पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

'मन की बात'च्या 140 व्या भागात पंतप्रधानांच्या संबोधनाचे मराठी भाषांतर (29.11.2026)

Posted On: 29 NOV 2026 11:43AM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 नोव्‍हेंबर 2026

 

माझ्या प्रिय देशबांधवांनो, नमस्कार !

‘मन की बात’ मध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. ‘मन की बात’ हे समाजातल्या प्रत्येक घटकाचं, देशाच्या प्रत्येक भागातील यशोगाथा सर्वांसमोर मांडण्याचं व्यासपीठ आहे. आणि या व्यासपीठावर आपण समाजापुढे असलेल्या आव्हानांविषयी बोलतो, लोकांना जागरूकही करतो. आज ‘मन की बात’ मध्ये, मी सर्वात आधी असाच एक विषय मांडतोय, आणि तो विषय आहे ‘ड्रग्स’ म्हणजेच ‘अंमली पदार्थांचं व्यसन’. मित्रहो, आज जगभरात भारताच्या युवा वर्गातील प्रतिभेविषयी केवढी चर्चा होत आहे. आपला युवा वर्ग मोठमोठी स्वप्नं पाहतो आहे, ती पूर्ण करण्यासाठी जीवाचं रान करत आहे, मात्र युवा वर्गाच्या या स्वप्नांसमोर अमली पदार्थांचं व्यसन हे एक मोठं आव्हान म्हणून उभं राहिलंय. मात्र, मला एका गोष्टीचं समाधान वाटतं की, आज देशात व्यसनाविरोधात समाजाचा सहभाग वाढू लागला आहे. ‘नशामुक्त युवा अभियान’ देखील जोमाने सुरू आहे. अशी कितीतरी प्रेरणादायी उदाहरणं आपल्यासमोर येत आहेत, की अनेक युवकांनी आपल्या इच्छाशक्तीच्या बळावर व्यसनाधीनतेवर मात केली आहे, कठीणातल्या कठीण परिस्थितीशी झुंज देऊन ते त्यातून बाहेर पडले आहेत. ते स्वतःशी लढले आहेत आणि त्यांनी आपल्या आयुष्याला एक नवी दिशा दिली आहे. आज ‘मन की बात’ मध्ये मी अशाच एका तरुण मित्राला फोन केला आहे. चला, त्याच्याकडूनच ऐकूया, अमली पदार्थांविरोधातली (ड्रग्स विरोधातली) त्याच्या आयुष्याची ही लढाई त्यानं कशी जिंकली. कशा-कशा प्रकारच्या अडचणींतून त्याला जावं लागलं. चला, त्याच्याकडून ऐकू या.

युवा मित्र : नमस्कार सर, कसे आहात तुम्ही?

पंतप्रधान : नमस्ते, मला आज एक नवा मित्र मिळतोय. मी तुला कधी भेटलेलो नाही, पण तुझ्याबद्दल जे ऐकलं...

युवा मित्र : हो सर.

पंतप्रधान : तर माझ्या मनात इच्छा झाली मी तुझ्याशी बोललं पाहीजे.

युवा मित्र : हो हो नक्कीच सर.

पंतप्रधान : मित्रा, तू सांग की तू व्यसनाच्या विळख्यात कसा अडकलास?

युवा मित्र : सर, मी दिल्लीच्या सदर बाजार भागात राहायचो. तिथे माझ्या आजीचं घर होतं, तर तिथलं वातावरण थोडं असं होतं की, म्हणजे, लहान लहान मुलं व्यसनं करायची. तर मी त्यांना बघून ना, त्यांचे डोळे पेंगुळल्यासारखे असायचे, मला वाटायचं की काहीतरी करतात हे. तर सर मग असं झालं की, मी शाळेत माझ्यापेक्षा मोठ्या मुलांना पाहायचो, ते सुद्धा थोडं वेगळं आयुष्य जगायचे. माझं, या सगळ्या गोष्टींकडे ना, जास्त लक्ष असायचं. दहावीत असताना मी थोड्याफार प्रमाणात ड्रग्स घ्यायला सुरुवात केली. हळूहळू माझं प्रमाण वाढतच गेलं. मला कळलंच नाही की मी हौस म्हणून ज्या गोष्टी करायचो, त्या सर्व गोष्टी, कधी त्या माझ्या सवयी बनून गेल्या. मला त्याची अशी सवय लागली की पाहिजे तर पाहिजेच, त्याशिवाय मला काहीच करता येत नव्हतं. खूप मजा यायची, मजेच्या नादातच तर हे करायला सुरुवात केली होती, करायचो, एक झिंग यायची, मजा यायची. छान वाटायचं, असं काही वाटायचं की सगळं काही छान चाललंय - बिनधास्त. मला हे माहीतच नव्हतं की याची पुढे मला काय किंमत मोजावी लागेल?

पंतप्रधान : पैसेही खूप खर्च करावे लागले असतील, त्यामुळे इतरही वाईट सवयी लागल्या असतील?

युवा मित्र : हो सर. घरातून मी पैसे सांगून घ्यायचो की एखादं पुस्तक घ्यायचंय, कधी फी भरायचीये, कधी मला सहलीला जायचंय, पण मी ते पैसे, ते सगळे पैसे आपल्या इकडे वापरत होतो व्यसनासाठी.

पंतप्रधान : बरं, तुझ्या आयुष्यात असा कोणता टप्पा आला, जेव्हा तू ठरवलंस की आता आपल्याला व्यसनातून बाहेर पडून आपल्या आयुष्याला एक नवी दिशा द्यायची आहे?

युवा मित्र : सर, मी ना लहानपणापासून माझ्या आजी आजोबांकडेच राहिलो होतो. बाबा माझ्या लहानपणीच वारले होते, तर माझी आजी, माझ्या आईला आणि मला तिच्याकडे घेऊन आली होती, की बाबा आता तुम्ही माझ्याकडेच राहा. मग मी हळूहळू मोठा होत राहिलो, त्यांनी माझ्याकडून खूप स्वप्नं पाहिली होती, की आपलं मूल एक चांगला माणूस बनेल. पण तसं, त्यांना काहीच दिसलं नाही. आधी माझी आई गेली, त्यानंतर काहीच दिवसांत माझी आजी गेली. मला खूप मोठा धक्का बसला, कारण त्यावेळी तिच्याशिवाय माझ्याकडे बघणारं कोणीच नव्हतं. मी अनाथ झालो होतो, अगदी ना रस्त्यावर आलो होतो. मी माझे दिवस रस्त्यांवर घालवले. थंडीत मी बटाट्याची पोती रिकामी करून त्यावर झोपलो. भंडाऱ्यात भाकरी खाल्ली, लंगरमध्ये खाल्लं, म्हणजे खूप वाईट वेळ पाहिली मी - एका व्यसनामुळे. अगदी असं झालं होतं की माझ्या समोर मृत्यू उभा होता, आणि तो हात पकडू पाहत होता, की फक्त हात पकडला, आणि मी तुला माझ्या विळख्यात घेईन, पण मी त्याला, माझं बोटही पकडू दिलं नाही. सर, या सगळ्या गोष्टी पाहून पाहून, मी, अगदी आतून मी तुटलो होतो, की, आता काय होईल, माझ्या घरच्यांनी मला अगदी सोडून दिलं, अगदी एकटं करून टाकलं, कारण, माझे पप्पा लहानपणीच वारले होते. मम्मी मला आजीकडे घेऊन आली होती, माझा त्यांच्याशी काही संपर्क नाहीये, आजी आजोबांशी काही संपर्क नव्हता, आणि जे मामा मामी होते, त्या लोकांनीही मला सोडून दिलं होतं, कारण याच्यामुळे आपल्या मुलांवर काय परिणाम होईल या भीतीमुळे, याला एका बाजूला करून टाका. नातेवाईक तर सर कोणीच विचारत नाही, सर, कोणीच विचारायचं नाही मला, अगदी भरकटलो होतो, आणि जे मित्र होते ते सगळे व्यसनी होते, सगळे चुकीची कामं करणारे व्यसनी मित्र, म्हणजे, व्यसन करणं, आणि व्यसन कसं मिळवायचं? काय काम करायचं? कशी चुकीची कामं करायची? बस या सगळ्या गोष्टींत मी गुरफटून गेलो होतो.

पंतप्रधान : नाही, या सगळ्यात कोणता टप्पा आला जेव्हा तू ठरवलंस की मला या वाईट गोष्टींमधून, या नरकासारख्या आयुष्यातून बाहेर पडायचं - तो क्षण कोणता होता?

युवा मित्र : सर, तो क्षण असा होता की माझा एक साथीदार होता जो मला थोडी मदत करायचा. त्याला मी बोललो की बाबा मी व्यसन सोडू इच्छितो, मला थोडं सहकार्य कर. मला त्याच्याकडून खूप अपेक्षा होती, पण त्यानेही शेवटच्या वेळी मला हात दाखवले वर करून, की नाही भाऊ, मी सुद्धा तुझ्यासोबत नाहीये. तर मी त्यावेळी तुटलो होतो अगदी, की माझा शेवटचा आसरा हा होता, आणि एका व्यसनामुळे, मी, माझी आई गमावली, आजी गमावली, कुटुंब गमावलं - शेवटचा हा होता मी यालाही गमावलं, तर आता, सुधारायला हवंच, तर त्यानंतर, मला पुनर्वसन केंद्राबाबत कळलं एस पी वाय एम (सोसायटी फॉर द प्रमोशन ऑफ युथ अँड मासेस) असं एक केंद्र आहे. दिल्लीत मुख्य कार्यालय आहे त्यांचं वसंत कुंजमध्ये, तर मी तिथे गेलो, तिथे जाऊन मी उपचार घेतले, मी बाहेर आलो, एकटा होतो, सर, मी, तिथे उपचार घेतले, बाहेर पडलो. मी पुन्हा व्यसनाकडे वळलो, गडबड केली, मला पुन्हा त्या लोकांनी बोलावलं की ये. तीन वेळा असंच झालं, मग मी त्यांना माझी पूर्ण अडचण सांगितली की, त्यांनी माझं कारण विचारलं की वारंवार पुन्हा व्यसनाकडे का वळतोयस, तर त्यांना मी सांगितलं की, मी एकटा आहे. मी इथून बाहेर पडून, मला माहीतच नसतं की मी जाणार कुठे, माझं घर कुठे आहे, राहायचं कुठे? काहीच माहीत नसायचं सर मला…. या नादात मी, त्याच लोकांकडे पोहोचायचो परत फिरून फिरून, जे माझे आधीचे मित्र होते, कारण कोणतंच ठिकाण सापडत नव्हतं राहण्यासाठी, म्हणजे मी कुठे जाऊ? 

पंतप्रधान : तू खूप वाईट दिवस पाहिलेस आणि या व्यसनातून बाहेर पडण्याच्या तुझ्या प्रयत्नातही अडथळे आले, म्हणजे खूप आव्हानात्मक राहिला असेल हा काळ, अशातच बाहेर पडण्याची इच्छा देखील आव्हानासारखीच राहिली असेल?

युवा मित्र : सर, एक आतून मन व्हायचं की सोडून दे, एक आतून मन व्हायचं की थोडंसंच आयुष्य उरलंय मित्रा, व्यसन करून जग, आणि प्रकरण संपव आपलं. सर, मी त्याचं न ऐकता, दुसऱ्या मनाचं ऐकलं की नाही मित्रा, मला माझं आयुष्य सुधारायचंय, मला काहीतरी आपल्यासाठी करायचंय, जे मला सगळे म्हणायचे ना, की बाबा, हा काहीच करू शकणार नाही. मला घरच्यांनी सोडून दिलं आपल्या नशिबावर, सगळ्यांनी सोडून दिलं.

पंतप्रधान : तुझ्या स्वतःच्या अनुभवाच्या आधारे, जर तुला देशातील युवा वर्गाला काही सांगायचं असेल, जे अजूनही व्यसनाला बळी पडलेले आहेत? अशा मुलांना तू काय सांगशील?

युवा मित्र : सर, मी त्यांना हेच सांगू इच्छीतो, की सुरुवातीला या सगळ्या गोष्टींमुळे खूप मजा येते, पण जे यामुळे नंतर नुकसान होतं ना, ते आपल्यासोबत, आपल्या कुटुंबलाही भोगावं लागतं, यात काहीही फायदा नाहीये, काहीही - फक्त नुकसान, नुकसान, नुकसानाशिवाय काहीच नाही. जे या व्यसनाच्या विळख्यात अडकलेत, त्यांना एक छोटासा सल्ला देऊ इच्छीतो, आपलं आयुष्य, सर, खूपच सुंदर आहे, खूप चांगलं आहे, आपण ते त्या पद्धतीने जगलो ना, तर आपण प्रत्येक गोष्टीची मजा घेऊ शकू.

पंतप्रधान : चला, खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून आणि मी तुला शुभेच्छा देतो की जी लढाई तू जिंकली आहेस, तू विजयी बनून राहा. पुन्हा कधी या व्यसनाच्या वाटेला जाणार नाही - हा संकल्प करून जग आणि जे कोणी भेटतील त्यांना समजावत राहा की हा मार्ग चुकीचा आहे.

युवा मित्र : हो सर, धन्यवाद सर.

पंतप्रधान : खूप-खूप शुभेच्छा मित्रा, खूप-खूप शुभेच्छा.

युवा मित्र : धन्यवाद सर.

मित्रा, मी तुझं पुन्हा एकदा खूप अभिनंदन करतो की तू अमली पदार्थांच्या या भयानक व्यसनातून बाहेर पडलास. तू दाखवून दिलं आहेस की जेव्हा इच्छाशक्ती असते, तेव्हा कोणतंही ध्येय अशक्य राहत नाही. तुझं बोलणं ऐकून अशा अनेक तरुणांना बळ मिळेल, ज्यांना अंमली पदार्थांचं व्यसन सोडायचं आहे. कुटुंबासाठी, देशासाठी हे खूप गरजेचं आहे की आपली युवा पिढी अमली पदार्थांपासून दूर राहायला हवी. तुला माझ्या खूप-खूप शुभेच्छा !

