Posted On:
27 NOV 2026 9:09PM by PIB Mumbai
पणजी, 27 नोव्हेंबर 2026
संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील अग्रगण्य संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम असलेल्या गोवा शिपयार्ड लिमिटेडने (जीएसएल) जहाजबांधणी क्षेत्रात आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. गोवा येथील आपल्याच्या जहाजबांधणी केंद्रात 27 नोव्हेंबर 2026 रोजी अत्याधुनिक अशा ‘ट्रेलिंग सक्शन हॉपर ड्रेजर’ (TSHD) या जहाजाचे यशस्वी जलावतरण करण्यात आले.
जॅन डी नुल (जेडीएन) प्रकल्पाच्या व्यवस्थापक वीरले कॉनिंग्ज यांच्या हस्ते या जहाजाचे जलावतरण करण्यात आले. यावेळी गोवा शिपयार्ड लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ब्रजेश कुमार उपाध्याय, संचालक (परिचालन) निवृत्त रिअर ॲडमिरल नेल्सन डिसोझा, एनएम, संचालक (वित्त) जहांगीर आलम अन्सारी, संचालक (सीपीपी आणि बीडी) नागेश दास पै तसेच जॅन डी नुलचे प्रतिनिधी उपस्थित होते.
लक्झेंबर्गस्थित नामांकित ‘जॅन डी नुल’ कंपनीसोबत 06 जून 2024 रोजी झालेल्या आंतरराष्ट्रीय व्यावसायिक जहाजबांधणी करारानुसार या जहाजाची बांधणी करण्यात येत आहे.
हा महत्त्वपूर्ण करार जागतिक व्यावसायिक जहाजबांधणी क्षेत्रात आपला विस्तार करण्याच्या गोवा शिपयार्ड लिमिटेडच्या (GSL) धोरणातील एक महत्त्वाचे पाऊल आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय सागरी क्षेत्रातील कंपनीचे स्थान आणि प्रभाव अधिक बळकट होणार आहे.
एकूण 83 मीटर लांबी आणि 2,000 घनमीटर गाळ साठवण्याची क्षमता असलेल्या या अत्याधुनिक गाळ उपसा जहाजात (ड्रेजर) प्रगत प्लग-इन हायब्रिड ऊर्जा प्रणाली (वीज-जोडणीद्वारे चार्ज करता येणारी संमिश्र ऊर्जा प्रणाली)बसवण्यात आली आहे. मरीना (लहान नौकांसाठीची बंदरे) आणि कमी जागा असलेल्या, दाट लोकवस्तीच्या बंदरांमध्ये काम करण्यासाठी या जहाजाची विशेष रचना करण्यात आली आहे. त्यामुळे जहाजाची हालचाल आणि हाताळणी अधिक सुलभ होते, कामकाजात अधिक लवचिकता येते आणि पर्यावरणावर होणारा परिणामही लक्षणीयरीत्या कमी होतो.
या संमिश्र ऊर्जा प्रणालीमुळे (हायब्रिड संरचना)हे जहाज चार तासांपर्यंत स्वतंत्रपणे कार्य करू शकते. कमी आवाजात काम करण्याबरोबरच पर्यावरणाचे संरक्षण, ऊर्जेचा कार्यक्षम वापर आणि प्रदूषक उत्सर्जन कमी करण्यावर भर देऊन या जहाजाची रचना करण्यात आली आहे. जहाजातील ही नाविन्यपूर्ण संमिश्र ऊर्जा प्रणाली पर्यावरणपूरक सागरी वाहतूक आणि कामकाजाच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे.
या प्रसंगी बोलताना गोवा शिपयार्ड लिमिटेडचे संचालक (परिचालन) निवृत्त रिअर ॲडमिरल नेल्सन डिसोझा, एनएम यांनी सांगितले की, या जलावतरणामुळे जागतिक स्तरावर स्पर्धा करु शकेल, अशी जहाजबांधणी संस्था म्हणून स्थान निर्माण करण्याच्या गोवा शिपयार्ड लिमिटेडच्या प्रवासात आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. हा प्रकल्प केवळ संरक्षण विषयक जहाजबांधणीपुरता मर्यादित नसून, कंपनीच्या वाढत्या क्षमतांचे दर्शन घडवतो. तसेच, आंतरराष्ट्रीय ग्राहकांसाठी तांत्रिकदृष्ट्या प्रगत आणि उच्च दर्जाची जहाजे बांधण्याची कंपनीची कटिबद्धताही यातून स्पष्ट होते, असे त्यांनी नमूद केले. या टप्प्याचे महत्त्व विशद करताना ते म्हणाले, “आयातदार राष्ट्राकडून उत्पादक राष्ट्राकडे आणि भारतासाठी उत्पादन करण्यापासून जगासाठी जहाजे बांधण्याकडे, असा भारताचा प्रवास सुरू आहे.”
जहाजांची रचना, बांधकाम, अभियांत्रिकी आणि प्रकल्पांची अंमलबजावणी या क्षेत्रांतील आपल्या अनुभवातून संपादन केलेल्या कौशल्याचा उपयोग करून गोवा शिपयार्ड लिमिटेड विशेष प्रकारच्या व्यावसायिक जहाजांच्या निर्मिती क्षेत्रात सातत्याने विस्तार करत आहे. या विस्ताराचे प्रतीक म्हणून हा प्रकल्प विशेष महत्त्वाचा आहे.
या प्रकल्पाची यशस्वी वाटचाल भारताच्या जहाजबांधणी क्षमतेवर आंतरराष्ट्रीय ग्राहकांचा असलेला विश्वास दर्शवते. तसेच, गुंतागुंतीचे आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सागरी प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण करण्याची गोवा शिपयार्ड लिमिटेडची क्षमता यातून दिसून येते.
या महत्त्वपूर्ण टप्प्यामुळे जागतिक सागरी आणि व्यावसायिक जहाजबांधणी क्षेत्रात अधिक मोठी भरारी घेण्याच्या महत्त्वाकांक्षेसह गोवा शिपयार्ड लिमिटेडने एक अग्रगण्य जहाजबांधणी संस्था म्हणून आपले स्थान अधिक भक्कम केले आहे.

_20261127212413_cb0593.jpeg)

पीआयबी मुंबई |सुवर्णा बेडेकर/आशुतोष सावे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai