गोवा, 28 नोव्हेंबर 2026
गोव्यात सुरू असलेल्या 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फी 2026 च्या समारोपाच्या दिवशी आज नऊ दिवसांच्या सिनेमॅटिक अवकाशाचा अनुभव, सांस्कृतिक भेटीगाठी आणि सर्जनशील देवाणघेवाणीची दिमाखदार सांगता झाली. या महोत्सवाच्या निमित्ताने जगभरातील चित्रपट, चित्रपटकर्मी आणि प्रेक्षक एकत्र आले होते. या महोत्सवाच्या आयोजनातून भौगोलिक, भाषिक आणि सांस्कृतिक सीमा ओलांडण्याच्या सिनेमाच्या सामर्थ्याचा गौरव केला गेला.
सीमाविरहित कथा ही यंदाच्या महोत्सवाची संकल्पना होती. या संकल्पनेला अनुसरून यंदाच्या इफ्फी 2026 च्या माध्यमातून प्रख्यात चित्रपटकर्मी, उदयोन्मुख कथात्मक मांडणीकार, चित्रपट उद्योग क्षेत्रातील तज्ञ व्यावसायिक आणि सिनेरसिकांसाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ उपलब्ध झाले होते. या व्यासपीठावरून विविध संस्कृती, भाषा आणि सिनेमॅटिक परंपरांमधील संवादाला चालना मिळाली.
यंदाच्या इफ्फीच्या समारोप सोहळ्यात सिनेमा आणि संस्कृतीचा अनोखा संगम घडून आला. या दिमाखदार सोहळ्याअंतर्गत रेड कार्पेटवरील मान्यवरांचे आगमन, सांस्कृतिक सादरीकरणे आणि बहुप्रतीक्षित पुरस्कार वितरण सोहळ्याचा अंतर्भाव होता. या पुरस्कार वितरण सोहळ्यातून उल्लेखनीय सिनेमॅटिक सादरीकरण आणि उदयोन्मुख प्रतिभेचा गौरव केला गेला.
_20261128220854_b92e14.jpeg)
समारोप समारंभात बोलताना गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी इफ्फीशी गोव्याचे 22 वर्षांपासून जोडलेले नाते तसेच चित्रपट उद्योगाचे महत्त्वाचे जागतिक केंद्र म्हणून विकसित होत गेलेला हा महोत्सव यावर प्रकाश टाकत, या महोत्सवाच्या यशाबाबत आपले विचार मांडले.
90 देशांच्या सहभागामुळे हा नऊ दिवसांचा महोत्सव जागतिक चित्रपटांचा सोहळा बनला असल्याचे त्यांनी नमूद केले. सुलभता आणि समावेशकता या गोष्टींचे महत्त्व अधोरेखित करत, युवा प्रेक्षकांना जागतिक चित्रपटसृष्टीचा आणखी विस्तृतपणे परिचय व्हावा, यासाठी विविध भाषांतील आणि विविध सांस्कृतिक परंपरांचे दर्शन घडविणारे चित्रपट पाहण्याचे आवाहन त्यांनी केले.
गोव्याला चित्रपट निर्मिती आणि सर्जनशील उद्योगांचे केंद्र बनवण्याच्या महत्त्वाकांक्षेचा पुनरुच्चार करत, “आमची आकांक्षा केवळ चित्रपट महोत्सव आयोजित करण्यापुरतीच नसून जिथे चित्रपटाच्या कल्पना विकसित होतील, चित्रपटांची निर्मिती होऊन ते संपूर्ण भारतात तसेच जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचविले जातील अशी व्यवस्था आम्हाला निर्माण करायची आहे,” असे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी पुरस्कार विजेत्यांचे आणि चित्रपटसृष्टीतील मंडळींचे अभिनंदन केले, तसेच भारताची सर्जनशील अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी सहकार्य दिल्याबद्दल भारत सरकार, माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि पंतप्रधानांचेही आभार मानले.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव चंचल कुमार यांनी भारतीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीला एकत्र आणण्यात तसेच विविध कथा जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी संधी निर्माण करण्यात इफ्फीची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित केली.
