॅट अणुऊर्जा निर्मिती क्षमता साध्य करण्याच्या पंतप्रधानांच्या संकल्पपूर्तीसाठी, राज्यांनी प्रकल्पस्थळांची तयारी वेगाने पूर्ण करणे, जमीन आणि पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करणे तसेच बंद करण्यात आलेल्या औष्णिक वीज प्रकल्पांच्या जागांसह योग्य ठिकाणांची निवड करण्याचे मान्य केले.
मार्च 2027 पर्यंत प्रत्येक घरापर्यंत वीज जोडणी: काल (28 नोव्हेंबर) प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना केंद्रीय ऊर्जा मंत्र्यांनी सांगितले की, 14.5 लाख घरांना वीज जाळ्याद्वारे जोडण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यापैकी ऑफ-ग्रिड पद्धतीने विद्युतीकरण केलेल्या घरांसह सुमारे 6.25 लाख घरांचे काम पूर्ण झाले आहे. दुर्गम आणि डोंगराळ भागांतील काही घरांचा अपवाद वगळता उर्वरित सर्व घरांचे विद्युतीकरण मार्च 2027 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा असल्याचेही त्यांनी सांगितले. उर्वरित काम पुढील वर्षी मार्चपर्यंत मिशन मोडमध्ये पूर्ण करण्याचे राज्यांनी मान्य केले.
***
राधिका अघोर/राज दळेकर/गजेंद्र देवडा/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai