पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

भारतरत्न डॉ. भूपेन हजारिका यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगता समारंभात पंतप्रधान 29 नोव्हेंबर रोजी सहभागी होणार


नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे सायंकाळी 6 वाजता आयोजित या कार्यक्रमात पंतप्रधान जनसमुदायाला संबोधित करणार

Posted On: 28 NOV 2026 3:27PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 नोव्हेंबर 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित भारतरत्न डॉ. भूपेन हजारिका यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगता समारंभात सहभागी होणार आहेत. यावेळी ते उपस्थितांना संबोधितही करणार आहेत.

डॉ. भूपेन हजारिका यांचा जन्म 8 सप्टेंबर 1926 रोजी आसाममधील सदिया येथे झाला. ‘सुधाकंठ’ आणि ‘ब्रह्मपुत्रेचा कवी’ या नावांनी ओळखले जाणारे डॉ. हजारिका यांना आसामसह संपूर्ण देशाच्या सांस्कृतिक इतिहासात विशेष स्थान आहे. महान गायक, संगीतकार, गीतकार, चित्रपट दिग्दर्शक आणि लेखक म्हणून त्यांनी आपल्या कलाकृतींतून सर्वसामान्यांच्या भावना आणि आकांक्षांना अभिव्यक्ती दिली. आसाम आणि ईशान्य भारताच्या लोकपरंपरेत रुजलेल्या त्यांच्या संगीताने भाषिक आणि भौगोलिक सीमा ओलांडल्या. या प्रदेशाचा समृद्ध सांस्कृतिक वारसा त्यांनी भारतभरातील तसेच परदेशातील रसिकांपर्यंत पोहोचवला.

कलाक्षेत्रातील योगदानापलीकडे डॉ. हजारिका हे मानवतावादी विचारांचे पुरस्कर्ते आणि सामाजिक चिंतक होते. त्यांच्या कलाकृतींमधून समानता, मानवी प्रतिष्ठा, सामाजिक सलोखा आणि विश्वबंधुत्वाचा संदेश देण्यात आला. आसामची सांस्कृतिक ओळख अधिक दृढ करण्याबरोबरच भारताच्या विविधतेने नटलेल्या सांस्कृतिक वारशातही त्यांनी मोलाची भर घातली.

भारतीय संगीत, चित्रपट आणि संस्कृती क्षेत्रातील त्यांच्या असामान्य योगदानाबद्दल त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कारासह अनेक प्रतिष्ठित सन्मानांनी गौरविण्यात आले. 2019 मध्ये त्यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान मरणोत्तर ‘भारतरत्न’ प्रदान करण्यात आला.

डॉ. हजारिका यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सोहळ्याला 8 सप्टेंबर 2025 रोजी प्रारंभ झाला. या निमित्ताने संगीत, साहित्य, चित्रपट आणि सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचे स्मरण करून त्यांचा वारसा नव्याने जाणून घेण्याची संधी मिळाली. त्यांच्या विचारांची आजच्या काळातील प्रासंगिकता, सर्जनशील प्रतिभेचे चिरंतन महत्त्व आणि मानवता, सलोखा व विश्वबंधुत्वाचा त्यांनी दिलेला संदेश यांनाही या सोहळ्यामधून उजाळा देण्यात आला.

***

माधुरी पांगे/वैभवी जोशी/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2343043) अभ्यागत कक्ष : 3
Read this releasein: English , Tamil , Malayalam