गोवा, 28 नोव्हेंबर 2026
आपण आपल्या कौटुंबिक नातेसंबंधांवर विचार करावा, आणि पालकांमधील संघर्षाचा मुलांच्या भावविश्वावर होणारा परिणाम समजून घ्यावा आणि आपल्या प्रियजनांशी संवाद साधावा, असा संदेश 57 व्या इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'अ फॅमिली’ या डच चित्रपटाचे दिग्दर्शक आणि अभिनेत्याने दिला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक मीस पेनेनबर्ग आणि अभिनेता पीटर एम्ब्रेक्ट्स यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत भावनिक सुरक्षितता, तुटलेले कौटुंबिक संबंध आणि पालकांच्या विभक्त होण्याकडे पाहण्याचा मुलांचा दृष्टिकोन यावर विचार मांडले.
_20261128140218_6f5b8e.jpeg)
आत्मचिंतनाचे महत्त्व अधोरेखित करत, दिग्दर्शक पेनेनबर्ग यांनी हा चित्रपट प्रौढांसाठी आणि पालकांसाठी एक खुले निमंत्रण असल्याचे सांगितले. याद्वारे ते स्वतःच्या कृतींविषयी आणि त्याचा मुलांवर होत असलेला परिणामा बाबत अधिक जागरूक होण्याचे आवाहन त्यांनी केले. त्यांनी नमूद केले की लोकांना स्वतःच्या वर्तनाबाबत अनेकदा अंदाज येत नाही, आणि ते आपल्या कृतीचा आजूबाजूच्या लोकांवर कसा परिणाम होतो हे ओळखू शकत नाहीत. ते म्हणाले की हा चित्रपट पात्र किंवा त्यांची परिस्थिती, याबाबत कोणतीही टिप्पणी न करता, जागरूकता वाढवण्याचा प्रयत्न करतो.
चित्रपटात जेकबची भूमिका साकारणाऱ्या एम्ब्रेक्ट्सने, प्रेक्षकांना त्यांच्या सर्वात जवळच्या व्यक्तींशी प्रगाढ संपर्क साधण्याचे आवाहन करून हा संदेश दिला. लोकांनी आपल्या प्रियजनांशी, आपल्या सर्वात जवळच्या व्यक्तींशी, संपर्क साधावा आणि त्यांना आलिंगन द्यावे असे मला वाटते, विशेषतः आजच्या काळात लोकांना अशा जवळच्या नात्याची गरज आहे, असे ते म्हणाले.
चित्रपटामागच्या प्रेरणेवर भाष्य करताना, पेइनेनबर्ग यांनी सांगितले की ही कथा अत्यंत वैयक्तिक आहे, काही प्रमाणात तुटलेल्या कुटुंबात लहानाचे मोठे होताना आलेल्या त्यांच्या अनुभवावर आधारित आहे. आपले जग आणि कुटुंब जेव्हा कोसळू लागते, तेव्हा एखाद्या व्यक्तीला नेमके काय हवे असते, हे आपल्याला जाणून घ्यायचे होते, असे ते म्हणाले. संशोधन आणि निरीक्षणातून त्यांना असे जाणवले की, विशेषतः अनिश्चितता आणि संकटाच्या काळात, भावनिक सुरक्षितता, हीच माणसाची मुलभूत गरज असते. “मला वाटते की, जेव्हा आपल्या सभोवतालचे जग हादरून जाते आणि कोसळू लागते, तेव्हा माणूस भावनिक सुरक्षिततेच्या शोधात असतो,” ते म्हणाले.

