महिला आणि बालविकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

महिला आणि बाल विकास मंत्रालयाकडून 'बाल विवाह मुक्त भारत' मोहिमेची दोन वर्षे साजरी


बालविवाहमुक्त भारतासाठी सामूहिक संकल्पाला राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमाने दिली बळकटी

Posted On: 27 NOV 2026 9:49PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर 2026

महिला आणि बाल विकास मंत्रालयाने आज नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमाद्वारे 'बाल विवाह मुक्त भारत' अभियानाची दोन वर्षे साजरी केली. या कार्यक्रमाला केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री अन्नपूर्णा देवी, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि महिला आणि बाल विकास राज्यमंत्री सावित्री ठाकूर उपस्थित होत्या.

या कार्यक्रमात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी, बालविवाह प्रतिबंध अधिकारी (CMPOs), बाल कल्याण समित्या (CWCs), विविध मंत्रालये व विभाग, विधी सेवा संस्था, आंतरराष्ट्रीय संघटना आणि नागरी समाज संघटनांचे प्रतिनिधी एकत्र आले होते. देशभरातील अधिकारी, प्रादेशिक स्तरावर काम करणारे कर्मचारी आणि संबंधित घटकांना या राष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी होता यावे, यासाठी या कार्यक्रमाचे थेट वेबकास्टिंगही करण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी भारत बालविवाहमुक्त करण्यासाठी काम करण्याच्या आपल्या संकल्पाचा पुनरुच्चार करत सामूहिक शपथ घेतली.

याप्रसंगी बोलताना केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री अन्नपूर्णा देवी म्हणाल्या, "देशातील प्रत्येक बालकाला सुरक्षित बालपण मिळावे, प्रत्येक मुलीला शिक्षणाची संधी मिळावी आणि त्या स्वतःच्या आयुष्याचे निर्णय घेण्यास सक्षम व्हाव्यात, हे सुनिश्चित करणे हेच आमचे ध्येय आहे."

'बाल विवाह मुक्त भारत पोर्टल' हे विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 72,000 हून अधिक बालविवाह प्रतिबंधक अधिकाऱ्यांचे (CMPOs) केंद्रीकृत भांडार म्हणूनही उदयाला आले आहे. 21 ऑक्टोबर ते 21 डिसेंबर 2026 या कालावधीत सुरू असलेल्या 100 दिवसांच्या 'बाल विवाह मुक्त भारत जनजागृती मॉड्यूल 2.0' दरम्यान हा वर्धापन दिन साजरा केला जात आहे. देशभरात बालविवाहाविरुद्ध जनजागृती, लोकसहभाग आणि समन्वित कारवाई अधिक तीव्र करणे, हा या मोहिमेचा उद्देश आहे.

विज्ञान भवन येथील कार्यक्रमात सुमारे 700 व्यक्ती सहभागी झाल्या होत्या. विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील संबंधितांना या कार्यक्रमात आणि बालविवाहाविरुद्धच्या देशव्यापी शपथेमध्ये सहभागी होता यावे, यासाठी वेबकास्टद्वारे व्यापक सहभागाची सोय करण्यात आली होती. सुमारे 47,000 लोकांनी वेबकास्टच्या माध्यमातून हा कार्यक्रम पाहिला.

https://stopchildmarriage.wcd.gov.in/ या 'बाल विवाह मुक्त भारत पोर्टल'द्वारे नागरिक बालविवाहाच्या घटनांची तक्रार नोंदवू शकतात, शपथ घेऊ शकतात आणि आवश्यक माहिती व संसाधने मिळवू शकतात. तसेच, मदत आणि वेळेवर हस्तक्षेपासाठी चाइल्ड हेल्पलाइन 1098, आपत्कालीन प्रतिसाद सहाय्य प्रणाली 112 आणि महिला हेल्पलाइन 181 या सेवादेखील उपलब्ध आहेत.

माधुरी पांगे/शैलेश पाटील/प्रिती मालंडकर 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2342884) अभ्यागत कक्ष : 7