Posted On:
28 NOV 2026 1:09PM by PIB Mumbai
भारत सरकारच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या अखत्यारीतील मुख्य कामगार आयुक्त (केंद्रीय) कार्यालयाने, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत 27 नोव्हेंबर 2026 रोजी एक बैठक आयोजित केली होती. मुख्य कामगार आयुक्त (केंद्रीय) सोनल मिश्रा, आयएएस यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीतील द्वारका येथील श्रमेव जयते भवन येथे ही बैठक झाली. या बैठकीत कामगार कायदा, 2020 ची प्रभावी अंमलबजावणी तसेच समन्वय आणि संबंधित हितधारकांशी सल्लामसलत अधिक मजबूत करण्यासंदर्भात चर्चा झाली.

कामगार कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी सुलभ करणे, नियमांचे पालन सुनिश्चित करणे आणि संस्थात्मक समन्वय मजबूत करणे या उद्देशाने, मुख्य कामगार आयुक्त (केंद्रीय) कार्यालयाद्वारे विविध मंत्रालये, विभाग आणि केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांसोबत आयोजित केलेल्या वैयक्तिक संवादांच्या मालिकेचा एक भाग म्हणून या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने प्रशासन विभागाचे मुख्य महाव्यवस्थापक सी. के. सिन्हा आणि त्यांच्या पथकाने बैठकीत सहभाग घेतला. मुख्य कामगार आयुक्त (केंद्रीय) कार्यालयातील सर्व वरिष्ठ अधिकारीही या बैठकीला उपस्थित होते.
बैठकीदरम्यान, मुख्य कामगार आयुक्त (केंद्रीय) कार्यालयाने कामगार कायद्यांचा आढावा आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाशी संबंधित प्रमुख तरतुदी, आवश्यक कामगार अनुपालन आवश्यकता, कंत्राटी कामगारांशी संबंधित समस्या, नोंदणी आणि परवाना आवश्यकता, आणि डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर यावर एक सादरीकरण केले. नियमांचे पालन सुलभ करण्यात आणि व्यवसाय सुलभता सुनिश्चित करण्यात मुख्य कामगार आयुक्त (केंद्रीय) संस्थेच्या भूमिकेवरही प्रकाश टाकण्यात आला.

कामगार कायद्यांनुसार वैधानिक अनुपालन सुलभ करण्यासाठी कंत्राटदार आणि उप-कंत्राटदारांसाठी जागेवरच नोंदणी आणि परवाना मोहीम राबवण्यासह अनेक प्रमुख मुद्द्यांवर बैठकीत चर्चा झाली. व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कार्य परिस्थिती संहिता, 2020 च्या कलम 10 नुसार अपघातांची तात्काळ नोंद करण्यावरही भर देण्यात आला. अपघातांशी संबंधित मानक कार्यपद्धती (SOPs) आणि सर्वोत्तम पद्धतींची माहिती, तसेच प्रात्यक्षिक सराव (मॉक ड्रिल) आयोजित करण्यासाठी आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सादर करावी अशी विनंती करण्यात आली.

याशिवाय, महामार्गांसारख्या लांब पल्ल्यांच्या प्रकल्पांच्या ठिकाणी (लिनियर प्रोजेक्ट साइट्स) काम करणाऱ्या महिला कामगार आणि आंतर-राज्य स्थलांतरित कामगारांना वैधानिक लाभ मिळण्यासंदर्भातील प्रश्नांचा अभ्यास करून त्यांचे निराकरण सुलभ करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या 2 ते 4 प्रादेशिक कार्यालयांचे प्रतिनिधी आणि मुख्य कामगार आयुक्त (केंद्रीय) कार्यालयाचे प्रतिनिधी यांच्या समावेश असलेला संयुक्त कार्य गट स्थापन करण्याबाबत ही चर्चा करण्यात आली.
मुख्य कामगार आयुक्त (केंद्रीय) कार्यालयाच्या या उपक्रमाचे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या प्रतिनिधींनी महत्त्वपूर्ण सहाय्यकारी उपक्रम म्हणून स्वागत केले आणि कामगार संस्थेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
मुख्य कामगार आयुक्त (केंद्रीय) कार्यालय चारही कामगार कायद्यांबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी, अनुपालन सुलभ करण्यासाठी, डिजिटल सक्षमीकरण मजबूत करण्यासाठी तसेच त्यांची सुरळीत आणि प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी संबंधित मंत्रालये, विभाग आणि संस्थांसोबत अशा संरचित बैठकांचे आयोजन करत आहे.
***
नितीन फुल्लुके/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com