एकाच घटनेचा अनुभव वेगवेगळ्या व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारे कसा घेतात, हे जाणून घेण्यातही आपल्याला रस होता, असे दिग्दर्शाकांनी सांगितले. हीच कल्पना 'अ फॅमिली' या चित्रपटाचा कथानकाचा पाया आहे. चित्रपटात नीना आणि एली या भावंडांची कथा आहे, जी त्यांच्या आई-वडिलांच्या विभक्त होण्याच्या प्रवासावर आधारित आहे. दोन्ही मुले एकाच कौटुंबिक विघटनाचा अनुभव घेत असली तरीही ते या घटनेला वेगवेगळ्या प्रकारे प्रतिसाद देतात. पेजेनबर्ग यांनी नीनाचे वर्णन आपल्या भावना मनात दाबून ठेवणारी मुलगी असे केले आहे. तिच्या मनात भावनांचे वादळ दडलेले आहे असे सांगत त्यांनी तिची तुलना ज्वालामुखीशी केली आहे. आपल्या सभोवतालच्या प्रत्येकाला खूश करण्याचा प्रयत्न करणारा एली आपल्या आई-वडिलांमध्ये अडकून पडला आहे. दोन्ही मुलांच्या परस्परविरोधी प्रतिक्रिया असल्या तरी दोघेही प्रेम आणि भावनिक सुरक्षिततेच्याच शोधात आहेत.
मुलांच्या दृष्टिकोनातून कथा सांगण्याच्या आपल्या निर्णयाबद्दल बोलताना पेजेनबर्ग यांनी निरीक्षण नोंदवले की, अशा परिस्थितीचा मुलांवर आणि किशोरवयीन मुलांवर काय परिणाम होतो, याकडे चित्रपटसृष्टीने तुलनेने कमी लक्ष दिले आहे. त्यामुळे या चित्रपटात मुलांना कथानकाच्या केंद्रस्थानी ठेवलेले आहे. या मुलांचे आई-वडील स्वतःच्या वेदनांशी झगडत असताना, ही मुले कठीण भावनिक वास्तवाचा सामना कसा करतात, याचा वेध चित्रपटात घेण्यात आला आहे.

भावनिकदृष्ट्या तीव्र दृश्यांमध्ये पारंपरिक गडद किंवा थंड प्रकाशावर अवलंबून राहण्याऐवजी, प्रखर सूर्यप्रकाशाच्या हेतुपुरस्सर वापरावरही पेजेनबर्ग यांनी चर्चा केली. व्यक्तिरेखांची भावनिक वास्तविकता न लपवता किंवा अतिशयोक्ती न करता, ती उघड करणारा एक खुला आणि नैसर्गिक दृश्य दृष्टिकोन तयार करणे हा यामागील उद्देश होता, असे त्यांनी सांगितले. या दृष्टिकोनाबाबत बोलताना ते म्हणाले की, चित्रपट निर्मात्यांना परिस्थिती जशी आहे तशीच सादर करायची होती, जेणेकरून प्रेक्षकांना त्या भावनांचा अधिक उत्कट अनुभव घेता येईल.
नीना आणि एली यांच्या परस्परविरोधी अनुभवांच्या माध्यमातून, 'अ फॅमिली' हा चित्रपट भावनिक सुरक्षिततेची गरज, पालकांमधील संघर्षाचे परिणाम आणि आपल्या सभोवतालच्या लोकांचे दृष्टिकोन ओळखण्याचे महत्त्व यावर प्रकाश टाकतो. कौटुंबिक नातेसंबंधांमधील दुराव्यावर सोपी उत्तरे देण्याऐवजी, हा चित्रपट प्रेक्षकांना त्यांच्या नात्यांवर चिंतन करण्यास, त्यांच्या कृतींबद्दल अधिक जागरूक होण्यास आणि आपल्या प्रियजनांसोबतच्या नात्यांना महत्त्व देण्यास प्रवृत्त करतो.

57व्या इफ्फीमध्ये आपला चित्रपट सादर करण्याची संधी मिळाल्याबद्दल दिग्दर्शक आणि अभिनेत्याने आनंद व्यक्त केला. महोत्सवात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केल्याबद्दल तसेच आपले काम प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी महोत्सवाचे आभार मानले.
या सत्राचे सूत्रसंचालन सस्मिता यांनी केले.
संपूर्ण पत्रकार परिषद येथे पहा:
Read IFFILOID here: https://www.pib.gov.in/iffi/57/iffiLoid.aspx?yr=2026&lang=1®=48
* * *
पीआयबी मुंबई | गोपाळ चिप्पलकट्टी/राजश्री आगाशे/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे