अभिनेता-चित्रपट निर्माता ऋषभ शेट्टीला 57व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) ‘कांतारा: अ लिजेंड - चॅप्टर 1’ मधील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा रजत मयूर पुरस्कार प्रदान करण्यात आला. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव चंचल कुमार तसेच इफ्फी महोत्सवाचे संचालक आशुतोष गोवारीकर उपस्थित होते.
आंतरराष्ट्रीय परीक्षकांनी शेट्टीचा गहन, सघन अभिनय आणि तीव्र संवेदनांची विशेष दखल घेत, प्रेक्षकांना विविध भावनांच्या एका प्रभावी सफरीवर घेऊन जाण्याच्या त्याच्या क्षमतेचे कौतुक केले. चित्रपटाच्या कथानकाशी शारीरिक आणि भावनिक पातळीवर पूर्णपणे समरस होण्याच्या त्याच्या वैशिष्ट्यावर प्रकाश टाकताना परीक्षक मंडळाने म्हटले, “तो हसतो, रडतो आणि भावनांच्या विविध छटांच्या प्रवासात प्रेक्षकांनाही सहभागी करून घेतो. त्याचे संपूर्ण शरीर चित्रपटातील कथेशी एकरूप होते. त्याने स्वतःला पूर्णपणे कथेत झोकून दिले आहे. ऋषभ शेट्टीचा हा थक्क करणारा अभिनय, केवळ अभिनयाच्या पलीकडे जाऊन एक विलक्षण अनुभव ठरतो.”
सर्वोत्कृष्ट अभिनेता या श्रेणीतील रजत मयूर पुरस्कार हा चित्रपटातील अभिनेत्याच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी दिला जातो. रजत मयूर, प्रमाणपत्र आणि 15 लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
कांतारा: अ लिजेंड - चॅप्टर 1 चा कथासारांश
कदंब राजवटीच्या काळातील पार्श्वभूमीवर आधारित हा चित्रपट, कांतारा या गूढ जंगलातील घटनांवर आधारित आहे. बंगरा राज्याचा राजा विजयेंद्र जंगलात प्रवेश करतो आणि तेथे त्याचा मृत्यू होतो. त्यानंतर त्याचा वारसदार राजशेखर राज्याच्या सीमा बंद करतो. काही वर्षांनंतर जंगलात राहणारा बर्मे निषिद्ध सीमा ओलांडून राज्यात प्रवेश करतो आणि तेथील जुलमी राजवटीचा शोध घेतो. क्रूर राजपुत्र कुलशेखर जंगलातील आदिवासी जमातींवर हल्ला करतो, तेव्हा बर्मे न्याय आणि धर्माच्या रक्षणासाठी आपल्या लोकांना एकत्र आणतो. या संघर्षातून विचारधारा, श्रद्धा आणि नियती यांच्यातील महायुद्ध उभे राहते आणि अखेरीस दोन जगांचे भवितव्य निश्चित होते.

***
राधिका अघोर/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com