माझ्या प्रिय देशबांधवांनो, 

आयुष्यात जेव्हा केव्हा आपण काहीतरी नवं शिकतो, तेव्हा आपल्याला एक वेगळाच आनंद मिळतो आणि शिकण्याला तर कोणतंच वयही नसतं. आज मी तुमच्याशी देशभरातल्या त्या लाखो सरकारी कर्मचाऱ्यांबद्दल बोलू इच्छितो, ज्यांच्यात काहीतरी नवं शिकण्याचा उत्साह पाहायला मिळतो. यांच्यापैकी अनेक जण 20-25 वर्षांपासून सरकारी सेवेत आहेत. इतका मोठा अनुभव असून देखील ते आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत काहीतरी नवं शिकण्यासाठीही वेळ काढत आहेत, आणि यासाठी ते एका डिजिटल व्यासपीठाची मदत घेत आहेत. त्याचं नाव आहे ‘आयगॉट कर्मयोगी’ (iGOT Karmayogi). या व्यासपीठावर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 17 भारतीय भाषांमध्ये सात  हजारांपेक्षा जास्त अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. लाखो सरकारी कर्मचाऱ्यांनी अनेक अभ्यासक्रम पूर्ण केले आहेत. कोणी कृत्रिम बुद्धिमत्तेचा अभ्यास करत आहे, तर कोणी भारतीय सांकेतिक भाषा शिकत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नव-तंत्रज्ञान शिकण्याबाबत आपल्या कर्मयोग्यांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळतोय. याच्याशी संबंधित दोनशेपेक्षा जास्त असे अभ्यासक्रम आहेत आणि सव्वातीन कोटींपेक्षा जास्त जणांनी अभ्यासक्रम पूर्ण केले आहेत. मित्रहो, केंद्र सरकारसोबतच राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे कर्मचारीही याच्याशी जोडले गेले आहेत. आपल्या आशा दीदी, अंगणवाडी सेविका, आपले शिक्षक, पोलिसांचे जवान, आरोग्य कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, हे सर्व सरकारी व्यवस्थेचे असे सहकारी आहेत ज्यांचा देशबांधवांशी रोज संबंध येत असतो. जेव्हा हे सहकारी काहीतरी नवं शिकतात, ‘आयगॉट कर्मयोगी’ चा अभ्यासक्रम पूर्ण करून जेव्हा ते कर्मयोगी बनतात, तेव्हा त्याचा लाभ अशा सर्व लोकांनाही मिळतो, ज्या लोकांमध्ये जाऊन ते काम करत असतात. मित्रहो, ‘नागरिक देवो भव’ हा मिशन कर्मयोगीचा मूलमंत्र आहे. देशातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांमधील शिकण्याचा हा उत्साह, विकसित भारताच्या प्रवासातली खूप मोठी ताकद आहे.

माझ्या प्रिय देशबांधवांनो, 

जरा विचार करा तुमचा मोबाईल फोन कुठे हरवला तर किती त्रास होतो. मोबाईलमध्ये तुमचे संपर्क क्रमांक असतात, फोटो असतात, महत्त्वाची कागदपत्रं असतात, आणि न जाणो कितीतरी महत्त्वाची माहितीही असते. एकदा का फोन हरवला की तो परत मिळण्याची आशा देखील हळूहळू कमी होऊ लागते - पण आता तसं नाहीये. तुमचा हरवलेला मोबाईल फोन तुम्हाला परत मिळू शकतो, आणि त्यासाठी केंद्र सरकारचं डिजिटल व्यासपीठ तुमची खूप मोठी मदत करू शकतं. या व्यासपीठाचं नाव आहे ‘संचार साथी’. आतापर्यंत ‘संचार साथी’ च्या पोर्टलला 30 कोटींपेक्षा जास्त जणांनी भेट दिली आहे. सुमारे तीन कोटी वेळा हे ॲप डाऊनलोड केलं गेलं आहे.

मित्रांनो,

प्रश्न हा आहे की ‘संचार साथी’ ही काम करतो कसे? तर मित्रांनो, प्रत्येक मोबाइल फोनची स्वतःची एक खास ओळख असते. त्याला I.M.E.I.क्रमांक असं म्हणतात. ‘संचार साथी’ याच ओळखीच्या मदतीने, तुमचा हरवलेला मोबाइल शोधण्यात मदत करतो. ज्यावेळी आपण पोलिसांकडे तक्रार करता, त्याचवेळी, तुम्ही ‘संचार साथी’ वर. आपल्या मोबाईल चा I.M.E.I. क्रमांक आणि इतर काही माहिती देऊन आपला फोन लगेच ब्लॉक करु शकता. त्यानंतर इतर कोणीही व्यक्ती, त्यात नवे सिम कार्ड घालूनही, त्याचा वापर करु शकत नाही. मात्र, याच वैशिष्ट्य इथेच संपत नाही. जेव्हा कोणीही व्यक्ती त्या मोबाईल मध्ये नवे सिम कार्ड टाकून नेटवर्क शी जोडण्याचा प्रयत्न करेल, पोलिसाना लगेच त्याची खबर मिळेल आणि त्याला शोधणे सोपे होऊन जाईल. मित्रांनो, या व्यवस्थेच्या मदतीने देशभरातून 14 लाखांपेक्षा अधिक हरवलेले मोबाइल फोन शोधून, जप्त करण्यात आले आहेत; त्यांच्या मालकांना परतही देण्यात आले आहेत. म्हणजे, पूर्वी जे फोन हरवल्यानंतर कधी परत मिळण्याची अपेक्षाच नसे, टेक फोन आता तंत्रज्ञानाच्या मदतीने परत मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. 

मित्रांनो,

संचार साथी’ आपल्याला एकमेकांची मदत करण्याची संधी देखील देतो. कल्पना करा, की तुम्हाला कोणाचा तरी फोन आला, तुमची फसवणूक करण्यासाठी, कोणीतरी तुम्हाला OTP मागितला. तुमच्या लक्षात आले, की हा कोणी बदमाश माणूस आहे, तुम्ही फोन कट केला. मात्र, ज्या बदमाश माणसाच्या फसवणुकीपासून, तुम्ही वाचलात, होऊ शकतं की पुढचा फोन तो एखाद्या वयोवृद्ध, ज्येष्ठ नागरिकाला करेल, जो, त्याच्या फसवणुकीला बळी पडेल. अशा वेळी, आपण ‘संचार साथी’ ला अशा संदिग्ध फोनची माहिती जरूर द्यायला हवी. पुण्यात राहणाऱ्या  हिमांशु सिंह यांनी अशीच, 300 पेक्षा अधिक संशयास्पद नंबर्सची माहिती, ‘संचार साथी’ ला दिली होती. त्यांच्या प्रयत्नातून गेल्या वर्षभरात सुमारे 18 हजार मोबाइल जोडण्या रद्द करण्यात मदत झाली आहे. अशाच प्रकारे, आंध्र प्रदेशच्या नेल्लोर इथे राहणारे, विवेक अल्हरी जी आहेत. एक सजग नागरिक म्हणून आपली भूमिका पार पाडत, त्यांनी संचार साथी वर 900 पेक्षा जास्त बनावट मोबाइल क्रमांकांची माहिती दिली. त्यांच्या प्रयत्नातून सुमारे 17 हजार मोबाइल जोडण्या कापण्यात मदत मिळाली आहे. आपणही त्यांच्याकडून नक्की प्रेरणा घ्यायला हवी. आपल्या छोट्याशा प्रयत्नातून देशाच्या कोणत्या तरी काना-कोपऱ्यात असलेल्या एखाद्या कुटुंबाची आयुष्यभराची कमाई वाचू शकते. 

मित्रांनो,

‘संचार साथी’शी आपल्या बँका, पेमेंट अॅप्स, दूरसंचार कंपन्या आणि पोलिसांसह 1,600  हून अधिक संस्था जोडल्या गेल्या आहेत. यामुळे सायबर फसवणुकीचे अनेक प्रयत्न वेळीच हाणून पाडण्यास मदत होत आहे. या व्यवस्थेमुळे आतापर्यंत पाच हजार कोटी रुपयांहून अधिक संभाव्य नुकसान टाळता आले आहे. हे अॅप 23 भाषांमध्ये उपलब्ध असून वापरण्यास अतिशय सोपे आहे. तुम्हीही ‘संचार साथी’बद्दल जास्तीत जास्त लोकांना माहिती द्या. आपली छोटी खबरदारी, डिजिटल जग आपल्या सर्वांसाठी अधिक सुरक्षित करू शकते.

माझ्या प्रिय देशबांधवानो, 

आपण जेव्हाही, कोणत्या नव्या जागी जातो, त्यावेळी तिथली प्रसिद्ध स्थळे बघण्याची, तिथल्या खाद्यपदार्थांचा आनंद घेण्याची आपली इच्छा असते. माझा तुमच्याकडे असा आग्रह आहे, की आपण जिथे फिरायला जाल, तिथल्या वस्तू संग्रहालयांविषयी देखील जरा माहिती मिळवा. अलीकडेच, भारतातील वस्तू संग्रहालयांशी संबंधित काही उत्साहवर्धक बातम्या आल्या. मित्रांनो, पाटणा इथल्या बिहार वस्तू संग्रहालयाला जगातील 100 सर्वोत्तम वस्तू संग्रहालयाच्या यादीत, नववे स्थान मिळाले आहे. या यादीत बिहार वस्तू संग्रहालय, संपूर्ण आशियात पहिल्या स्थानी आहे. या यादीत बिहार संग्रहालय संपूर्ण आशियात पहिल्या क्रमांकावर आहे. तुम्ही पॅरिसमधील ‘लूव्ह्र संग्रहालया’चे नाव ऐकले असेल. न्यूयॉर्कमधील ‘द मेट’ संग्रहालयही जगभरात खूप प्रसिद्ध आहे. मात्र, या यादीत बिहार संग्रहालय या दोन्ही संग्रहालयांपेक्षा पुढे आहे.

मित्रांनो,

गुजरातमधील वडनगर इथेही एक अतिशय अभिनव संग्रहालय आहे. त्याचे नाव आहे ‘अनंत अनादि वडनगर पुरातत्त्वीय प्रायोगिक संग्रहालय’. वडनगरमध्ये पुरातत्त्व विभागाने केलेल्या उत्खननात इतिहासाच्या वेगवेगळ्या कालखंडांशी संबंधित अनेक वस्तू सापडल्या आहेत. ज्या ठिकाणी हे उत्खनन झाले, त्याच ठिकाणी हे संग्रहालय विकसित करण्यात आलं आहे. इथे असा एक मार्ग तयार केला आहे, ज्यावरून चालताना जमिनीच्या अनेक मीटर खोलवर झालेल्या उत्खननाचे दर्शन घेता येतं.