यंदाच्या महोत्सवाच्या नऊ दिवसांच्या कार्यक्रमात 86 देशांतील 150 हून अधिक आंतरराष्ट्रीय चित्रपटांनी भर घातल्याचे त्यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय सहकार्य, ब्रिक्स चित्रपट विभाग, नवोदित चित्रपट निर्मात्यांसाठीचे उपक्रम आणि वेव्ह्ज फिल्म बझारच्या 20 व्या आवृत्तीचा उल्लेख करत त्यांनी भारताच्या सर्जनशील अर्थव्यवस्थेत निर्माण होत असलेल्या नव्या संधींकडे लक्ष वेधले.
इफ्फी आणि गोवा यांच्यातील विशेष नात्याचाही चंचल कुमार यांनी आवर्जून उल्लेख केला. चित्रपटांचे प्रदर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे स्थानिक समुदायांनाही चित्रपटसृष्टीशी अधिक जवळून जोडता आले, असे ते म्हणाले.
महोत्सवाचे यश केवळ आकडेवारीत मोजता येणार नाही, असे म्हणाले. “इफ्फीमधून लोक आपल्यासोबत काय घेऊन जातात, हे केवळ आकड्यांमध्ये मोजता येत नाही. एखादा लक्षात राहिलेला चित्रपट, नव्याने सापडलेली एखादी कल्पना, निर्माण झालेली मैत्री किंवा भविष्यातील दिशा ठरवू शकणारे एखादे सहकार्य, अशा अनेक गोष्टी त्यात असतात.”, असे त्यांनी सांगितले.
चित्रपट निर्माते आणि सर्जकांना संदेश देताना चंचल कुमार म्हणाले, “येथे आपण गौरवलेले चित्रपट दूरवर पोहोचोत. येथे आपण शोधलेले तरुण कलावंतांचे आवाज अधिक बुलंद होवोत. आणि जगाला स्पर्श करणाऱ्या महान आगामी कथेचा प्रवास भारतातून सुरू होवो.”

महोत्सवाचे संचालक आशुतोष गोवारीकर यांनीही कथांचा, भावनांचा आणि सांस्कृतिक नात्यांचा हा नऊ दिवसांचा प्रवास उलगडून सांगितला. ‘सीमांच्या पलीकडच्या कथा’ या संकल्पनेचा आशय त्यांनी मांडला. “लोकांना एकमेकांशी जोडण्याची विलक्षण क्षमता चित्रपटांमध्ये आहे. आपण एकत्र हसतो, एकत्र रडतो आणि अचानक आपल्यामधील सगळ्या सीमा नाहीशा होतात, असे ते म्हणाले.
यंदाच्या महोत्सवातील चित्रपट विभागांविषयी गोवारीकर यांनी माहिती दिली. आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील 15 चित्रपट, ‘सिनेमा ऑफ द वर्ल्ड’ विभागातील 35 चित्रपट, फीचर ॲनिमेशन चित्रपटांचे पुनरागमन, चित्रपट या विषयावरील चित्रपटांसाठी सुरू करण्यात आलेला नवा विभाग आणि सर्वोत्कृष्ट वेब सीरिज (ओटीटी) पुरस्काराचा समावेश अशा महत्त्वपूर्ण उपक्रमांचा त्यांनी उल्लेख केला.
आंद्रे तार्कोव्स्की यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांना वाहण्यात आलेली आदरांजली, महोत्सवाचे भागीदार देश म्हणून स्पेन आणि रशिया यांचा असलेला सहभाग, 22 ब्रीक्स देशांच्या चित्रपटांचे सादरीकरण तसेच वेव्ज फिल्म बाजारची 20 वी आवृत्ती याकडे देखील त्यांनी लक्ष वेधले.
