गोवा, 28 नोव्हेंबर 2026
आशयप्रधान चित्रपट आणि प्रभावी कथाकथनाच्या सामर्थ्याचा गौरव करणाऱ्या 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) डॉ. विशाल चतुर्वेदी यांना त्यांच्या पहिल्याच ‘हनुमान अंश’ या चित्रपटासाठी भारतीय फीचर फिल्ममधील सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला आहे. 28 नोव्हेंबर 2026 रोजी गोव्यात झालेल्या महोत्सवाच्या समारोप समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह आणि 5 लाख रुपये रोख असे आहे.
चित्रपट, जाहिराती आणि संगीत व्हिडिओ अशा विविध क्षेत्रांत 100 हून अधिक प्रकल्पांवर लेखक आणि दिग्दर्शक म्हणून काम केलेल्या चतुर्वेदी यांचा सर्जनशील अनुभव या चित्रपटात दिसून येतो. एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी जवळपास पाच वर्षे वैद्यकीय व्यवसाय केला. त्यानंतर चित्रपट निर्मितीकडे वळण्याचा निर्णय घेतला. त्यांनी क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून काम केले असून, चित्रपट दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांच्यासोबतही काम केले आहे. तसेच ‘फौजी 2’ या दूरचित्रवाणी मालिकेसाठी लेखन केले आहे. नीम करोली बाबांचे जीवन आणि शिकवण यांच्याविषयीच्या अभ्यासातून त्यांना प्रेरणा मिळाली. त्यातूनच 2020 मध्ये प्रकाशित झालेले ‘डिव्हाइन डिटूर : दॅट चेंज्ड माय लाइफ’ हे पुस्तक त्यांनी लिहिले.

चित्रपटातील साधेपणा आणि भावनिक कथनशैलीचे परीक्षकांनी विशेष कौतुक केले. पुरस्काराची घोषणा करताना परीक्षकांनी, “अर्थसंकल्प महत्त्वाचा नाही, आशय महत्त्वाचा आहे,” असे नमूद केले. संस्कृती, श्रद्धा आणि संगीत यांचा भावनिक नाते जोडणारा सुरेख संगम घडवून आणल्याबद्दल त्यांनी चतुर्वेदी यांचे अभिनंदन केले. विशेष दृश्य परिणाम (स्पेशल इफेक्ट्स) आणि तंत्रज्ञानाचे वर्चस्व असलेल्या आजच्या काळात चित्रपटाची साधी, सहज कथनशैली हा एक ताजेपणाचा अनुभव असल्याचेही परीक्षकांनी म्हटले. जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांनी या चित्रपटाला दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाचीही त्यांनी दखल घेतली.
परीक्षकांच्या प्रशस्तिपत्रात म्हटले आहे : "बजेट नव्हे तर, आशय महत्त्वाचा असतो. चित्रपटाचे हे मूलभूत तत्त्व आपल्या 'हनुमान अंश' या पहिल्याच चित्रपटात प्रभावीपणे मांडल्याबद्दल आम्ही डॉ. विशाल चतुर्वेदी यांचा गौरव करतो."
"संस्कृती, श्रद्धा आणि संगीत या गोष्टी एका प्रबळ भावनिक बंधाने एकत्र आणून तुम्ही विलक्षण उपलब्धी साध्य केली आहे. स्पेशल इफेक्ट्सच्या आणि तंत्रज्ञानाच्या या युगात, तुमच्या कथाकथनातील साधेपणा अत्यंत स्तुत्य आहे; म्हणूनच जगभरातील चित्रपटगृहांमध्ये या कलाकृतीला प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद मिळाली आहे. 'हनुमान अंश' या पहिल्याच चित्रपटासाठी 'सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक' (बेस्ट डेब्यू डिरेक्टर) पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ. विशाल चतुर्वेदी यांचे अभिनंदन," असेही या प्रशस्तिपत्रात नमूद केले आहे.

चित्रपटाबद्दलः
'हनुमान अंश' हा चित्रपट जीवन, मृत्यू आणि मानवी दुःख यांसारख्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी संपूर्ण उत्तर भारतात प्रवास करणाऱ्या उत्तर प्रदेशातील एका गावात जन्मलेल्या लक्ष्मीनारायण यांच्या आध्यात्मिक प्रवासाचा मागोवा घेतो. त्यांना गाठ पडलेल्या साधू-संत आणि सामान्य माणसांच्या भेटीनंतर हळूहळू त्यांचा आध्यात्मिक दृष्टिकोन आकारास येतो. दरम्यान, नीम करोली गावाजवळ घडलेल्या एक रहस्यमय घटनेने त्यांना 'नीम करोली बाबा' हे नाव प्राप्त होते. ज्यांच्या शिकवणीने पुढे स्टीव्ह जॉब्स, मार्क झुकरबर्ग आणि ज्युलिया रॉबर्ट्स यांच्यासह जगभरातील अनेक व्यक्तींना प्रेरित केले अशा आदरणीय आध्यात्मिक व्यक्तिमत्त्वात रूपांतरित होण्याचा त्यांचा प्रवास या चित्रपटात मांडला आहे. तीन भागांच्या नियोजित मालिकेतील हा पहिला भाग असून, तो साधेपणा, आत्मशोध आणि आत्मपरीक्षण यांसारख्या विषयांवर प्रकाश टाकतो. हा चित्रपट प्रेक्षकांना, जगाला समजून घेण्याची सुरुवात स्वतःला समजून घेण्यापासून होते याची जाणीव करून देतो.
डॉ. विशाल चतुर्वेदी यांची पत्रकार परिषद येथे पहा:
https://www.youtube.com/live/Wg1kD08a39U?si=3AXNewetLvrUcxcM
इफ्फी 2026 मध्ये 'हनुमान अंश' बाबत पीआयबी द्वारे केलेले वार्तांकन त्यांच्या पुढील सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वाचा आणि फॉलो करा:
Read IFFILOID here: https://www.pib.gov.in/iffi/57/iffiLoid.aspx?yr=2026&lang=1®=48
***
हर्षल अकुडे/वैभवी जोशी/मंजिरी गानू/परशुराम कोर