वडनगर संग्रहालयात पाच हजारांहून अधिक प्राचीन कलाकृतीही प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. याच महिन्यात बर्लिनमध्ये वडनगर संग्रहालयाला डिझाइन क्षेत्रातील मोठा सन्मान—‘रेड डॉट: बेस्ट ऑफ द बेस्ट पुरस्कार’—मिळाला आहे. हा सन्मान मिळवणारे हे भारतातील पहिले वस्तू संग्रहालय आहे. मित्रांनो, वडनगर असे शहर आहे, जे हजारो वर्षांपासून जिवंत आहे, अगदी काशी सारखं. आणि योगायोग बघा, वडनगर मध्ये माझा जन्म झाला आणि काशी चा मी खासदार आहे. काही दिवसांपूर्वीच, कांची कामकोटि पीठाचे पूज्य शंकराचार्य सुद्धा वडनगर इथे गेले होते. त्यांनी वडनगर ला  ‘गुजरात ची काशी’ अशा स्वरूपाची ओळख दिली आहे. 

मित्रांनो,

कलेच्या क्षेत्रातही भारताने एक मोठे यश संपादन केले आहे. इटलीतील व्हेनिस येथे ‘व्हेनिस आर्ट बिएनाले’ हे अत्यंत प्रतिष्ठित कला प्रदर्शन भरते. त्याला कलेच्या जगतातील ऑलिम्पिक असेही म्हटले जाते. यंदा सुमारे साडेचार लाख लोकांनी तिथल्या भारताच्या पॅव्हिलियनला भेट दिली. विशेष म्हणजे, जगभरातून आलेल्या प्रेक्षकांनी मतदान करून भारताच्या पॅव्हिलियनची सर्वोत्कृष्ट म्हणून निवड केली आहे.

आपल्या कलाकारांनी दाखवून दिले आहे की भारताच्या पारंपरिक कलांना नवे रूप देऊन सादर केले, तर त्या संपूर्ण जगाचे मन जिंकू शकतात.

मित्रांनो,

आता भारतातही कला, वास्तुकला आणि डिझाइनचा एक मोठा महोत्सव होणार आहे. डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यात दिल्लीत ‘इंडिया बिएनाले’ला सुरुवात होईल. यंदा तब्बल 108 दिवस या महोत्सवात, देशातील ऐतिहासिक स्मारके, संग्रहालये आणि कलादालने, यांचे प्रदर्शन असेल. माझे तुम्हा सर्वांना आवाहन आहे की तुम्ही वेळात वेळ काढून या आयोजनाला नक्की भेट द्या आणि आपल्या मुलांनाही सोबत घेऊन जा. आपल्या वारशाबद्दल आपण जितके अधिक जाणून घेऊ, तितकी भारताला समजून घेण्याची आपली वाटचाल अधिक समृद्ध होत जाईल.

माझ्या प्रिय देशबांधवानो, 

हिवाळ्याचा विषय निघाला  आहे, तर, गूळाच्या गोडव्याचा उल्लेख कसा टाळता येईल! शतकानुशतके आपल्या घरांमध्ये चव आणि आरोग्याचा खजिना असलेला गूळ, आज जगभर पोहोचत आहे. तामिळनाडूतील इरोडचा सेंद्रिय पामिरा गूळ पहिल्यांदाच युरोपमध्ये पोहोचला आहे. गुळाची पारंपरिक चव आणि उत्तम गुणवत्ता याचा त्यात संगम आहे. ‘मन की बात’मध्ये आपण यापूर्वी मधाच्या गोडव्याविषयी आणि ‘स्वीट रिव्होल्यूशन’विषयी चर्चा केली आहे. आता आपल्या गुळाचा गोडवाही नव्या-नव्या बाजारपेठांपर्यंत पोहोचत आहे.

मित्रांनो,

भारतातील चॉकलेटलाही जगात वेगळी ओळख मिळत आहे. गेल्याच वर्षी चॉकलेट आणि कोकोपासून बनवलेल्या पदार्थांच्या निर्यातीत सुमारे पंचवीस टक्के वाढ झाली. देशाच्या वेगवेगळ्या भागांतील चॉकलेट उत्पादक उद्योजकही नवनवीन कल्पना घेऊन पुढे येत आहेत. आज या क्षेत्रात आपले अनेक स्टार्टअप्स नवनवीन प्रयोग करत आहेत. अनेक स्टार्टअप्सनी स्थानिक सामग्रीपासून वेगवेगळ्या चवींची चॉकलेट्स तयार केली आहेत. यामुळे आपले शेतकरी, माता-भगिनी आणि युवा उद्योजक—सर्वांसाठी नव्या संधी निर्माण होत आहेत.

मित्रांनो,

चॉकलेट आणि गुजरातमधील कच्छ यांच्यातील एक अद्भुत नाते तुम्हाला माहीत आहे का? हे नाते आहे, उंटाच्या दुधापासून बनवलेल्या चॉकलेटचे ! इथले उंटपालक जे दूध पुरवतात, त्याचा वापर अमूल कंपनी, चॉकलेट, केशराच्या स्वादाचे दूध आणि राजभोग आइस्क्रीम बनवण्यासाठीही करत आहे. आणि उंटाच्या दुधाशी संबंधित आकडेवारी तर खूपच उत्साहवर्धक आहे. सरहद डेअरीमध्ये उंटाच्या दुधाचे रोजचे संकलन 1300 लिटरवरून वाढून साडेपाच हजार लिटर्सपर्यंत पोहोचले आहे. 2017-18 च्या तुलनेत हे संकलन,  चारपटांहून अधिक आहे. आता उंटाचे दूध अशा पॅकमध्येही उपलब्ध आहे, ज्यात ते बराच काळ खराब होत नाही. त्याची पावडरही तयार केली जात आहे. त्यामुळे कच्छपासून दूर राहणाऱ्या ग्राहकांपर्यंतही ते अधिक सहजपणे पोहोचत आहे. मित्रांनो, जाणकारांच्या मते, उंटाच्या दुधाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. ज्यांना मधुमेहाची समस्या आहे,  त्यांच्यासाठी ते चांगले मानले जाते. लॅक्टोज सहन न होणाऱ्या लोकांसाठीही हा उत्तम पर्याय ठरू शकतो. त्यात मेद आणि कोलेस्टेरॉलचे प्रमाणही कमी असते.

मित्रांनो,

सूरतची ‘श्मिटन’ (Schmitten) चॉकलेटही ‘मेड इन इंडिया’ फाइन चॉकलेट म्हणून जगभरात आपली वेगळी ओळख निर्माण करत आहेत. आपल्या देशात स्टायलिश चॉकलेट बुटीकचा नवा ट्रेंडही दिसत आहे. येथे चॉकलेटसोबतच भारतीयत्वाची झलक असलेला एक आलिशान अनुभवही मिळतो. गोडव्याची आपली शतकानुशतकांची परंपरा आज नवनव्या नवकल्पनांसह पुढे जात आहे आणि तिचा गोडवा आपल्या शेतकरी व तरुण उद्योजकांच्या जीवनातही मिसळत आहे.

मित्रांनो,

चॉकलेटविषयी आपण इतक्या गप्पा झाल्या;  त्यामुळे आता थोडा व्यायामाचाही विषय व्हायला हवा, नाही का! सायकलिंग हा त्यासाठी एक उत्तम मार्ग आहे. ‘फिट इंडिया’च्या ‘संडेज ऑन सायकल’ उपक्रमाने शंभर आवृत्त्या पूर्ण केल्या आहेत, याचा मला आनंद आहे. डिसेंबर  2023 मध्ये या उपक्रमाची सुरुवात झाल्यापासून आजपर्यंत असा एकही रविवार गेला नाही, ज्या दिवशी त्याचे आयोजन झाले नाही. 30 हजारांहून अधिक ठिकाणी सुमारे 37 लाख लोक या उपक्रमाशी जोडले गेले आहेत. पुण्यातून आणखी एक चांगली बातमी आली आहे. तिथे 2032 ची UCI रोड वर्ल्ड चॅम्पियनशिप आयोजित केली जाणार आहे. क्रीडा क्षेत्रात भारत सातत्याने नवी यशशिखरे गाठत आहे. आपल्या फुटबॉल संघाने विक्रमी दहाव्यांदा SAFF चॅम्पियनशिप जिंकली आहे. बॅडमिंटनमध्ये लक्ष्य सेनने जर्मनी आणि जपानमध्ये सलग दोन सुपर 500 स्पर्धांची विजेतेपदे मिळवली. कुमामोटो मास्टर्स जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला. तर पी. व्ही. सिंधूने हायलो ओपन जिंकून आणखी एक विजेतेपद भारताच्या नावावर केले.

आपल्या युवा खेळाडूंसाठी आणखी एक मोठी संधी येत आहे. तेलंगणातील सहा शहरांमध्ये 11 ते 22 डिसेंबरदरम्यान आठव्या खेलो इंडिया युवा स्पर्धांचे आयोजन होणार आहे. मी सर्व खेळाडू आणि अॅथलीट्सना शुभेच्छा देतो— खेळत राहा, बहरत राहा!

मित्रांनो,

देशाच्या अनेक भागांत हिवाळ्याला सुरुवात झाली आहे. बदलत्या हवामानात आपण आपल्या तंदुरुस्तीची अधिक काळजी घेतली पाहिजे. ‘फिट इंडिया’ चळवळ पूर्ण उत्साहाने पुढे चालू ठेवली पाहिजे. आहारातील तेलाचा वापर दहा टक्क्यांनी कमी करण्याचे आवाहन मी तुम्हाला केले होते, तेही लक्षात ठेवा. लठ्ठपणा ही आपल्या देशासमोरील मोठी आव्हानात्मक समस्या आहे. आपण त्याकडे कधीही दुर्लक्ष करता कामा नये. वाढत्या लठ्ठपणामुळे अनेक प्रकारचे आजार होतात. म्हणूनच आपल्या आहाराबाबत आणि व्यायामाबाबत आपण नेहमी सजग राहिले पाहिजे.