चित्रपटांची, चिंतन करण्यास प्रवृत्त करण्याची आणि उपेक्षित घटकांकडे लक्ष वेधून घेण्याची क्षमता अधोरेखित करत ते म्हणाले, “चित्रपटांनी अधून-मधून प्रश्न उपस्थित केले पाहिजेत. आरशाप्रमाणे त्याने समाजाला त्याचे वास्तव दाखवून आपल्यातील सामायिक मानवतेची जाणीव करून दिली पाहिजे.”
इफ्फी असलेले आपले संबंध ही गौरव आणि सन्मानाची बाब असल्याचं सांगत, गोवारीकर यांनी चित्रपटांच्या माध्यमातून संस्कृति, कथा आणि लोकांना एकत्र आणण्यात या महोत्सवाची महत्वाची भूमिका असल्याचे पुन्हा अधोरेखित केले.
राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ अर्थात एनएफडीसीचे व्यवस्थापकीय संचालक धिरज सिंह यांनी, या चित्रपट महोत्सवाला, चित्रपटांची जादू अनुभवण्यासाठी एक चैतन्यपूर्ण व्यासपीठ बनण्यासाठी योगदान देणाऱ्या सर्व संबंधितांचे, सहभागी झालेल्या प्रतिनिधींचे आणि अभ्यंगतांनी केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली आणि त्यांचे आभार मानले.
‘इफ्फी’ च्या आंतरराष्ट्रीय परीक्षक मंडळाचे अध्यक्ष आनंद एल. राय, ओटीटी परीक्षक मंडळाचे अध्यक्ष जमनादास मजेठिया, तसेच आयसीएफटी – युनेस्को गांधी मेडल परीक्षक मंडळाचे अध्यक्ष मनोज कदम यांनीही हा महोत्सव आणि परीक्षकमंडळाच्या चर्चेबाबत आपले मत मांडले.
उपस्थित मान्यवरांमध्ये राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे अध्यक्ष जी. कृष्णकुमार; गोवा मनोरंजन संस्थेच्या उपाध्यक्षा डिलिला एम. लोबो; माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव प्रभात; माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव तसेच वित्तीय सल्लागार दीपक नारायण, आणि गोवा मनोरंजन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक बांदेकर यांचा समावेश होता.
चित्रपटातील उत्कृष्टतेचा गौरव
तियागो गुएदेस दिग्दर्शित आणि पाउलो ब्रान्को निर्मित 'अकी' हा पोर्तुगीज-फ्रेंच चित्रपट 57 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी दिल्या जाणाऱ्या "सुवर्ण मयूर" या सर्वोच्च पुरस्काराचा विजेता ठरला. गोव्यात झालेल्या महोत्सवाच्या समारोप समारंभात दिग्दर्शक तियागो गुएदेस यांनी हा पुरस्कार स्वीकारला. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि परीक्षक मंडळाचे अध्यक्ष आनंद एल. राय यांनी संयुक्तपणे हा पुरस्कार प्रदान केला.

मुख्य आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील 15 चित्रपटांमधून विजेता म्हणून 204 मिनिटांच्या या सह-निर्मितीपटाने बाजी मारली. मे 2026 मध्ये कान चित्रपट महोत्सवात प्रीमियर झाल्यानंतर, हा चित्रपट साओ पावलो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आणि जकार्ता चित्रपट महोत्सवातही प्रदर्शित झाला; त्यानंतर 'सुवर्ण मयूर' पुरस्कार पटकावल्याने त्याच्या आंतरराष्ट्रीय महोत्सवी प्रवासात आणखी मानाचा तुरा रोवला गेला आहे.
मनाला सुखावणारी मात्र पुढे काय होईल यांचा अंदाज बांधता न येणारी अशी बांधीव कथा असलेल्या चित्रपटाची निर्मिती केल्याबद्दल परीक्षकांनी या चित्रपटांची विशेष दखल घेतली. या चित्रपटातील प्रमुख अभिनेते दिवंगत मानोलो सोलो यांना, त्यांनी चित्रपटसृष्टीला दिलेल्या प्रदीर्घ योगदानाबद्दल यावेळी आदरांजली वाहण्यात आली.

जर्मन चित्रपट निर्माते वोल्कर श्लॉन्डॉर्फ यांना ‘व्हिजिटेशन’ (Visitation) या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाच्या ‘रौप्य मयूर’ पुरस्काराने गौरवण्यात आले. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव चंचल कुमार आणि महोत्सवाचे संचालक आशुतोष गोवारीकर उपस्थित होते. समारोप समारंभात श्लॉन्डॉर्फ यांच्या वतीने चित्रपटाचे छायाचित्रण दिग्दर्शक ॲक्सेल श्नेप्पट आणि छायाचित्रण टीममधील कॉनराड वाल्डमन यांनी रौप्य मयूर' (Silver Peacock) पुरस्कार स्वीकारला.
चित्रपट प्रेमींच्या अनेक पिढ्यांना प्रभावित करणाऱ्या कथा पडद्यावर साकारताना, श्लोंडॉर्फ यांनी चित्रपट माध्यमावरचे आपले विलक्षण प्रभुत्व सिद्ध केले आहे. चित्रपट निर्मितीमधील कलात्मक आणि तांत्रिक घटकांना एकत्र गुंफून अचूकता आणि संयमाने एकसंध चित्र अनुभूती देण्याच्या दिग्दर्शकाच्या प्रतिभेचा परीक्षकांनी गौरव केला. "या चित्रपटात, प्रत्येक तपशील अचूक मांडला आहे, मग ती कलाकारांची एकत्रित कामगिरी असो, निर्दोष संपादन असो किंवा प्रभावी तरीही संयमित संगीत रचना असो," परीक्षकांनी नमूद केले.

‘कांतारा: अ लिजेंड - चॅप्टर 1’ मधील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा रजत मयूर पुरस्कार प्रदान करण्यात आला. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
आंतरराष्ट्रीय परीक्षकांनी शेट्टीचा गहन, सघन अभिनय आणि तीव्र संवेदनांची विशेष दखल घेत, प्रेक्षकांना विविध भावनांच्या एका प्रभावी सफरीवर घेऊन जाण्याच्या त्याच्या क्षमतेचे कौतुक केले. चित्रपटाच्या कथानकाशी शारीरिक आणि भावनिक पातळीवर पूर्णपणे समरस होण्याच्या त्याच्या वैशिष्ट्यावर प्रकाश टाकताना परीक्षक मंडळाने म्हटले, “तो हसतो, रडतो आणि भावनांच्या विविध छटांच्या प्रवासात प्रेक्षकांनाही सहभागी करून घेतो. त्याचे संपूर्ण शरीर चित्रपटातील कथेशी एकरूप होते. त्याने स्वतःला पूर्णपणे कथेत झोकून दिले आहे. ऋषभ शेट्टीचा हा थक्क करणारा अभिनय, केवळ अभिनयाच्या पलीकडे जाऊन एक विलक्षण अनुभव ठरतो.”

मॅन्युएला मार्टेली दिग्दर्शित 'द मेल्टडाउन' या चित्रपटातील अभिनयासाठी माया ओ'रुर्क यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा रौप्य मयूर पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सखोल बारकावे टिपणारा अभिनय आणि कलात्मक प्रभावाची दीर्घकाळ टिकणारी छाप सोडणाऱ्या माया ओ'रुर्क यांच्या अभिनयाची गौरवपूर्ण दखल या पुरस्कारातून घेतली गेली. माया ओ'रुर्क यांनी आपल्या पडद्यावरील अस्तित्वाने मोहून टाकणारे वातावरण निर्माण केल्याबद्दल परीक्षक मंडळाने त्यांची प्रशंसाही केली. “कुतूहल जागृत करणाऱ्या आणि सिनेमातील गूढतेचा शोध घेण्याच्या प्रक्रियेत प्रेक्षकांनाही खेचून आणणाऱ्या मोहक अभिनयनासाठी. अभिनेत्री आणि दिग्दर्शकामधील अपवादात्मक दृष्टिकोनातील अद्भुत सुसंगतेने या अभिनयाला आणखी उंचीवर नेले आहे. ”
एनएफडीसी चे व्यवस्थापकीय संचालक धीरज सिंह यांनी त्यांच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला.