मित्रांनो,

आपल्या भारतभूमीतून प्रवाहित होणाऱ्या सेवेच्या भावनेचा प्रसार जगभर होत आहे. वेगवेगळ्या देशांतील भारतीय समुदायही अशा अनेक सेवाकार्यांमध्ये पुढाकार घेऊन योगदान देत आहे. ‘मन की बात’मध्ये मी वेळोवेळी तुम्हाला विविध देशांमध्ये सुरू असलेल्या अशा सेवाकार्यांविषयी सांगत असतो. अलीकडेच मला कॅनडामध्ये सुरू असलेल्या अशाच काही प्रयत्नांविषयी कळले. त्यांपैकी एक आहे ‘साई धाम फूड बँक’. ‘कोणीही उपाशी झोपू नये’ हे या उपक्रमाचे ध्येय आहे. या उपक्रमाअंतर्गत ग्रेटर टोरोंटो आणि हॅमिल्टन इथे, दर महिन्याला जवळपास साठ हजार लोकांना मदत केली जाते. या फूड बँकेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींपर्यंतही अन्न पोहोचवले जाते.

कॅनडामधील रेड एफएमशी संबंधित कुलविंदर संघेरा जी अशाच एका प्रशंसनीय उपक्रमात कार्यरत आहेत. त्यांनी लोकांना जोडण्यासाठी आणि सेवाकार्यांसाठी कम्युनिटी रेडिओचे माध्यम बनवले आहे. त्यांच्या या प्रयत्नांची प्रेरणा श्री गुरु नानक देव जी यांच्या शिकवणीतून आणि शीख धर्माच्या सेवाभावातून मिळाली आहे.

माझ्या प्रिय देशबांधवांनो,

काही दिवसांपूर्वीच आपण ‘प्रकाश पर्व’ साजरे केले. मला दिल्लीमध्ये ‘शबद कीर्तन’मध्ये सहभागी होण्याचे सौभाग्यही लाभले. हा पवित्र अनुभव माझ्या मनात नेहमीच राहील. मित्रांनो, आपल्या शीख गुरूंची चित्रे पाहिली की मन श्रद्धेने भरून येते. ही पवित्र चित्रे कोणी काढली असतील, असा विचार काही जणांच्या मनात येत असेल. शीख गुरूंची अशी अद्भुत चित्रे काढणारे महान कलाकार होते शोभा सिंह जी. आज, 29 नोव्हेंबर रोजी त्यांची  125 वी जयंती आहे. शोभा सिंह जी यांनी काही वर्षे सैन्यात ड्राफ्ट्समन म्हणूनही काम केले होते. या काळात त्यांनी बगदादमध्येही सेवा बजावली. त्यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या सन्मानार्थ स्मृति नाणे जारी करण्यात आल्याने शीख समुदायालाही खूप आनंद झाला आहे.

मित्रांनो,

आणखी एका महान व्यक्तीविषयी मला ‘मन की बात’च्या श्रोत्यांना सांगायचे आहे—ते म्हणजे बी. एन. राव. आपल्या संविधाननिर्मितीत श्री बी. एन. राव जी यांची महत्त्वाची भूमिका होती. परवाच आपण संविधान दिनही साजरा केला. उद्या, म्हणजे 30 नोव्हेंबर रोजी बी. एन. राव जी यांची पुण्यतिथी आहे. भारतीय संविधानाची रूपरेषा तयार करण्यात त्यांनी दिलेल्या ऐतिहासिक योगदानाचे देश नेहमी स्मरण ठेवेल. त्यांनाही मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.

माझ्या प्रिय देशबांधवानो, 

दर महिन्याला ‘मन की बात’साठी तुम्ही जे संदेश पाठवता, त्यातून देशाच्या वेगवेगळ्या भागांत होत असलेल्या अद्भुत प्रयत्नांविषयी जाणून घेण्याची संधी मला मिळते. कितीतरी लोकांची चांगली कामे तुमच्यामुळे संपूर्ण देशासमोर येतात. तुम्ही याच प्रकारे तुमचे अनुभव, विचार आणि सूचना माझ्याशी शेअर करत राहा. पुढच्या महिन्यात आपण पुन्हा भेटू, तेव्हा देशवासियांच्या अशाच काही प्रेरणादायक कहाण्यांविषयी चर्चा करू.

तुम्ही स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. आणि हो, ‘फिट इंडिया’ विसरू नका. हवामान खूप छान आहे—थोडा थोडा व्यायाम तरी नक्की करा. तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद!

 

* * *

राधिका अघोर/आकाशवाणी मुंबई/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2343396) अभ्यागत कक्ष : 5