लोरेन्झो फेरो आणि लुकास ए. विग्नाले दिग्दर्शित 'द रिव्हर ट्रेन' हा अर्जेंटिनी चित्रपट 57 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) 'सुवर्ण मयूर विशेष ज्युरी पुरस्काराचा मानकरी ठरला.

चित्रपटाच्या वैशिष्ट्यपूर्ण सिनेमॅटिक अभिव्यक्तीची दखल घेत, परीक्षकांनी त्याच्या प्रायोगिक स्वरुपातील कथाकथन शैलीचे आणि मुलाच्या दृष्टिकोनातून चित्रपटमाध्यमाच्या शक्यतांचा शोध घेण्याच्या क्षमतेची प्रशंसा केली. दिग्दर्शकांनी पारंपरिक सिनेमॅटिक सीमा ओलांडण्याची तयारी दाखवली असल्याचे अधोरेखित करताना प्रशस्तिपत्रात म्हटले आहे: “एका बालकाच्या नजरेतून चित्रपट खेळाच्या मैदानात रूपांतरित केल्याबद्दल आणि नाविन्यपूर्ण प्रयोगांद्वारे चित्रपट निर्मितीच्या सीमा विस्तारल्याबद्दल, आम्ही दोन्ही दिग्दर्शकांच्या दूरदृष्टीपूर्ण भावनेचा आणि लुकास ए. विग्नाले यांच्या स्मृतींचा गौरव करतो.”
दिग्दर्शक बेरेंजर थुइन यांना 57व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात ‘इफ्फी’मध्ये ‘द गोल्डन एज’ या चित्रपटासाठी, ‘सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक-पदार्पण’ या श्रेणीत ‘रौप्य मयूर’ अर्थात ‘सिल्व्हर पीकॉक’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

“अनेक वर्षांचा कालखंड व्यापणारा ऐतिहासिक चित्रपट साकारताना येणारी सर्व आव्हाने पहिल्याच चित्रपटात यशस्वीपणे पेलणे ही दुर्मीळ गोष्ट आहे. मात्र, संग्रहित सामग्री आणि प्रत्यक्षात चित्रित करण्यात आलेली दृश्ये यांचा सुरेख मेळ साधत आपल्या मार्गात येणाऱ्या प्रत्येक अडथळ्यांवर त्यांनी यशस्वीपणे मात केली आहे,” असे निरीक्षण परीक्षकांनी नोंदवले.
या पुरस्कारामुळे बेरेन्जर थुईन यांचा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट, कथेच्या कथनशैलीतील महत्वाकांक्षा आणि चित्रपट माध्यमाचा केलेला कल्पक वापर यामुळे विशेष ठरला आहे.
डॉ. विशाल चतुर्वेदी यांना त्यांच्या पहिल्याच ‘हनुमान अंश’ या चित्रपटासाठी भारतीय फीचर फिल्ममधील सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला आहे. परीक्षकांच्या प्रशस्तिपत्रात म्हटले आहे : "बजेट नव्हे तर, आशय महत्त्वाचा असतो. चित्रपटाचे हे मूलभूत तत्त्व आपल्या 'हनुमान अंश' या पहिल्याच चित्रपटात प्रभावीपणे मांडल्याबद्दल आम्ही डॉ. विशाल चतुर्वेदी यांचा गौरव करतो."
.JPG_20261128222042_96b1fb.jpeg)
"संस्कृती, श्रद्धा आणि संगीत या गोष्टी एका प्रबळ भावनिक बंधाने एकत्र आणून तुम्ही विलक्षण उपलब्धी साध्य केली आहे. स्पेशल इफेक्ट्सच्या आणि तंत्रज्ञानाच्या या युगात, तुमच्या कथाकथनातील साधेपणा अत्यंत स्तुत्य आहे; म्हणूनच जगभरातील चित्रपटगृहांमध्ये या कलाकृतीला प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद मिळाली आहे. 'हनुमान अंश' या पहिल्याच चित्रपटासाठी 'सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक' (बेस्ट डेब्यू डिरेक्टर) पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ. विशाल चतुर्वेदी यांचे अभिनंदन," असेही या प्रशस्तिपत्रात नमूद केले आहे.
हिन्दी माहितीपट-नाट्य मालिका ‘मेड इन इंडिया: ए टायटन स्टोरी’ या वेब सिरीजला 2026 ची ‘सर्वोत्कृष्ट वेब सिरिज (OTT)’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. रॉबी ग्रेवाल दिग्दर्शित, प्रभलीन सिंधु यांची संकल्पना आणि ओलमाइटी मोशन पिक्चर्सची निर्मिती असलेल्या या मालिकेने, परीक्षक मंडळाने निवड केलेल्या, विविध पाच भारतीय भाषांतील मालिकांना मागे टाकत बाजी मारली.

आंतरराष्ट्रीय परीक्षक मंडळाने कांतारा द लिजंड -चैप्टर 1 या चित्रपटाचा विशेष उल्लेख केला. चित्रपटातील तांत्रिक कौशल्य, प्रभावी संगीत आणि वैशिष्ट्यपूर्ण कथाकथनाची दखल घेत हा सन्मान देण्यात आला. परीक्षक मंडळाने या चित्रपटाचे वर्णन करताना म्हटले, “धाडसी, अतिशयोक्तीपूर्ण, तरीही विनोदाने समृद्ध असा हा चित्रपटाचा अनुभव अत्यंत प्रभावी आहे.”
फैसल सोयसल दिग्दर्शित तुर्की चित्रपट रेहमा ला प्रतिष्ठेचा आयसीएफटी – युनेस्को गांधी पदक 2026 प्रदान करण्यात आले.
राष्ट्रीय पुरस्कार विजेते गोमंतकीय चित्रपट निर्माते, लेखक आणि अभिनेते आदित्य सुहास जांभळे यांना 57 व्या इफ्फीमध्ये भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले. गोव्यातील रंगभूमीपासून राष्ट्रीय चित्रपटसृष्टीपर्यंतचा त्यांचा प्रवास अधोरेखित करत, त्यांच्या सर्जनशील दृष्टिकोनाची आणि कामगिरीची तसेच भारतीय चित्रपटसृष्टीत गोमंतकीय प्रतिभेच्या वाढत्या उपस्थितीची दखल या सन्मानाद्वारे घेण्यात आली.

‘सीमापार कथा’ या महोत्सवाच्या संकल्पनेचे प्रतिबिंब उमटवणाऱ्या तीन सांस्कृतिक सादरीकरणांनी समारोप सोहळ्यात रंगत आणली.
ब्लूम: स्टोरीज दॅट टेक रूट, स्टोरीज विदाउट बॉर्डर्स, या सादरीकरणात भारतीय आणि पाश्चात्त्य नृत्यपरंपरा, समकालीन अभिव्यक्ती आणि हवाई नृत्य यांचा संगम घडवून विविध संस्कृतींमध्ये फुलणाऱ्या कथांचे चित्रण करण्यात आले.
आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्यातीप्राप्त गायक कलाकार मिस्टिक पापिझ यांनी ‘व्हेन नेचर स्पीक्स, स्टोरीज विटाउट बॉर्डर्स ’ हे सादरीकरण चार सप्तकांच्या स्वरमर्यादेतून साकारत निसर्गातील ध्वनींची पुनर्निर्मिती केली.
‘साऊंड ऑफ सेलिब्रेशन’ या सादरीकरणाने संगीत सोहळ्याची सांगता झाली. विविध ताल आणि संगीतपरंपरांचा संगम घडवणाऱ्या या सादरीकरणाने समारोप सोहळ्यात उत्साहपूर्ण वातावरण निर्माण केले.

नऊ दिवस, असंख्य कथा!
रुपेरी पडद्यापासून ते चित्रपट व्यवसायापर्यंत, 57व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने (इफ्फी) चित्रपट निर्मितीच्या सर्व पैलूंचा गौरव केला. चित्रपटसृष्टीतील समृद्ध वारशाचा सन्मान करतानाच नवोदित प्रतिभांनाही प्रोत्साहन दिले.
‘फादरलँड’ या चित्रपटाने महोत्सवाचा प्रारंभ झाला, तर महोत्सवाच्या मध्यावधीत ‘आय मॅटर’ हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आणि ‘वी आर ऑल स्ट्रेंजर्स’ या चित्रपटाने महोत्सवाची सांगता झाली. या महोत्सवात 86 देशांतील 150 हून अधिक आंतरराष्ट्रीय चित्रपट, तसेच भारतीय पॅनोरमा विभागात 18 भाषांमधील 76 चित्रपट प्रदर्शित करण्यात आले. मान्यवर देश म्हणून स्पेन आणि भागीदार देश म्हणून रशियाच्या सहभागामुळे महोत्सवाला आंतरराष्ट्रीय परिमाण लाभले, तर ब्रिक्स चित्रपट प्रदर्शनाने त्याच्या सांस्कृतिक व्याप्तीत आणखी भर घातली.
चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रातील नव्या पिढीला प्रोत्साहन देण्यासाठी ‘क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो’ या उपक्रमांतर्गत 13 विविध कलाक्षेत्रांतील 100 युवा प्रतिभावंत एकत्र आले. ‘पेज से पिच तक’ या पहिल्याच उपक्रमामुळे नवोदित पटकथा लेखकांसाठी नव्या संधींची दारे खुली झाली.
20व्या ‘वेव्ह्ज फिल्म बाजार'ने जागतिक चित्रपट उद्योगातील परस्पर संबंध अधिक दृढ केले. या बाजारमध्ये 54 देशांतील 2,288 प्रतिनिधींनी सहभाग घेतला. यामध्ये 471 खरेदीदारांचा समावेश होता. मास्टरक्लास, कार्यशाळा, चित्रपट निर्मात्यांशी संवाद, पूर्वलक्ष्यी चित्रपट प्रदर्शन, पुनर्संचयित अभिजात चित्रपट, शताब्दी विशेष अभिवादन, भव्य प्रीमियर आणि गोमंतकीय चित्रपटांनी महोत्सवाच्या कार्यक्रमांची रंगत आणखी वाढवली.
इफ्फी 2026 चा पडदा पडला असला, तरी चित्रपटसृष्टीला कधीही समारोपाची श्रेयनामावली नसते. चित्रपटांच्या कथा प्रवास करत राहतील, त्यातील जादू मनात रेंगाळत राहील आणि त्यांचा उत्साह कोणत्याही सीमा किंवा बंधनांशिवाय असाच कायम राहील.
Read IFFILOID here: https://www.pib.gov.in/iffi/57/iffiLoid.aspx?yr=2026&lang=1®=48
* * *
पीआयबी मुंबई | राधिका अघोर/माधुरी पांगे/हर्षल आकुडे/नितीन फुल्लुके/तुषार पवार/मंजिरी गानू/वैभवी जोशी/सविता म्हस्कर/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे